* नरसिंग यादवच्या समावेशाबाबत सांशकता

०१. भारताचा आघाडीचा मल्ल नरसिंग यादवच्या रिओ ऑलिम्पिकमधील समावेशाबाबतची साशंकता अद्याप कायम आहे. राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) नरसिंग यादवला क्लिन चीट दिली असली तरी मंगळवारी जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा), ‘नाडा’ने दिलेली क्लिन चीट फेटाळून लावली आहे. त्यामुळे नरसिंग यादववर असलेली ४ वर्षांची बंदी यापुढेही कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


०२. नरसिंग यादवने वाडाकडे आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला असून, याप्रकरणावरील पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

०३. ‘नाडा’च्या अहवालातून क्लीन चीट मिळाल्यानंतर नरसिंग यादवचा रिओ ऑलिम्पिकचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले जात होते. ‘नाडा’च्या निर्णयावर ‘वाडा’ देखील समाधान व्यक्त करेल अशी अटकळ बांधली जात होती. त्यामुळे नरसिंग यादव देखील मोठ्या महत्त्वाकांक्षेने रिओमध्ये दाखल देखील झाला.  


०४. ‘वाडा’ने आज दिलेल्या निर्णयामुळे नरसिंगला मोठा फटका बसला आहे. नरसिंगचे हे प्रकरण आता क्रीडा लवादकडे जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

०५. नरसिंगचा पहिला सामना १९ ऑगस्ट रोजी होणे अपेक्षित आहे. त्याच्या एक दिवसआधी ‘वाडा’ आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे १८ ऑगस्ट रोजी ‘वाडा’कडून जाहीर करण्यात येणाऱया निर्णयावर नरसिंगचे भविष्य अवलंबून आहे.

०६. ‘वाडा’कडून ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी नरसिंगची चाचणी घेतली जाऊ शकते. या चाचणीत तो दोषी आढळला तर तो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. ‘वाडा’ने जर असे केले नाही व नरसिंगने जर पदक पटकावले, तर नियमानुसार त्याची चाचणी होईल. यात तो दोषी आढळला तर त्याचे पदक काढून घेतले जाईल.



* ऑलिम्पिक २०१६
०१. ब्रिटनची लांब पल्ल्याचा धावपटू फराहने निराशाजनक सुरुवातीनंतर जेतेपद राखताना रिओ ऑलिम्पिकमध्ये १० हजार मीटर दौड स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळविला. ऑलिम्पिकमध्ये फराहने तिसऱ्यांदा सुवर्ण पटकाविण्याची कामगिरी केली. 

०२. ३३ वर्षीय फराह शर्यतीदरम्यान पडल्यानंतरही पुन्हा उठला आणि अंतिम टप्प्यात रंगतदार स्थितीत पोहोचलेल्या रेसमध्ये २७ मिनिट ५.१७ सेकंद वेळेसह बाजी मारली. फराह ऑलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा सुवर्णपदकाचा मान मिळविणारा ब्रिटनचा पहिला धावपटू ठरला.

०३. फराहने लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये ५ हजार आणि १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

०४. जमैकाची एलेनी थॉम्पसन महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत नवी चॅम्पियन ठरली. 
महिलांच्या १०० मीटर स्पर्धेत एलेनीने मायदेशातील सहकारी शैली एन फ्रेजर प्राईसला पिछाडीवर सोडताना सुवर्णपदक पटकावले. एलेनीने १०.७१ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदक पटकावले.


०५. पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत दक्षिण आफ्रिकेच्या वेड व्हॅन निएकर्क याने विश्‍वव्रिकमासह सुवर्णपदक पटकावले. त्याने ४३.०३ सेकंदात शर्यत पूर्ण केली. तब्बल सतरा वर्षे अबाधित विक्रम त्याने मोडीत काढला. त्याने १९९९ मध्ये नोंदवलेल्या अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनचा ४३.१८ सेकंदाचा विक्रम मागे टाकला. 

०६. आठव्या लेनमधून धावताना २४ वर्षी व्हॅन निएकर्क याने शर्यतीच्या दुसऱ्या टप्प्यात वेग वाढवून आपली आघाडी भक्कम केली. त्याची ती धाव इतकी वेगवान होती की विश्‍वविक्रम केल्यावरच ती थांबली. 

०७. व्हॅन निएकर्क हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा विजेता ठरला. यापूर्वी १९२० मध्ये बेवील रुड याने ४९.६ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक जिंकले होते.

०८. ग्रेनाडाच्या गत विजेत्या किरानी जेम्स याने ४३.७६ सेकंद वेळ देत रौप्यपदक पटकावले. 
अमेरिकेच्या लाश्‍वान मेरिट या २००८ मधील विजेत्याला ४३.८५ सेकंदासह ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या तीनही स्पर्धकांनी ४४ सेकंदाच्या आत शर्यत पूर्ण केली. स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी पहिल्यांदाच झाली.



* राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पदक
०१. राज्य पोलिस दलातील ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर करण्यात आले. यात नक्षलग्रस्त भागातील १० पोलिस, उल्लेखनीय सेवेसाठी ०३, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक मिळविणाऱ्या ३७ जणांचा समावेश आहे. 

०२. नक्षलग्रस्त भागातील पोलिस उपनिरीक्षक अतुल तावडे, पोलिस नाईक इंदरशाह सडमेक, पोलिस नाईक विनोद हिचामी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पदकाचा मान मिळाला आहे.

०३. उल्लेखनीय सेवेसाठी पदक मिळालेल्या अधिकाऱ्यांत अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतसिंग सरंगल यांचा, तर गुणवत्तापूर्ण सेवेकरिता २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण जाधव, पोलिस उपायुक्त संजय शिंदे, श्रीप्रकाश वाघमारे, राजेंद्र दाभाडे यांच्यासह ३७ जणांचा समावेश आहे.



* शौचालय निर्मितीत महाराष्ट्र प्रथम

०१ ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.‘स्वच्छ भारत शहर अभियाना’स महाराष्ट्रात १५ जून २०१५ रोजी सुरवात झाली. 

०२. महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण असा संपूर्ण हागणदारीमुक्त होण्याचा प्रथम मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे.

०३. महाराष्ट्रात ही मोहीम राबवण्यात आल्यापासून आतापर्यंत शहरी भागात १,६४,८७१ शौचालयांची उभारणी झाली आहे.

०४. महाराष्ट्रात आतापर्यंत १०० शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत.

०५. राज्याच्या नगर विकास विभागातर्फे मोहीम राबवताना लोकसहभागातूनही उभारणी केली जात आहे. तसेच यासाठी एका लाभार्थीला जास्तीत जास्त १७ हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते. यामध्ये केंद्र सरकार ४ हजार, राज्य सरकार ८ हजार रुपये व स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त ५ हजार रुपये इतकी मदत करते.