रिझर्व्ह बँक श्रीलंकासोबत 400 दशलक्ष डॉलरच्या चलनाची अदलाबदल करणार

कोविड-19 महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंका देशाच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याच्या हेतूने, भारतीय रिझर्व्ह बँकेनी श्रीलंकासोबत 400 दशलक्ष (40 कोटी) डॉलर एवढ्या रकमेच्या चलनाची अदलाबदल (करन्सी स्वॅप) करण्यासाठी मान्यता दिली आहे.

श्रीलंकाला कमी होत चाललेल्या परकीय चलन साठ्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे.

24 जुलै 2020 रोजी श्रीलंकाचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

भारतीय भुदलात महिला अधिकाऱ्यांच्या परमनेन्ट कमिशनसाठी सरकारची मान्यता

भारतीय भुदलात महिला अधिकाऱ्यांच्या परमनेन्ट कमिशनसाठी केंद्र सरकारच्यावतीने औपचारीक मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने 23 जुलै 2020 रोजी एक स्वीकृती पत्र जाहीर केले.

परमनेन्ट कमिशनचा अर्थ असा होतो की जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत दलात रुजू असणार.

शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) मधील महिला अधिकाऱ्यांचा भारतीय भुदलातल्या सर्व दहाही विभागांमध्ये परमनेन्ट कमिशनसाठी मान्यता देण्यात आली आहे.

महिलांना आर्मी एयर डिफेन्स, सिग्नल, इंजीनियर, आर्मी एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल इंजीनियरिंग, आर्मी सर्विस कॉर्प्स, आर्मी ऑर्डिनंन्स कॉर्प्स आणि इंटेलिजेंस कॉर्प्स या विभागांमध्ये परमनेन्ट कमिनश मिळू शकणार.

यासोबतच जज अँड एडवोकेट जनरल, आर्मी एज्युकेशनल कॉर्प्स यांमध्येही सुविधा मिळणार.

‘भारतात शिका’ कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतात पहिल्यांदाच ‘Ind-SAT’ परीक्षेचे आयोजन

‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिनांक 22 जुलै 2020 रोजी पहिल्यांदाच भारतीय शैक्षणिक मूल्यांकन (Ind-SAT) परीक्षा घेतली.

राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे (NTA) प्रक्षेपित आंतरजाल पद्धतीने घेतलेल्या या परीक्षेत नेपाळ, इथिओपिया, बांग्लादेश, भुटान, युगांडा, टांझानिया, रवांडा, श्रीलंका, केनिया, झांबिया, इंडोनेशिया आणि मॉरीशस या देशांमधून सुमारे पाच हजार उमेदवार सहभागी झाले होते.

Ind-SAT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे ‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाणार आहे.

‘भारतात शिका’ हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यक्रम असून त्याच्या अंतर्गत परदेशी विद्यार्थी भारतातल्या निवडक अशा 116 उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येतात.

इयत्ता बारावी वा शालांत परीक्षेतल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

गुणानुक्रमे पहिल्या 2000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते तर इतर काही विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कामध्ये सवलत दिली जाते

निकाराग्वा: आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा 87 वा सभासद

निकाराग्वा हा आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये औपचारीकपणे सहभागी होणारा 87 वा देश ठरला आहे.

देशाच्या प्रतिनिधींनी 22 जुलै 2020 रोजी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली.

2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे.

भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे.

ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.

‘ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र

भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.

हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.

‘ध्रुवास्‍त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली.

ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.

ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राचा वापर भारतीय भुदलाकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत तसेच भूमीवरून केला जाऊ शकतो.

या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.

हे स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.

या क्षेपणास्त्राची लांबी 1.9 मीटर आहे आणि व्यास 0.16 मीटर आहे. त्याचे वजन 45 किलोग्रॅम आहे.

हे क्षेपणास्त्र 240 मीटर / सेकंद या गतीने प्रवास करू शकते.

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी तयार केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले.

