जागतिक प्रथमोपचार दिन 12 सप्टेंबर 2020

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ‘जागतिक प्रथमोपचार दिन’ साजरा करतात. हा वर्षातला 254 वा (लीप वर्षात 255 वा) दिवस असतो.

या दिवशी जीवितहानी टाळण्याच्या प्रयत्नात प्रथमोपचार किती महत्वाची भूमिका बजावू शकते याविषयी जनजागृती केली जाते.

2000 साली इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीज (IFRC) या संस्थेच्यावतीने या दिवसाची स्थापना करण्यात आली.

DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी

ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली.

या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच 6) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.

हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही चाचणी होती.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने हे व्हेइकल विकसित केले आहे.

सकाळी 11 वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला.

या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल.

डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली. HSTDV चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले.

भारताची क्षेपणास्त्रे

नाओमी ओसाकाने ‘यू.एस. ओपन 2020’ टेनिस स्पर्धा जिंकली

जापानच्या नाओमी ओसाका हिने ‘यू.एस. ओपन 2020’ या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हिक्टोरिया अझरेंकाचा पराभव करीत महिला एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

नाओमी ओसाकाचे हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

स्पर्धेच्या इतर गटाचे विजेते

पुरुष एकेरी – डोमिनिक थिएम (ऑस्ट्रिया)

पुरुष दुहेरी – माटे पाव्हीक (क्रोएशिया) आणि ब्रुनो सोरेस (ब्राझील)

महिला दुहेरी – लॉरा सिगेमुंड (जर्मनी) आणि वेरा झ्वोनारेवा (रशिया)

भारत आणि फ्रान्स मध्ये 36 राफेल विमानांचा करार

भारत आणि फ्रान्स मध्ये 59 हजार कोटी रुपयांचा 36 राफेल विमानांबाबतचा करार करण्यात आला.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह, फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले आणि भारतीय लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी अंबाला हवाई तळावर आयोजित करण्यात येणाऱ्या एका समारंभात पाच राफेल विमाने औपचारिकपणे भारतीय हवाई दलात (आयएएफ) दाखल करून घेण्यात येणार आहेत.

भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षणविषयक आणि सुरक्षाविषयक सहकार्य अधिकाधिक वृद्धिंगत करण्याबाबत राजनाथसिंह आणि पार्ले अंबालामध्ये चर्चा करणार आहेत.

पार्ले यांचे गुरुवारी आगमन होणार असून समारंभ आटोपल्यानंतर त्वरितच ते मायदेशी रवाना होणार आहेत.

भारतात 29 जुलै रोजी पहिली पाच राफेल विमाने दाखल झाली, भारत आणि फ्रान्स यांच्यात 59 हजार कोटी रुपयांचा 36 राफेल विमानांबाबतचा करार करण्यात आला आहे.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन: 10 सप्टेंबर

दरवर्षी 10 सप्टेंबर या दिवशी जगभर ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ पाळला जातो.

आत्महत्या रोखण्यासाठी जागतिक वचनबद्धता स्पष्ट करणे आणि त्यासंबंधी पावले उचलणे याविषयी जनजागृती करणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध संघ (IASP), जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जागतिक मानसिक आरोग्य महासंघ (WFMH) यांच्या संयुक्त सहकार्याने वर्ष 2003 पासून जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आयोजित केला जात आहे.

भारतीय गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,देशात गेल्या वर्षात सुमारे 1.39 लक्ष जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्र राज्यात अधिक आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्यापैकी 13.6 टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन

लेखिका मीना देशपांडे यांचं निधन झालं आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या.

प्रसिद्ध कवी आणि लेखक महेश केळुस्कर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

मीना देशपांडे या प्रसिद्ध लेखिका असण्यासोबतच आचर्य अत्रे यांच्या कन्या होत्या.

EASE बँकिंग सुधारणा निर्देशांक

केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 9 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या ‘डोअरस्टेप बँकिंग’ सेवेचे उद्घाटन केले.

तसेच याप्रसंगी EASE बँकिंग सुधारणा निर्देशांकानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांचा सत्कार देखील करण्यात आला.

EASE बँकिंग सुधारणा निर्देशांक किंवा EASE 2.0 निर्देशांक यामध्ये ‘सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बँका’ श्रेणीत अव्वल तीन स्थानावर असलेल्या बँका (अनुक्रमे) – बँक ऑफ बडोदा, भारतीय स्टेट बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

विश्वातील अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 100 गोल साकारणाऱ्या रोनाल्डोने नोंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर पोर्तुगालने नेशन्स लीग फुटबॉलच्या ‘क’ गटातील सामन्यात स्वीडनवर 2-0 असा विजय मिळवला.

35वर्षीय रोनाल्डो अशी कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू ठरला आहे.

दिल्ली-मेरठ RRTS मार्गिकेच्या बांधकामासाठी आशियाई विकास बँकडून कर्ज मिळाले

82 किलोमीटर लांबीची हाय-स्पीड दिल्ली-मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) मार्गिका बांधण्यासाठी भारत सरकारचा फिलिपिन्सच्या आशियाई विकास बँक (ADB) या संस्थेसोबत 500 दशलक्ष डॉलर (3678 कोटी रुपये) इतक्या रकमेच्या कर्जासाठी करारावर स्वाक्षरी केली.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ताशी 180 किलोमीटर वेगाने गाडी धावण्यासाठी अनुकूल असलेली संरचना तयार केली जाणार आहे.

त्या मार्गाने दिल्लीतले सराय काले खान आणि उत्तरप्रदेशच्या मेरठ शहरातल्या मोदीपुरम ही ठिकाणे जोडली जाणार आहेत.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन: 8 सप्टेंबर

संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि संस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात 8 सप्टेंबर या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजरा केला जातो.

या दिनी सक्रियपणे आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे आणि व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांना सक्षम बनवण्यासाठी एक साधन म्हणून साक्षरतेला प्रोत्साहन दिले जाते.

“लिटरसी टिचिंग अँड लर्निंग इन द कोविड-19 क्राईसीस अँड बियॉन्ड” या संकल्पनेखाली 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ साजरा केला गेला.

संपूर्ण जगात दरवर्षी 8 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ पाळला जातो. 1965 साली या तारखेला तेहरानमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या वैश्विक शिखर परिषदेच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच बैठक आयोजित केली गेली होती.

या घटनेच्या स्मृतीत UNESCOने नोव्हेंबर 1966 मध्ये आपल्या 14व्या सत्रात 8 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ म्हणून घोषित केले.

निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन: 7 सप्टेंबर

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात सदस्य राष्ट्रांमध्ये 7 सप्टेंबर 2020 रोजी “क्लीन एअर फॉर ऑल” या संकल्पनेखाली पहिला ‘निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन’ साजरा करण्यात आला.

19 डिसेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनी हा दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला होता.