‘BIMSTEC सनद’ला अंतिम स्वरूप प्राप्त झाले

BIMSTEC (बहुउद्देशीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) यांच्या स्थापनेनंतर 23 वर्षांनंतर ‘BIMSTEC सनद’ याला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे.

2 सप्टेंबर 2020 रोजी श्रीलंका देशाच्या अध्यक्षतेखाली BIMSTEC गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंबंधी घोषणा करण्यात आली.

भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व परराष्ट्र सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंग यांनी केले.

BIMSTEC (बहुउद्देशीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम / Bay of Bengal Initiative for Multi Sectoral Technological and Economic Cooperation) हा एक प्रादेशिक आर्थिक गट आहे.

BIMSTEC समूह दिनांक 6 जून 1997 रोजी अस्तित्वात आला.

त्याचे कायमस्वरूपी सचिवालय ढाका (बांग्लादेश) येथे आहे.

या समूहात बंगालच्या उपसागरालगतच्या दक्षिण आशियातल्या भारत, बांगलादेश, भुटान, नेपाळ, श्रीलंका तसेच आग्नेय आशियातल्या म्यानमार आणि थायलँड या सात देशांचा समावेश आहे.

रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी

रशियाने विकसित केलेली आणि मंजुरी दिलेली ‘स्पुटनिक व्ही’ ही करोनावरील लस प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

वैद्यकीय नियतकालिक ‘लॅन्सेट’मध्ये या बाबतची संशोधन माहिती समोर आली आहे.

चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस सुरक्षित असल्याचे आढळले.

‘स्पुटनिक व्ही’लस टोचल्यानंतर 42 दिवसांनंतरही कोणतेही अन्य गंभीर परिणाम (साइड इफे क्ट्स) जाणवले नाहीत.

त्याचप्रमाणे ही लस 21 दिवसांत शरीरामध्ये अ‍ॅण्टिबॉडी तयार करण्यास सक्षम आहे.

‘लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार दोन भाग असलेल्या लशीत दोन अडेनोव्हायरस वेक्टर्स आहेत.

त्यामुळे एसएआरएस-सीओव्ही-2 स्पाइक प्रोटिनसाठी वेगळ्या पद्धतीने विकसित करण्यात आल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रीय शिक्षक दिन

1962 सालापासून दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ साजरा केला जातो. शिक्षणतज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून पाळला जातो.

यावर्षीच्या शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आभासी पद्धतीने संपन्न झालेल्या पहिल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देशभरातल्या 47 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांपैकी जवळपास 40 टक्के विजेत्या महिला आहेत.

केंद्र सरकारद्वारे 118 अ‍ॅप्सवर बंदी

केंद्र सरकारने 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे.यामध्ये पबजी गेमचाही समावेश आहे.

भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं आहे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे.

बॅन कऱण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये Baidu, Baidu Express Edition, Tencent Watchlist, FaceU, WeChat Reading Tencent Weiyun यांचाही समावेश आहे. या सर्व अ‍ॅप्सचा चीनशी संबंध असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

“इंद्रा नेव्ही-20” युद्धसराव

भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांचा 11 वा द्वैवार्षिक संयुक्त सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे.

इंद्रा नेव्ही-20”चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर-संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे.

सरावादरम्यान भारतीय नौदलाच्या ताफ्यात क्षेपणास्त्र विनाशिका ‘रणविजय’, स्वदेशी लढाऊ जहाज ‘सह्याद्री’ आणि ‘शक्ती’ या तेलवाहू जहाजाचा आणि हेलिकॉप्टरचाही समावेश आहे.

तर रशियाच्या ताफ्यात विनाशिका ‘एडमिरल विनोग्राडोव्ह’, विनाशिका ‘एडमिरल ट्रिब्युट’ आणि फ्लीट टॅंकर ‘बोरिस ब्यूटोमा’ या जहाजांचा समावेश आहे.

