०१. मुंबई-पुण्यास जोडणारी ऐतिहासिक ‘डेक्कन क्वीन’चे आकर्षण ठरलेली ‘डायनिंग कार’ पुन्हा ०१ जून  २०१५ पासून सुरु करण्यात आली आहे. १ जून, १९३०पासून रुळांवर धावणाऱ्या या गाडीत सुरुवातीपासूनच प्रशस्त ‘डायनिंग कार’ची सोय आहे. डेक्कन क्वीनच्या ८६व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही ‘डायनिंग कार’ पुन्हा रुळांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. 


०२. एसटी महामंडळास ०१ जून २०१५ रोजी ६७ वर्षे पूर्ण झाले असून त्यानिमित्त महामंडळाने ‘परिवहन दिन’ साजरा करत या दिवशी एसटीतून प्रवास करणाऱ्यांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. 


०३. रेशनधान्याचा काळाबाजार करणाऱ्या नाशिकमधील पाच व्यापाऱ्यावर प्रथमच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


०४. नाशिकमधील सुरगाणा येथील धान्य गोदामात ३१ हजार क्विंटल धान्याचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. हा अपहार तब्बल ७ कोटी ८४ लाख रुपयांचा आहे. याशिवाय, सिन्नर तालुक्यातील शासकीय गोदामातून पन्नास किलो धान्याच्या २८० गोण्या एका राइस मिलमध्ये नेल्याचेही आढळले आहे.नाशिकमधील धान्य घोटाळ्याप्रकरणी सात तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


०५. विविध आजारांचा सलग तीन वर्षांपासून होत असलेला उद्रेक, नदीच्या काठावरील तसेच लाल कार्ड मिळालेली गावे आणि पाणी टंचाईमुळे राज्यातील ३५०० गावे ‘अतिधोक्या’ची जाहीर करण्यात आली आहेत. पावसाळ्यात साथीच्या विविध आजारांचा प्रचंड उद्रेक होतो. सलग तीन वर्षांपासून गावांमध्ये आजारांचा झालेला उद्रेक, नदी काठावरील गाव, तसेच पाण्याच्या शुद्धीकरणाच्या अभावामुळे मिळालेले लाल कार्ड आणि पाणी टंचाई या सारख्या कारणास्तव अशा गावांना ‘अतिधोक्या’ची गावे म्हणून म्हटले जाते. 


०६. दर वर्षी अशी अतिधोक्याची गावे जाहीर केली जातात. त्या गावांवर आरोग्य खाते लक्ष केंद्रीत करून उपाययोजना करते. राज्यात २९ हजार ६०१ गावे आहेत. त्यापैकी या वर्षी तीन हजार ४८७ गावे अतिधोक्याची गावे म्हणून जाहीर केली आहेत. राज्यातील एकूण १८ टक्के गावे अतिधोक्याची गावे समजली जात आहेत.


०७. मराठी चित्रपटांचे माहेरघर असलेल्या ‘प्रभात’ चित्रपटगृहाचे चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने प्रभात चित्रपटगृह हे नाव बदलून मूळचे ‘किबे लक्ष्मी थिएटर’ हे  नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


०८. दिवंगत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ आता पुस्तकरूपाने मराठी वाचकांच्या भेटीला येत आहे. लक्ष्मण यांचा ‘यू सेड इट’ हा इंग्रजी व्यंगचित्रांचा संग्रह अनुवादाच्या माध्यमातून सात पुस्तकांच्या संचात लवकरच प्रकाशित होणार. त्याचे मराठीतून नाव ‘कस बोललात’ हे असून लेखक अविनाश भोमे आहेत. या अगोदर आरकेंचे ‘लक्ष्मणरेषा’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.


०९. केंद्र सरकारच्या खासदार आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांनी त्यांच्या मतदार संघातील प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची निवड करून २०१९ पर्यंत त्यांचा विकास साधण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेसाठी आमदार निधीसोबत आणखी काही निधी देण्यात येणार आहे. अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.ग्राम विकास विभागाकडून या योजनेचे समन्वय करण्यात येईल.


१०. विधानसभा मतदार संघ शहरी आणि ग्रामीण भागात विभागला गेला असेल, तर ग्रामीण भागातून ग्रामपंचायतींची निवड करायची आहे. तसेच, संपूर्ण शहरी मतदार संघ असल्यास सबंधितांनी त्यांच्या सोयीनुसार जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवड करावी. 


११. मुंबई परिसरातील शहरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना राज्याचील कोणत्याही ग्रामपंचायतीची निवड करण्याची मुभा आहे. विधान परिषद सदस्य त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडू शकतात. या योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये काम करण्यासाठी आमदार निधीबरोबरच राज्य सरकार जोड निधी देणार आहे. 


१२. ग्रामपंचायतींची निवड करताना आमदारांना दोन गोष्टींचे बंधन घालण्यात आले आहे. निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही किमान एक हजार असावी आणि आमदाराला त्यांचे किंवा त्यांच्या पत्नीचे गाव या योजनेसाठी निवडता येणार नाही.