हेलिकॉप्टरमार्फत सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीला “हेलीकॉप्टर-लॉंच्ड NAG (HELINA / हेलीना)” असे नाव देण्यात आले आहे.

देशातील पहिले सार्वजनिक इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग प्लाझा नवी दिल्लीत उघडले

भारतात ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आणि विजेवर चालणाऱ्या ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, केंद्रीय ऊर्जा, नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांच्या हस्ते 20 जुलै 2020 रोजी नवी दिल्लीत चेम्सफर्ड क्लब येथे देशातील पहिल्या “EV (इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग प्लाझा”चे उद्‌घाटन करण्यात आले.

नवी दिल्ली महानगरपालिकेच्या सहकार्याने EESL या सार्वजनिक कंपनीने भारतातील पहिला-वहिला सार्वजनिक EV चार्जिंग प्लाझा मध्य दिल्लीत उभारला आहे.

या केंद्रामध्ये विविध आकारमानाच्या पाच विजेरी वाहनांच्या चार्जिंगची सोय आहे.

PPE संचाची चाचणी आणि प्रमाणीकरणासाठी NABL संस्थेकडून CIPET संस्थेला मान्यता

रसायने व खते मंत्रालयाचे रसायन व पेट्रोकेमिकल्स विभाग यांच्या अखत्यारीतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) या संस्थेला वैयक्तिक सुरक्षात्मक उपकरणे (PPE) संचाची चाचणी आणि प्रमाणीकरणसाठी राष्ट्रीय चाचणी व अंशशोधण प्रयोगशाळा मान्यता मंडळाची (NABL) मान्यता प्राप्त झाली आहे.

PPE संचात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हातमोजे, घालावायचा परिधान, फेस शिल्ड, गॉगल आणि ट्रिपल-लेयर मेडिकल फेस मास्क इत्यादींचा समावेश आहे.

दिल्लीच्या AIIMS संस्थेच्या ‘e-ICU’ व्हिडिओ सल्लामसलत कार्यक्रमाला सुरुवात

कोविड-19 चा मृत्यूदर कमी करण्यासाठी भारत सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना अजून बळकटी देण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेनी (AIIMS) 8 जुलै 2020 पासून अतिदक्षता विभागातल्या चिकित्सकांसाठी एका ‘व्हिडीओ सल्लामसलत कार्यक्रम’ला सुरूवात केली आहे.

कोविड-19 वर उपचार करणाऱ्या देशभरातील रुग्णालयातल्या चिकित्सकांमध्ये चर्चा घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

भारतात 30 वर्षीय स्वयंसेवकाला दिला कोरोनाचा पहिला डोस

भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.

स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात येणार आहे.

यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे.

भारताच्या ताफ्यात P-8I या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार

भारतीय नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार आहे. कारण भारताच्या ताफ्यात P-8I या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार आहे.

अमेरिकन बनावटीची आणखी चार विशेष विमाने पुढच्यावर्षीपर्यंत नौदलाला मिळणार आहेत.

P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे.बोईंगकडून अशी आणखी सहा विमाने घेण्याचा भारताकडे पर्याय आहे.

भारतीय नौदलाकडे P-8A पोसी़डॉन विमान असून P-8I मधला I खास भारतासाठी आहे. समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे.

हारपून ब्लॉक 2 मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते.

संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयानाचे नाव “अल अमल”

संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयान सोमवारी मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले.

अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती.

‘अल अमल’ याचा अर्थ ‘आशा’ असा आहे. हे यान 1.3 टन वजनाचे असून ते जपानमधील तानेंगिशिमा येथील अवकाशतळावरून स्थानिक वेळेनुसार पहाटे 1.58 वाजता सोडण्यात आले.

यानाची दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित केली असून त्याच्याकडून पहिले संदेश मिळाले आहेत.

सौरपपट्टय़ा विद्युत भारित झाल्याने अवकाशयान 49 कोटी 50 लाख कि. मी. चे मंगळापर्यंतचे अंतर पार करणार आहे.