देशभरातील ८५ जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर 
देशात विविध क्षेत्रात विशिष्ट सेवा आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘पद्म’ या नागरी पुरस्कारांनी सन्मान केला जातो. 


यंदा या पुरस्कारातील पद्मश्री हा किताब राज्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे राणी बंग आणि अभय बंग, संपत रामटेके, अरविंद गुप्ता तसेच मुरलीकांत पेटकर यांना जाहीर झाला आहे. 

यंदा देशभरातील ८५ जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. (यामध्ये विभागून दिलेल्या दोन पुरस्कारांचा समावेश) पद्म पुरस्कारांमध्ये ३ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण आणि ७३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

तसेच यामध्ये १४ महिलांचा तर १६ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. ३ जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात या पुरस्काराचे वितरण होईल.



कमांडो निराला यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर
असामान्य शौर्याबद्दल हवाई दलाचे कमांडो कॉर्पोरल ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर करण्यात आले. शांततेच्या काळात दिला जाणारा हा सर्वोच्च शौर्य सन्मान आहे. 

जम्मू-काश्‍मीर लाइट इन्फंट्रीच्या चौथ्या बटालियनचे मेजर विजयंत बिश्‍त यांना कीर्ती चक्र जाहीर झाले आहे. राष्ट्रीय रायफल्सचे सार्जंट मिलिंद किशोर खैरनार यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दलांसाठी ३९० पदके राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोषित केली. 

घोषित सन्मानांमध्ये एक अशोक चक्र, एक कीर्ती चक्र, १४ शौर्य चक्रे, २८ परमविशिष्ट सेवा पदके, चार उत्तम सेवा युद्ध पदके, अतिविशिष्ट सेवेसाठीचे दोन बार, ४० अतिविशिष्ट सेवा पदके, दहा युद्धसेवा पदके, सेना पदकांचे दोन बार (शौर्यासाठी) आणि ८६ सेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे. 

जम्मू-काश्‍मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यातील चांदेरगर येथे १८ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या कारवाईत कॉर्पोरल ज्योती प्रकाश निराला यांना दहशतवाद्यांबरोबर सामना करताना वीरमरण आले.



सीबीआयमध्ये नव्या सहसंचालकांची नियुक्ती 
केंद्र सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय ) सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती केली आहे.

गुजरात केडरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रवीण सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय ) सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासह इतर पाच अशा एकूण सहा नव्या सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली. 

प्रवीण सिन्हा हे १९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेत आहेत. सध्या ते केंद्रीय दक्षता आयोग विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. 

सिन्हा आणि इतर पोलिस अधिकारी अजय भटनागर आणि पंकज कुमार श्रीवास्तव यांचा सीबीआयने सहसंचालक म्हणून समावेश केला आहे. 

तसेच यामध्ये भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी शरद अगरवाल, गजेंद्र कुमार गोस्वामी आणि व्ही. मुरुगेसन यांचाही तपास अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला. यातील तीन अधिकारी हे सध्या पोलिस उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.


७९५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर
प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी ७९५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उद्या त्यांना पदक दिले जाणार आहे.

त्यामध्ये १०७  कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदक (Gallantry Awards), ७५ कर्मचाऱ्यांना अतुलनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि ६१३ कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक दिले जात आहेत.



युवा शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या चार नव्या योजना
भारतात संशोधनाला वाव देण्यासाठी देशातील तरुण शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

‘टीचर असोसिएटशीप फॉर रिसर्च एक्सेलंस (TARE)’ योजना – संशोधन करण्यासाठी IIT, IISc किंवा CSIR अश्या राष्ट्रीय संस्थांसारख्या आघाडीच्या शासन पुरस्कृत संस्थांबरोबर शिक्षकांना जोडणार. अश्या शिक्षकांना पगाराव्यतिरिक्त प्रत्येकी पाच लाख रुपये वार्षिक आणि दरमहा ५ हजार रुपये खर्चासाठी मिळणार.

‘ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरल फेलोशिप’ योजना – १०० पीएचडी विद्वानांना त्यांच्या डॉक्टर पदवीच्या संशोधनादरम्यान १२ महिन्यापर्यंत परदेशात विद्यापीठ/प्रयोगशाळांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी मदत दिली जाणार. प्रत्येकाला दरमहा $2,000 शिष्यवृत्ती तसेच प्रवासासाठी व व्हिसा शुल्क भरण्यासाठी एकरकमी ६०००० रुपये आकस्मिक भत्ता देण्यात येईल.

डिस्टिंग्वीश इंवेस्टिगेटर अवॉर्ड – विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ / विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या प्रकल्पांच्या प्रधान अन्वेषकांना जास्तीत जास्त १०० फेलोशिप दिली जाणार. त्यांना तीन वर्षांसाठी दरमहा १५००० रुपये दिले जाणार आणि प्रकल्पाच्या प्रस्तावित प्रस्तावावर आधारित पर्यायी संशोधन अनुदान देण्यात येईल.

‘ऑग्युमेंटिंग रायटिंग स्किल्स फॉर आर्टिकुलेटिंग रीसर्च (AWSAR)’ योजना विज्ञानाविषयक लिखाणाला प्रोत्साहन देण्यासाठी २०००० हून अधिक पीएचडी विद्वानांना त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यासाठी मदत दिली जाणार.