* दिलशानची क्रिकेटमधून निवृत्ती

०१. मधल्या फळीतील उपयुक्त फलंदाज ते धडाकेबाज सलामीवर असे संक्रमण, ‘दिलस्कूप’ या अनोख्या फटक्याचा जनक, भागीदाऱ्या फोडण्यात पटाईत चतुर फिरकीपटू आणि अफलातून क्षेत्ररक्षक अशा खऱ्या अर्थाने अष्टपैलू तिलकरत्ने दिलशानच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला.

०२. ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी ट्वेन्टी-२० लढत हा माझ्या कारकीर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल, असे दिलशानने जाहीर केले होते.




* सेरेना विल्यम्सचे अव्वल स्थान संपुष्टात
०१. जेतेपदे आणि विक्रम यांवर मक्तेदारी राखणाऱ्या सेरेना विल्यम्सला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिसकोव्हाच्या सनसनाटी विजयाने सेरेनाचे २३वे ग्रँड स्लॅम जेतेपदाचे स्वप्न संपुष्टात आणले. 

०२. तसेच कॅरोलिन वोझ्नियाकीला नमवत अंतिम फेरी गाठणाऱ्या अँजेलिक कर्बरचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान पक्के झाले आहे.

०३. दहाव्या मानांकित प्लिसकोव्हाने कारकीर्दीतील पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळताना सेरेनावर सरळ सेट्समध्ये ६-२, ७-६ (७-५) असा विजय मिळवला. 

०४. महिला टेनिसमध्ये सलग १८६ आठवडे क्रमवारीत अव्वल स्थानी राहण्याचा मान सेरेना आणि स्टेफी ग्राफ यांच्या नावावर संयुक्तपणे आहे.



* पॅरालिम्पिकमध्ये भारताची चमकदार कामगिरी
०१. रिओ ऑलिम्पिकमधील भारताच्या निराशाजनक कामगिरीला दूर करत पॅरालिम्पिकपटूंनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली. 

०२. उंच उडी प्रकारात मरियप्पन थंगवेलू याने १.८९ मीटर उडी मारत  सुवर्ण तर वरूण भाटीनेही याच प्रकारात १. ८६ मीटर उडी मारत कांस्य पदक पटकावले. अमेरिकेच्या सॅम ग्रेवीनेही १.८६ मीटर उडी मारून रौप्य पदक पटकावले. 

०३. पॅरालिम्पिकमध्ये भारताने तब्बल १२ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये हेजवर्ग पॅरालिम्पिकमध्ये तर भालाफेकपटू देव झाजरिया याने २००४ च्या अथेन्स सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. थंगवेलू हा तिसरा भारतीय सुवर्णपदक विजेता ठरला आहे.

०४. भारताने पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत १० पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.



* राष्ट्रीय स्मारक स्थळी प्लास्टिकवर बंदी
०१. राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात प्लॅस्टिक वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने शुक्रवारी घेतला. २ ऑक्टोंबरपासून गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आणि स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्मारक परिसरात प्लॅस्टिक वापरावर बंदी आणण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. 

०२. या निर्णयानंतर राष्ट्रीय स्मारक परिसराच्या १०० मीटरच्या परिसरात प्लॅस्टिकचा वापरावर बंदी करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक नष्ट होत नसल्यामुळे यापूर्वीच ५० मायक्रोनच्या प्लॅस्टिक बॅग तसेच अन्य उत्पादनावर सरकारने बंदी आणली आहे. 

०३. २०१४ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंती दिवसाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले होते.

०४. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आता ताजमहाल, लाल किल्ला, चारमिनार याठिकाणी भ्रमंती करणाऱ्यांनी प्लॅस्टिक बॅग अथवा पॉलिथीन वापरावर आवर घालावी लागेल. 



* विमानात सॅमसंग नोट ७ वापरावर बंदी 
०१. सॅमसंग नोट ७ मध्ये चार्जिंग दरम्यान स्फोट झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात हवाई प्रवासादरम्यान सॅमसंग नोट ७ वर निर्बंध घालण्यात आलेत. हवाई वाहतूक संचालनालयाने यासंदर्भात लेखी परिपत्रक काढून याविषयीची माहिती दिली आहे.

