आर.बी. पंडित ‘आयएनए’चे नवे कमांडंट 
मूळचे पुण्याचे असलेले व्हाइस ऍडमिरल आर.बी. पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील ‘इंडियन नेव्हल ऍकॅडमी’चे मावळते कमांडंट एस.व्ही. भोकरे यांच्याकडून कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नेव्ही मेडल या पदकांनी भूषविण्यात आले आहे. 


लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी.टी. पंडित यांचे ते पुत्र आहेत. व्हाइस ऍडमिरल पंडित हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी छात्र आहेत. 

तसेच, ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन, द कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेयर मुंबई आणि द रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज लंडन’चे देखील माजी छात्र आहेत. पाणबुडी विरोधी युद्धतंत्रामध्ये ते पारंगत आहेत. 

त्यांनी ‘आयएनएस निर्घात, आयएनएस विंध्यगिरी, आयएनएस जलश्‍व’ आणि 22व्या ‘मिसाईल व्हेसेल स्क्वाड्रन’ मुंबईचे नेतृत्व केले आहे. 

पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात नौदल सल्लागार, तसेच ‘इंटिलिजेंट हेडक्वार्टर’ येथे नौदलाच्या दक्षिण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांना एडिमला येथील ‘आयएनए’च्या कमांडंट पदावर पदोन्नती देण्यात आली. 

व्हाइस ऍडमिरल एस.व्ही. भोकरे यांनी २० मे २०१६ मध्ये कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात ‘आयएनए’मध्ये पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण सुविधांमध्ये उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. पारंपरिक ‘पुलिंग आउट’व्दारे त्यांना निरोप देण्यात आला.



रतन टाटा यांना ‘महाउद्योगरत्न’ पुरस्कार 
टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटा यांना औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘महाउद्योगरत्न’ या राज्याच्या सर्वोच्च उद्योग पुरस्काराने गौरवण्यात आले; तर रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांना या वेळी ‘महाउद्योगश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 

मुंबईत सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. 

वस्त्रोद्योगातून राज्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना महाउद्योगश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेमंड समूह १९२५ मध्ये ठाण्यात सुरू झाला. आज राज्यभर त्याचा विस्तार आहे. त्यासाठी सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल सिंघानिया यांनी आभार मानले.



हैदराबादचे नवाब फझल बहादूर यांचे निधन
हैदराबादचे सातवे व शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान याचा पुत्र नवाब फझल जाह बहादूर (वय७२) यांचे अल्प आजारामुळे निधन झाले, अशी माहिती या राजघराण्यातील सदस्याने १९ फेब्रुवारी रोजी दिली.

नवाब फझल जाह यांना गेल्या १५ फेब्रुवारी रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे नवाब नजफ अली खान यांनी सांगितले. नजफ अली हे सातव्या निजामाचे नातू आणि निजाम कुटुंब कल्याण संघटनेचे अध्यक्ष आहेत.



पंतप्रधानांच्या हस्ते मैसूरमध्ये रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला कर्नाटकच्या मैसूर रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

प्रकल्पांमध्ये, मैसूर आणि KSR बेंगळूरु दरम्यानच्या रेलमार्ग विद्युतीकरणाचे राष्ट्रार्पण; मैसूर आणि उदयपूर दरम्यानच्या पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेसचा शुभारंभ; यांचा समावेश आहे.


स्वच्छ पाणी आणि स्वच्छ ऊर्जेसंबंधी ब्रिटन-भारत संशोधन प्रकल्पांना सुरुवात
ब्रिटन-भारत संबंधातून १३५ कोटी रुपये (£15 दशलक्ष) खर्चाच्या ‘पाणी गुणवत्ता संशोधन’ आणि ‘निर्मित पर्यावरणामध्ये ऊर्जा मागणीत कमतरता’ यासंबंधी संशोधन प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली आहे.

‘पाणी गुणवत्ता संशोधन’ कार्यक्रमात ८ प्रकल्प तर ‘निर्मित पर्यावरणामध्ये ऊर्जा मागणीत कमतरता’ कार्यक्रमात ४ प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली.



ख्रिस्टियन कोलमन याने ६० मीटर धावशर्यतीचा जागतिक विक्रम मोडला
ख्रिस्टियन कोलमन या धावकाने सर्वाधिक वेगवान ६० मीटर धावशर्यत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला आहे.

कोलमनने २० वर्षांपूर्वी मॉरिस ग्रीनने केलेला ६.३९ सेकंदांचा विक्रम मोडला. जागतिक विक्रम मोडत ही शर्यत ६.३४ सेकंदात पूर्ण केली.

न्यू मेक्सिकोमध्ये आयोजित ‘यूएस इनडोअर ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप २०१८’ स्पर्धेत हा विक्रम केला गेला.



‘जागतिक पर्यावरण दिन २०१८’ चे जागतिक यजमानपद भारताकडे
५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिन २०१८’ साजरा करण्यासाठी जागतिक यजमानपद भारताकडे देण्यात आले आहे आणि यासंबंधी UN चा भारताशी करार झाला.

यजमानपदाच्या घोषणेच्या प्रसंगी, १९ फेब्रुवारी २०१८ रोजी नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात इलेक्ट्रिक कारसाठी पहिल्या चार्जिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

१९७४ सालापासून दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९७२ साली ५-१६ जून दरम्यान स्टॉकहोम (स्वीडन) येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात पर्यावरणविषयक मुद्द्यांवर पहिली प्रमुख परिषद आयोजित करण्यात आली. 

याच्या स्मृतीत १५ डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून सदस्य राष्ट्रांमध्ये साजरा करण्यासंबंधी ठराव अंगिकारला गेला.

प्रत्येक जागतिक पर्यावरण दिवशी UNEP सोबत हा दिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या देशाची निवड केली जाते. यावर्षी UNEP आणि कॅनडा हे संयुक्तपणे कार्यक्रम राबववित आहेत.