द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन (The Championships, Wimbledon) ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. 


युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. 

चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे.

पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच प्रमुख स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.

यात १९६८ पूर्वी फक्त हौशी खेळाडूंनाच भाग घेता येत असे. आता त्या हौशी व धंदेवाईक खेळाडूंना खुल्या झाल्या आहेत. 

जगातील बहुसंख्य राष्ट्रांचे हौशी व धंदेवाईक खेळाडू या स्पर्धांना अत्यंत महत्त्व देतात; कारण त्यांतील विजयावर त्यांना व त्यांच्या राष्ट्राला जागतिक बहुमान मिळतो. त्यात जगातील विविध राष्ट्रांतील नामवंत खेळाडू भाग घेत असल्यामुळे खेळाचा दर्जाही उच्च असतो. 

वरील पाच प्रकारच्या स्पर्धांशिवाय १९४९ पासून उत्तेजनार्थ मुलांच्या एकेरी व मुलींच्या एकेरी स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. भारताच्या कृष्णनने १९५४ मध्ये मुलांच्या स्पर्धांत अजिंक्यपद मिळविले होते.

२०१९ विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला तर उपविजेतेपद स्वित्झरलँडच्या रॉजर फेडरर याला मिळाले. महिला एकेरीचे विजेतेपद रोमानियाच्या सिमोना हॅलेप हिला तर उपविजेतेपद अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला मिळाले.

२०१९ पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोलंबियाच्या जुआन सबॅस्टिअन कॅबल आणि रॉबर्ट फराह यांना मिळाले. महिला दुहेरीचे विजेतेपद झेक प्रजासत्ताकच्या बारबोरा स्त्रीकोवा आणि तैपेईच्या सु वेई यांना मिळाले. मिश्र दुहेरीचे विजेतेपद तैपेईच्या लतिशा चॅन व क्रोएशियाच्या इवान डोडिग यानं मिळाले.

पुरुष एकेरीचे सर्वाधिक वेळेस विजेतेपद रॉजर फेडरर याला ८ वेळेस तर महिला एकेरीचे सर्वाधिक वेळेस विजेतेपद मार्टिना नवरातिलोवा हिला मिळाले.