कनिष्ठ नेमबाजी विश्वचषकात भारताचा धडाका कायम

०१. कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखताना पदकांचा षटकार ठोकला. सोमवारी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई केली. या कामगिरीसह भारत १३ (४ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्य) पदकांसह रशियापाठोपाठ(१४) दुसऱ्या स्थानावर आहे.

०२. भारताने पहिल्या दिवशी तीन सुवर्णपदकांसह सात पदकांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळाले. यशस्विनी सिंग, मलाईका गोयल व हर्षदा निथावे यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ११२२ गुणांची कमाई केली. रौप्यपदक जिंकणाऱ्या टर्की संघाला ११०४ गुण मिळाले, तर उजबेकिस्तानने १०८६ गुण नोंदवीत कांस्यपदक मिळविले. 

०३. वैयक्तिक विभागात मार्गारिटा लोमोवा (रशिया), अ‍ॅना देदोवा (चेक प्रजासत्ताक) व अफाफ एल्होदोद (इजिप्त) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळविले.

०४. गौरव राणा, हेमेंद्र कुशवाह व सौरभ चौधरी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने कनिष्ठ पुरुष गटात दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये रौप्यपदक पटकाविले. 

०५. वैयक्तिक गटात अनमोलकुमारने रौप्यपदक मिळविले. त्याने १९७.५ गुण घेतले. रशियाच्या आर्तेम चेनरेसोव याने १९९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर त्याचा सहकारी एवगेनी बोरोवोई याला कांस्यपदक मिळाले.

०६. गायत्री नित्यानंदमने सोनिका व आदिती सिंग यांच्या समवेत ५० मीटर रायफल थ्रीपोझिशन या क्रीडाप्रकारात कांस्यपदक मिळविले. गायत्रीने वैयक्तिक विभागातही कांस्यपदक जिंकले. तिने ४३८.९ गुण नोंदविले. निकोला फोईस्तोवा (चेक प्रजासत्ताक) व ओल्गा एफिमोवा (रशिया) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले. त्यांना अनुक्रमे ४५१.५ व ४५०.६ गुण मिळाले. 

०७. स्कीट प्रकारात अनंतजीतसिंग नरुका, सुखबीरसिंग हरिका व हामझा शेख यांचा समावेश असलेल्या भारतीय संघास कांस्यपदक मिळाले. त्यांना ३३७ गुण मिळाले. रशिया (३६०) व चीन (३३९) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.



मध्यप्रदेशात हृदयरोगी मुलांचा उपचारखर्च राज्य सरकार उचलणार
०१. मध्य प्रदेशात हृदयरोग असलेल्या मुलांचा उपचारांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. सध्या २ लाखांपर्यंतचा खर्च दिला जात होता, पण आता ती मर्यादाही उठवली आहे. 

०२. बालहृदय अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारने या मोहिमेत हृदयरोगग्रस्त मुलांची माहिती गोळा करण्याचे ठरवले आहे. मधुमेह व थॅलेसेमिया हे रोग असलेल्या मुलांनाही मदत केली जाईल. या योजनेत ३७३ मुलांना इंदोर जिल्ह्य़ात उपचार उपलब्ध करून दिले आहेत. 

०३. मध्य प्रदेशात मुलांमध्ये हृदयरोग, मधुमेह व थॅलेसेमियाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे.



ओरॅकल सोबत महाराष्ट्राचा करार
०१. राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा आयाम देण्यासाठी ओरॅकल या जगप्रसिद्ध कंपनीसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत.


०२. ‘ओरॅकल’च्या निमंत्रणावरून हा दौरा होत असून, ही जगप्रसिद्ध कंपनी प्रथमच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार करीत आहे. 
ओरॅकलतर्फे आयोजित ओपन वर्ल्ड या प्रतिष्ठेच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रमुख भाषण होणार आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परिषदेला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

०३. राज्यात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी अभियानात ओरॅकल कंपनी सहभागी होणार आहे. 
राज्यातील स्मार्ट सिटी अभियानासाठी आवश्यक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची उभारणीही ओरॅकलतर्फे करण्यात येणार आहे.



मुंबईत जकात बंद

०१. केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने सेवा व वस्तू कराच्या अंमलबजावणीसंबंधी केलेल्या घाईमुळे मुंबई महापालिकेने १६ सप्टेंबरपासून जकात कर वसूल करणे अवैध ठरले आहे. 