१३. लिंगडोह समितीच्या शिफारशीनुसार शैक्षणिक सत्र २०१५-२०१६ पासून विद्यापीठ व कॉलेज विद्यार्थी परिषदेच्या थेट निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. 


१४. नागपुरात मुख्यालय असलेल्या राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्षपद गेले पाच महिने रिकामे होते. याआधीचे अध्यक्ष डॉ.एरिक भरुचा यांचा कार्यकाळ डिसेंबर २०१४ मध्ये संपल्यानंतर या पदावर डॉ. विलास बर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


१५. ‘इस्रो’ केंद्रांचे नवे संचालक:-
*द्रव इंधन प्रणाली केंद्र (एलपीएससी)- एस. सोमनाथ
*विक्रम साराभाई अवकाश केंद्र (व्हीएसएससी)- डॉ. के. शिवन
*सतीश धवन अवकाश केंद्र (एसडीएससी)- पी. कुन्हीकृष्णन


१६. राष्ट्रपती स्वीडन आणि बेलारूसच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय राष्ट्रपतींची या दोन्ही देशांना ही पहिलीच भेट आहे. स्वीडनच्या अनाभिषिक्त युवराज्ञी व्हिक्टोरिया यांनी आरलँड विमानतळावर मुखर्जी यांचे स्वागत केले. त्यानंतर ‘रॉयल म्युज’येथे स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ (सोळावे) आणि राणी सिल्विया यांनी त्यांचे स्वागत केले.


१७.  नवीन शाळा, तुकड्या सुरू करणे, मंजूर करणे इत्यादीसाठी प्रधान सचिव (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने शिक्षणहक्क कायद्याच्या आधारे पुढील महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत, 
* शाळेतील एकूण विद्यार्थीसंख्येनुसार पहिली ते ५वीसाठी ३०:१ व ६वी ते ८वीसाठी ३५:१ ९वी व १०वीसाठी ४०:१ या प्रमाणात शिक्षकसंख्या ठरवावी 
* विद्यार्थीसंख्या पहिली ते ५वीमध्ये १० आणि ६वी ते ८वी मधे ३७पर्यंत कमी झाल्यास शाळा बंद करावी आणि  ५ वीचे वर्ग ४ थीच्या वर्गांना जोडावेत. 


१८. मॅगीचे उत्पादन करणारी नेस्ले कंपनी तसेच मॅगीची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुजफ्फरपूर न्यायालयाने दिले आहेत. 


१९. अपरंपरागत स्रोतांद्वारे पुढील ५ वर्षात १४, ४०० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पवन उर्जेद्वारे ५००० मेगावॅट, उसाची चिपाडे आणि कृषी कच-यापासून १००० मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पांद्वारे ४०० मेगावॅट, कृषीजन्य अवशेषांद्वारे ३०० मेगावॅट, टाकाऊ औद्योगिक पदार्थांपासून २०० मेगावॅट आणि सौरऊर्जेद्वारे ७५०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे.


२०. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ०१ जून २०१५ पासून खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. देशात सर्व प्रथम पंजाब आणि हरियाणाची राजधानी असणाऱ्या चंदीगडमध्ये खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी घालण्यात आली होती.


२१. गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर  प्रसिध्द मंदिरात प्रवेश घेण्यासाठी बिगर हिंदूंना आता ट्रस्टची (श्री सोमनाथ ट्रस्टची) परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. १२ ज्योर्तिंलिगांपैकी श्री सोमनाथ ” हे पहिले ज्योतिर्लिंग गुजरात मधील सौराष्ट्र या ठिकाणी आहे.सुरक्षतेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


२२. पाकव्याप्त काश्मिरमधील बाल्टीस्तान व गिलगीट भागात  ८ जून २०१५ रोजी निवडणुका घेण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. जम्मू-काश्मीरमधील गिलगिट व बाल्टीस्थान हा भारताचाच भूभाग आहे. ८ जून रोजी तेथे ‘गिलगीट बाल्टीस्तान सबलीकरण आणि स्वयंसेवी सरकार’ या नावाखाली तेथे निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री हे गिलगीट व बाल्टीस्तानचे गव्हर्नर म्हणून काम करतात.


२३. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाईवर हल्ला करणा-या १० दहशतवाद्यांपैकी आठ दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली आहे. मलालावर हल्ल्या केल्या प्रकरणी दहशतवादविरोधी न्यायालयाने या दहा जणांना दोषी ठरवत २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. 


२४. तुरुगांतील दहा पैकी आठ जणांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. नऊ ऑक्टोबर २०१२ रोजी मलाला शाळेतून परत येत असताना बसमध्ये घुसून तालिबान्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये १० जणांना अटक करण्यात आली होती.


२५. अमेरिकेतील मिन्नेसोटा येथे २००५ मध्ये एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली नुकतेच रेव्ह जोसेफ पलनिवेल जेयापॉल (६०) या भारतीय ख्रिश्चन धर्मगुरूने दिली आहे.