मुंबईत ‘इंडिया रबर एक्सपो 2019’ या प्रदर्शनीचे उद्घाटन 
17 जानेवारी 2019 रोजी मुंबईत केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 10व्या ‘इंडिया रबर एक्स्पो’ या प्रदर्शनीचे उद्‌घाटन करण्यात आले.


रबर उद्योगाला चालना देण्यासाठी आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ही तीन दिवस चालणारी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. ही आशियातली सर्वात मोठी रबर प्रदर्शनी आहे. 

यामुळे भारतीय कंपन्यांना एकाच छताखाली नवीन तंत्रज्ञान, माहितीचे आदान-प्रदान, विकास धोरणांची आखणी आणि परदेशी कंपन्यांबरोबर संबंध विकसित करण्याची अनोखी संधी मिळते.

पुढील काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 5 लक्ष कोटी डॉलर्सची होणार आणि उत्पादन क्षेत्राचे या वाढीतील योगदान 20% राहणार आणि यात रबर उद्योग प्रामुख्याने महत्वपूर्ण योगदान देणार असा अंदाज आहे. 
दीडशेहून अधिक देशांच्या बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनांना प्रवेश मिळावा यासाठी भारत सरकारचे प्रयत्न चालू आहेत. 

त्यासाठी म्हणून रबर क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी तसेच उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार राष्ट्रीय रबर धोरण विकसित करीत आहे. गेल्या 13-14 महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी असूनही भारताची निर्यात 10 टक्क्यांनी वाढली आहे.



‘उन्नती’ (UNNATI) – ISROचा उपग्रह बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रम
17 जानेवारी 2019 रोजी बेंगळुरूमध्ये ‘उन्नती’ (युनिस्पेस नॅनोसॅटेलाईट असेंब्ली अँड ट्रेनिंग – UNNATI) या नावाने एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. बेंगळुरूमध्ये मुख्यालय असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

‘उन्नती’ (युनिस्पेस नॅनोसॅटेलाईट असेंब्ली अँड ट्रेनिंग – UNNATI) हा कार्यक्रम ISROच्या यू. आर. राव उपग्रह केंद्र (बेंगळुरू) या संस्थेकडून 3 तुकड्यांमध्ये तीन वर्ष चालवला जाणार आहे आणि 45 देशांच्या अधिकार्‍यांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवते. 17 जानेवारीपासून पहिल्या तुकडीला सुरूवात झाली आहे, ज्यामध्ये 17 देशांमधून 30 प्रतिनिधींचा सहभाग आहे.

हा कार्यक्रम नॅनो-उपग्रहांच्या विकासासंदर्भात क्षमता निर्मितीसाठीचा एक कार्यक्रम आहे. “बाह्य अंतराळाचा शोधकार्यासाठी आणि शांततेसाठी वापर विषयक” संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या परिषदेला पूर्ण झालेल्या 50 वर्षांच्या (UNISPACE-50) स्मृतीत ISROने हा पुढाकार घेतला आहे. 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नॅनोउपग्रहांचे बांधणी, एकात्मिकरण आणि चाचणी अश्या क्षेत्रांना बळकटी आणण्यासाठी भाग घेणार्‍या विकसनशील देशांना संधी प्रदान केली गेली आहे.


इस्त्रोने सॅटेलाईटशी जोडले रेल्वे इंजिन 
रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांना आता रेल्वेच्या स्थितीची माहिती सहज आणि अचूक मिळणार आहे. रेल्वेने आपले इंजिन इस्त्रोच्या उपग्रहाशी जोडले आहेत. त्यामुळे उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे आगमन आणि प्रस्थानांची माहिती नोंदवणे सोपे जाणार आहे. यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसेल.

रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षांत ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. रेल्वेच्या आगमन, प्रस्थानाची माहिती मिळणे आणि कंट्रोल चार्ट नोंदवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) उपग्रहावर आधारित रिअल टाइम ट्रेन इन्फर्मेशन सिस्टिमचा (आरटीआयएस) वापर सुरू करण्यात आला आहे.


ही प्रणाली 8 जानेवारीला माता वैष्णोदेवी-कटरा वांद्रे टर्मिनस, नवी दिल्ली- पाटणा, नवी दिल्ली-अमृतसर आणि दिल्ली-जम्मू मार्गावरील काही मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेत अंमलात आली आहे.

नव्या प्रणालीमुळे रेल्वेला आपल्या नेटवर्कमध्ये रेल्वेच्या संचालनासाठी नियंत्रण तसेच रेल्वे नेटवर्कला आधुनिक करण्यासाठी मदत मिळेल.

इंजिनमध्ये आरटीआयएसयुक्त इस्त्रो व्दारा विकसित गगन जियो पोजिशनिंग सिस्टिमचा वापर केला जात आहे. यामुळे रेल्वेचा वेग आणि स्थितीबाबत माहिती मिळू शकते.



बायोपिकमधून उलगडणार नारायण मूर्तींची यशोगाथा 
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आहे. गेल्या वर्षभरात ‘पॅडमॅन‘, ‘संजू‘, ‘सुरमा‘, ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर‘ असे अनेक चित्रपट आले. 

तर या वर्षात ‘ठाकरे‘, ‘पीएम नरेंद्र मोदी‘, ‘मणिकर्णिका‘, ‘सूपर 30‘ असे अनेक मोठे बायोपिकही येणार आहेत. विशेष म्हणजे लवकरच इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जीवनावरदेखील बायोपिक येणार आहे.

दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी नारायण मूर्ती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अखेर आठ महिन्यांनंतर मूर्ती यांनी चित्रपटाला संमती दिली आहे.