०२. घटनादुरुस्ती करून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंबंधी अर्थ खात्याने घेतलेल्या निर्णयाच्या कलम १७ नुसार जकात कर वसुली अवैध ठरली आहे. या निर्णयानुसार केवळ पेट्रोलजन्य पदार्थ, तसेच तंबाखूवर एक्‍साईज लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

०३. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे आर्थिक गफलत होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यासंबंधी आज दुपारी पत्रक जारी केले. केंद्राच्या या परिपत्रकामुळे एन्ट्री ५१ हा कर आकारणेही अवैध ठरले आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. 

०४. जकात वसुली अवैध ठरली असल्याचे लक्षात येताच महाराष्ट्राच्या अर्थ खात्याने केंद्राशी संपर्क साधला. त्यानंतर लगेचच केंद्रीय महसूल सचिवांनी या निर्णयाचा फेरविचार केला जाईल, असे नमूद केले. 

०५. महाराष्ट्रात सध्या ५० कोटींच्या वर उलाढाल असणाऱ्या प्रतिष्ठानांना एलबीटी कर द्यावा लागतो, पण केंद्र सरकारच्या या परिपत्रकामुळे हा कर आकारणेही बंद होणार आहे.



जगभरात ६.५ कोटी निर्वासित
०१. मायदेशातील युद्धग्रस्त परिस्थितीमुळे स्थलांतर कराव्या लागलेल्या निर्वासितांची संख्या ६ कोटी ५३ लाख इतकी झाली असून, ही संख्या ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले आहे. स्थलांतरितांचा एक देश केल्यास तो लोकसंख्येच्या बाबतीत जगातील २१ वा मोठा देश असेल. अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केली आहे. 

०२. इराक, सीरिया, अफगाणिस्तान, येमेन, जॉर्डन या देशांमधून स्थलांतर करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. या निर्वासितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षेबाबतही प्रश्‍न निर्माण होत आहेत. निर्वासितांच्या भविष्यासाठी गंभीरपणे चर्चा होणे आवश्‍यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

०३. राष्ट्रसंघाने उदाहरण देताना म्हटले की, जगातील सर्व स्थलांतरितांचा मिळून एक देश तयार करायचा झाल्यास, तो सर्वाधिक वेगाने लोकसंख्या वाढणारा देश होईल. या देशातील निम्म्या नागरिकांचे वय १८ वर्षांपेक्षाही कमी असेल. लोकसंख्येच्या बाबतीत हा जगातील २१ वा देश ठरून ५४ वी मोठी अर्थव्यवस्था असेल.



भारत पाक मधील बससेवा पूर्ववत
०१. जम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘कारवां-इ-अमन’ ही भारत व पाकिस्तानमधील शांतता बस सेवा पूर्ववत झाली. 

०२. उरी ते मुझफ्फराबाद आणि पूंछ ते रावळकोट या ठिकाणांना जोडणारी ही बस नेहमीप्रमाणे धावू लागल्या. उरी येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही या बस सेवेस कोणीही आक्षेप घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

०३. उरी व मुझफ्फराबादमधील व्यापारदेखील उद्यापासून (मंगळवार) सुरु होणार आहे. हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हानुद्दीन वणी याला भारतीय लष्कराने ठार केल्यानंतर हा व्यापार खंडित झाला होता. 



अरुणाचल मध्ये जीएसटी मंजूर
०१. वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकाला अरुणाचल प्रदेशने गुरुवारी मंजुरी दिली.  उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री चोवना मेन यांनी जीएसटीबाबतचा ठराव आज विधानसभेत मांडला. याला आवाजी मतदानाने बिनविरोध मंजुरी देण्यात आली. 

०२. जीएसटीला आधीच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली असून, यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणे बाकी आहे.



पेमा खांडू भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री
०१. पेमा खंडू दिवंगत मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयाचे ते पदवीधर आहेत. वडिलांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांचा राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. 

०२. मुक्तो या वडिलांच्या मतदारसंघातून जून २०११ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक बिनविरोध जिंकली. येथूनच ते पुन्हा २०१४ मध्ये बिनविरोध निवडून आले. वयाच्या ३७ वर्षी ते १७ जुलै २०१६ रोजी ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. 

०३. देशातील वर्तमान (२० सप्टेंबर २०१६) मुख्यमंत्र्यांमध्ये पेमा खांडू सर्वांत तरुण मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी अखिलेश यादव हे देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे वर्तमान मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री आहेत.

०४. सार्वकालीन मुख्यमंत्र्यांपैकी पुडुचेरीचे माजी मुख्यमंत्री एम.ओ. हसन फारूक हे आतापर्यंतचे देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. ९ एप्रिल १९६७ रोजी वयाच्या २९ व्या वर्षी प्रथम वेळेस ते पुडुचेरीचे मुख्यमंत्री बनले होते.