अमेरिकेत आपत्कालीन तेल साठा तयार करण्यासाठी भारताचा करार

भारत-अमेरिका देशांमध्ये 17 जुलै 2020 रोजी आभासी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

यात अमेरिकेचे ऊर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

या बैठकीत भारताने आपत्कालीन परिस्थितीत वापर करता यावा या हेतूने अमेरिकेत इंधन तेलाची साठवणूक करण्यासाठी संयुक्त राज्ये अमेरिका या देशासोबत आभासी पद्धतीने एक सामंजस्य करार केला आहे.

अमेरिकेकडे 71.40 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे.

आपत्कालीन इंधन तेलाच्या पुरवठ्याच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे. युद्धकाळात हा साठा देशाची इंधन आवश्यकता भागविण्यासाठी उपयोगी ठरतो.

भारताकडे सध्या 3.80 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे.

पोडूर, मंगळूर, विशाखापट्टणम येथे भूमिगत टाक्यांमध्ये हे इंधन तेल साठविले जाते.

बीसीसीआयला 4800 कोटींचा दंड ठोठावण्यात आला

हैदराबाद स्थित ‘आयपीएल’मधील संघ डेक्कन चार्जर्सविरुद्धचा करार 2012 मध्ये अचानक रद्द केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) 4800 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या लवादाने ‘बीसीसीआय’च्या विरोधात हा निर्णय दिला आहे.

आंतरराष्ट्रीयन हवाई प्रवासासाठी भारताचा अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांच्यासोबत ‘एअर बबल’ करार

कोविड-19 महामारीमुळे बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेला काही निवडक देशांसाठी पुन्हा चालू करण्याच्या उद्देशाने भारताने संयुक्त राज्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या सोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ करार केले आहेत.

टाळेबंदीनंतर प्रथमच भारत-अमेरिका विमानसेवा सुरु झाली आहे. 18 जुलैपासून फ्रान्ससोबत हवाई सेवा सुरू होणार आहे.

‘एअर बबल’ करारानुसार ठरलेल्या कालावधीतच निश्चित विमानसेवा पूर्ण करावयाच्या असतात.

ला लिगा फुटबॉल रिअल माद्रिदला विक्रमी 34वे  विजेतेपद

रिअल माद्रिदने विक्रमी 34व्यांदा ला-लिगा फुटबॉलचे विजेतेपद पटकावले.

व्हिलारेयालला 2-1 नमवत एक लढतआधीच माद्रिदने चषक उंचावला.

माद्रिदचे हे 2017 नंतरचे पहिले ला-लिगा विजेतेपद ठरले. माद्रिदचा हा या स्पर्धेतील सलग 10वा विजय ठरला.

‘कोरोशुअर’: दिल्लीच्या IIT संस्थेत विकसित झालेला जगातला सर्वात स्वस्त ‘कोविड-19 निदान संच’

भारतीय तंत्रज्ञान संस्था, (IIT) दिल्ली, येथील संशोधकांनी RT-PCR प्रक्रियेवर आधारित असलेला जगातला सर्वात स्वस्त “कोविड-19 निदान संच” विकसित केला आहे.

त्याला ‘कोरोशुअर’ असे नाव देण्यात आले आहे.

प्राध्यापक विवेकानंदन पेरूमल आणि त्यांच्या शोध पथकाने हा कोविड-19 निदान संच विकसित केला.

या संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि भारतीय औषधी महानियंत्रक (DGCI) कडून मान्यता देण्यात आली आहे.

“प्रज्ञाता” (PRAGYATA): डिजिटल शिक्षणाच्या संदर्भात भारत सरकारची मार्गदर्शक तत्वे

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते नवी दिल्लीत आभासी माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्या-घेण्याच्या संदर्भात “प्रज्ञाता” (PRAGYATA) या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे.

कोविड-19 महामारीमुळे देशभरातील सर्व शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. आणि यामुळे शिक्षणाचे नुकसान होऊ शकते.