०२. परिपत्रकानुसार चेक इन लगेजमध्ये सॅमसंग नोट ७ नेण्यावर बंदी असेल. मात्र हँडबॅगमध्ये नोट ७ ठेवता येईल. मात्र संपूर्ण प्रवासादरम्यान मोबाईल फोन स्विच ऑफ ठेवणे बंधनकारक असेल असे हवाई वाहतूक संचालनालयाचे प्रमुख बी एस भुल्लर यांनी सांगितले. 

०३. या नियमाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले.

०४. अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन ऍडमिनीस्ट्रेशनने काही दिवसांपूर्वी सॅमसंग नोट ७ वर निर्बंध घातले होते. नोट ७ मध्ये स्फोट होण्याच्या घटनांमुळे हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेने म्हटले होते. विमान प्रवासादरम्यान हा फोन ऑन करु नये किंवा चार्जिंगला ठेऊ नये असेही निर्देश देण्यात आले होते.

०५. ऑगस्टमध्ये सॅमसंगने गॅलेक्सी नोट ७ फोन बाजारात आणला होता. जगभरात चार्जिंग दरम्यान नोट ७ मध्ये स्फोट झाल्याच्या ३५ तक्रारी आल्या होत्या. यानंतर सॅमसंगने सुमारे २५ लाख फोन्स बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेतला होता.



* विद्या बालन समाजवादी पेन्शन योजनेच्या सदिच्छादूत
०१. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शुक्रवारी विद्या बालनची समाजवादी पेंशन योजनेची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केल्याची अधिकृत घोषणा केली. लखनऊमध्ये पार पडलेल्या समारंभात यावेळी विद्या बालनसोबत अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि उत्तप्रदेश खासदार डिंपल यादव देखील उपस्थित होत्या.

०२. समाजवादी पेंशन योजन अंतर्गत राज्यातील ५० लाखांहून अधिक महिलांना दरमहा ५०० रुपये सरकाकडून दिले जातात. मात्र, लाभ घेणाऱ्या महिलांना आपल्याला मिळणारा लाभ कोणामुळे मिळतो, याची कल्पना नसल्यामुळे विद्या बालनच्या माध्यमातून जनतेपर्यंत योजनेचा प्रसार केला जाणार असल्याची माहिती अखिलेश यांनी कार्यक्रमामध्ये दिली. या योजनेअंतर्गत उत्तरप्रदेशमधील वेगवेगळ्या भागात विद्यावर काही व्हिडिओ चित्रित केले जाणार आहेत. 

०३. विद्या बालन यापूर्वी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शौचालय बांधणीचा संदेश देताना दिसली होती.



* ऍसिड हल्ला पीडित तरुणी फॅशनवीक मध्ये सहभागी
०१. अ‍ॅसिड हल्ला झालेल्या तरुणींना धैर्याचा संदेश देण्यासाठी न्यूयॉर्कमधील फॅशनवीकमध्ये अशाच एका हल्ल्यात चेहरा विद्रुप झालेल्या रेश्मा कुरेशी या १९ वर्षांच्या युवतीला सहभागी करण्यात आले होते.  एफटीएल मोडा या फॅशन उत्पादन कंपनीने हा अभिनव उपक्रम राबवला. 

०२. रेश्माने मोठा गाऊन घातला होता तो भारतीय डिझायनर अर्चना कोच्चर यांनी तयार केला होता. तिचे रॅम्पवर आगमन होताच चांगला प्रतिसाद मिळाला.

०३.  कुरेशी हिच्यावर तिच्या दिराने २००४ मध्ये अ‍ॅसिड हल्ला केला होता. तिने त्यात धैर्य खचू दिले नाही तर उलट भारतातील अ‍ॅसिड हल्ला पीडितांसाठी ती धीराचा आवाज बनली. तिने यूटय़ूबवर मेक लव्ह नॉट स्कार्स या संस्थेमार्फत व्हिडिओ टाकल्या आहेत. 

०४. तिने मुंबईतील तिच्या घरी चित्रीकरण केले असून ती मेक अप व ब्युटी टिप्स देते. महिलांविरोधातील गुन्ह्य़ांची चर्चाही तिने चित्रफितींमध्ये केली आहे.