2003 साली सुरु झालेला “इंद्रा नेव्ही” म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे. सरावामुळे दोन्ही नौदलात परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होणार असून, उभय देशातले दीर्घ काळापासूनचे मैत्रीचे बंध अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

माजी राष्ट्रपती, मुरब्बी राजकारणी, काँग्रेसचे संकटमोचक नेते, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी लष्कराच्या रुग्णालयात निधन झाले.

ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानिमित्त सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

साठ वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या प्रणव मुखर्जी यांना केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले.

प्रणव मुखर्जी यांनी पाच दशके समर्पित भावनेने देशसेवा केली. सार्वजनिक जीवनात विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी मातीशी नाळ कायम ठेवली. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आहे.

‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये भारत 48 व्या क्रमांकावर

भारताने जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020’मध्ये 48 वा क्रमांक मिळवलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार स्थानांची सुधारणा करत भारताने 48 वा क्रमांक मिळवला आहे.

मध्य आणि दक्षिण आशियायी देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

गरीब देशांमध्ये भारत जगातला तिसऱ्या क्रमांकाची नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्था आहे.

स्वित्झर्लंड हा देश GII 2020 याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. स्वीडन द्वितीय तर अमेरिका हा देश तृतीय क्रमांकावर आहे.

भारताने सर्व घटकात सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान सेवा, सरकारी ऑनलाइन सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी याबाबत भारताने चांगली कामगिरी केली आहे.

भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पद्मावती यांचं निधन

भारताच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचं शनिवारी (दि.29) निधन झालं, त्या 103 वर्षांच्या होत्या.

एनएचआयच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ. पद्मावती यांना सन 1967 मध्ये पद्मभूषण तर सन 1992 मध्ये पद्मविभूषण किताबाने गौरविण्यात आले होते.

त्यांना हार्वर्ड मेडिकल इंटरनॅशनल अवॉर्ड, डॉ. बी. सी. रॉय अवॉर्ड आणि कमला मेनन रिसर्च अवॉर्डनेही गौरविण्यात आले आहे.

देशातली पहिली बंगळुरू-सोलापूर ‘रो-रो’ रेल्वेसेवा कार्यरत

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्या “रोल ऑन रोल ऑफ’ (रो-रो) रेल्वे सेवेचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले.

ही सेवा बंगळुरू (नेलमंगला) आणि सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) या शहरांच्या दरम्यान आहे.

अत्यावश्‍यक वस्तूंची जलद वाहतूक करण्यासाठी रेल्वे मंडळाने एप्रिलमध्ये बंगळुरू (नेलमंगला) ते सोलापूर (बाळे, महाराष्ट्र) पर्यंत पहिल्या “रोल ऑन रोल ऑफ’ (रो-रो) सेवेला मान्यता दिली होती.

रो-रो सेवा मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि नैर्ऋत्य रेल्वे या तिन्ही विभागात कार्यरत केली जाणार आहे. प्रत्येक फेरीसाठी सहा दिवस लागणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आवश्‍यक त्या राज्यामध्ये ही सेवा पोचविली जाणार आहे.

रेल्वे वाहतुकीद्वारे रो-रो सेवांच्या माध्यमातून मालवाहू वाहनांची वाहतूक केली जाणार आहे. एका फेरीत 42 ट्रक वाहून नेण्याची क्षमता असणार.

चालक आणि एक व्यक्ती ट्रकसोबत प्रवास करू शकते. त्यांना प्रवासासाठी द्वितीय श्रेणीची तिकीटे खरेदी करावी लागणार आहेत.

एकूण 682 किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर 1,260 टन वाहनवाहू क्षमता असणार. प्रत्येक ट्रक किंवा लॉरीतून 30 टन मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

राजीव कुमार: नवीन निवडणूक आयुक्त

राजीव कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी भारताचे 24 वे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

राजीव कुमार भारतीय प्रशासनिक सेवेमधले 1984 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली आहे.

राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्याबरोबर काम करणार.

अशोक लवासा यांची आशियाई विकास बँक (मनिला, फिलीपीन्स) येथे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही नियुक्ती झाली.