ही समस्या लक्षात घेता घरी आणि शाळेतील शिक्षणामध्ये योग्य समतोल व समन्वय साधून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी योग्य पद्धत अवलंबण्यावर भर दिला जात आहे.

जागतिक युवा कौशल्य दिन: 15 जुलै

दरवर्षीप्रमाणे 15 जुलै 2020 रोजी जगभरात “स्किल्स फॉर ए रेजीलीएन्ट युथ” या संकल्पनेखाली ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा करण्यात येत आहे.

यावर्षी भारतात ‘कौशल्य भारत’ अभियान सुरू करण्यात आल्याचा पाचवा वर्धापनदिन म्हणून हा दिवस साजरा होत आहे.

‘कौशल्य भारत’ अभियान ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे.

देशातील युवा वर्गाला अर्थार्जनाला उपयुक्त अशी कौशल्ये देऊन सक्षम करणे आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणची त्यांची उत्पादकता अधिक वाढवणे हा यामागचा हेतू आहे.

18 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ठराव 69/145 मान्य करण्यात आला.

या ठरावानुसार जगभरात दरवर्षी 15 जुलै या तारखेला जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा केला जाणार आहे.

प्रथम जागतिक युवा कौशल्य दिवस 2015 साली साजरा केला गेला.

NTPC कंपनीने ‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार 2019’ पटकावला

NTPC मर्यादीत या सार्वजनिक कंपनीने प्रतिष्ठित ‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार 2019’ पटकावला आहे.

कॉर्पोरेट उत्कृष्टता श्रेणीत उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार’ हा शाश्वत उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रदान केला जातो.

देशातील शाश्वतता ओळखण्यासाठी हे सर्वात विश्वासार्ह व्यासपीठ मानले जाते.

NTPC मर्यादीत (पूर्वीचे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ) ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि भारतातली सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आहे.

विद्यार्थ्यांसाठी अटल इनोव्हेशन मिशनचे ‘ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाच्या आवाहनाच्या अनुषंगाने भारतीय मोबाइल ॲप नाविन्यपूर्ण पद्धतीने विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने (AIM) देशभरातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अटल टिंकरींग लॅब (ATL) ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल’ सादर केले आहे.

ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल’ हा एक ऑनलाईन अभ्यासक्रम असून पूर्णपणे मोफत आहे.

6 प्रकल्प-आधारित शैक्षणिक सामग्री पद्धती आणि ऑनलाईन मार्गदर्शक सत्राद्वारे तरुण नवनिर्माते विविध भारतीय भाषांमध्ये मोबाइल ऍप तयार करण्याचे शिकू शकतात आणि त्यांचे कौशल्य दाखवू शकतात.

याव्यतिरिक्त, शालेय शिक्षकांमध्ये ॲप विकासासाठी क्षमता आणि कौशल्य तयार करण्यासाठी, अटल इनोव्हेशन मिशनच्या ॲप डेव्हलपमेंट अभ्यासक्रमात ठराविक कालांतराने शिक्षक प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाणार आहेत.

प्लेझ्मो या भारतीय स्टार्टअप कंपनीच्या सहकार्याने ATL ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल सुरू करण्यात आले आहे.

आतापर्यंत अटल इनोव्हेशन मिशनद्वारे देशभरातल्या 660 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 5100 पेक्षा अधिक अटल लॅब सुरू आहेत.

भारतातल्या व्याघ्र गणनेनी कॅमेरांद्वारे मोठ्या प्रमाणात वन्यजीव सर्वेक्षण करून विक्रम केला

भारतात दर चार वर्षांनी होणाऱ्या ‘राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018’ याच्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातल्या व्याघ्र गणनेनी नवीन गिनीज विश्व विक्रम स्थापित केला आहे.

सन 2018-19 मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते.

वेगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले.

या सापळा रुपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली. त्यात 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते.

नव्या गणनेनुसार, देशात सुमारे 2967 वाघ आहेत. जागतिक व्याघ्र संख्येच्या 75 टक्के वाघांचे वस्तीस्थान भारत आहे.