भारताकडून एल-आर सॅम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

०१. हवाई सुरक्षा वाढवण्यासाठी भारताने नवीन लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या केली आहे. हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. 


०२. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मोबाइल प्रक्षेपकावरून एकात्मिक चाचणी क्षेत्रातून चंडीपूर येथे ही चाचणी सकाळी सव्वादहा वाजता करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, या क्षेपणास्त्राच्या अनेक चाचण्या केल्या जाणार आहेत असे सांगितले.

०३. या क्षेपणास्त्राव्यतिरिक्त मल्टी फंक्शनल अँड थ्रेट अ‍ॅलर्ट रडार या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली आहे. ही यंत्रणा क्षेपणास्त्र दिशादर्शन, मार्ग व शोधन यासाठी वापरली जाते. ३० जून ते १ जुलै २०१६ या तीन दिवसांत या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी तीनदा घेण्यात आली होती. डीआरडीओ व इस्रायल यांनी हे क्षेपणास्त्र तयार केले आहे. या क्षेपणास्त्राने शेवटच्या मिनिटाला लक्ष्यभेद केला.

०४. भारतीय नौदलाने एलआर-सॅम या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. आयएनएस कोलकातावरून ३० डिसेंबर २०१५ रोजी ही चाचणी करण्यात आली. ही क्षेपणास्त्रे लष्कराच्या तीनही सेनादलांत चाचणीनंतर तैनात केली आहे. बेल, एल अँड टी, बीडीएल, टाटा या समूहांनी खासगी क्षेत्रातील भागीदार म्हणून त्यात काम केले आहे.


०५. बालासोर जिल्हय़ात २.५ किमी त्रिज्येच्या परिसरातील ३६५२ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.


प्लूटोवरील बर्फाचे रहस्य उलगडले
०१. प्लूटो बटू ग्रहावरील हृदयाच्या आकाराचा नायट्रोजन हिमनदीचा भाग कसा तयार झाला असावा याचे कोडे वैज्ञानिकांनी उलगडले आहे. नासाच्या प्लुटो न्यू होरायझन्स यानाने गेल्या वर्षी बर्फाळ प्लुटो ग्रहाचे निरीक्षण केले होते. 

०२. फ्रान्समधील एका प्रयोगशाळेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की प्लूटो हा वेगळा ग्रह आहे. तेथे नायट्रोजनचे संघनन विषुववृत्तावर अत्यंत कमी उंचीच्या भागात झाले आहे. त्यामुळे स्पुटनिक प्लॅनम भागात बर्फाचे अनेक थर साठलेले आहेत. प्लूटोवरील इतर घटकांचे वितरण व वातावरणातील त्यांच्या प्रमाणाचा विचार करण्यात आला आहे. प्लूटोच्या पृष्ठभागावरील बर्फ व नायट्रोजन अस्थिर असून जेव्हा त्याचे संप्लवन होते, तेव्हा तपमान उणे २३५ अंश असते. यात विरळ वातावरणाचा थर बर्फाच्या विवरात तयार झाला आहे. 

०३. न्यू होरायझन्स यानाने प्लूटोजवळून जुलैत प्रवास केला असून त्यात संबंधित विवरातील घन नायट्रोजन हा खूप वस्तुमानाचा असल्याचे म्हटले आहे, स्पुटनिक प्लानम भागात त्याचे प्रमाण जास्त आहे. मिथेनचे धुके उत्तर अर्धगोलार्धात असून विषुववृत्तावरही ते सापडते. कार्बन मोनॉक्साइडचा बर्फ स्पुटनिक प्लानम या भागात सापडतो.

०४. वैज्ञानिकांनी प्लूटो या बटू ग्रहाचे अंकीय प्रारूप तयार केले असून नायट्रोजन, मिथेन व कार्बन डायॉक्साइड यांसारख्या चक्रांचे त्यात सादृश्यीकरण करण्यात आले. प्लूटोवर घन व वायू यांचा समतोल बघितला, तर त्याला स्पुटनिक प्लानममध्ये अडकलेले बर्फ कारणीभूत आहे.



कनिष्ठ नेमबाजीत भारताचा धडाका कायम
०१. भारतीय नेमबाजांनी दिमाखदार प्रदर्शन कायम राखत कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी चार पदकांची कमाई केली. 

०२. ऋषीराज बारोतने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. १९ वर्षीय ऋतुराजने अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या ल्युकास स्युकोमलवर २५-२३ अशा फरकाने मागे टाकत बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या सर्जेय इव्हलेव्हसकीने कांस्यपदक मिळवले.

०३. मंगळवारी चार पदकांवर नाव कोरत भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी कायम आहे. भारताच्या खात्यावर सहा सुवर्ण, चार रौप्य आणि आठ कांस्यपदके यांच्यासह एकूण १८ पदके आहेत. २१ पदकांसह रशिया गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

०४. प्रतीक बोरसे, अर्जुन बाबुटा आणि प्रशांत या त्रिकुटाने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. या त्रिकुटाने १८४९.९ गुण मिळवले. सिंगापूरच्या संघाने रौप्य तर जपानच्या संघाने कांस्यपदकाची कमाई केली.

०५. अनमोल, निशांत भारद्वाज आणि अर्जुन दास या त्रिकुटाने ५ मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्यांनी १६०० गुणांची कमाई केली.

०६. १० मीटर एअर रायफल प्रकारात मुलींमध्ये दिलरीन गिल, गीतालक्ष्मी दीक्षित आणि आशी रस्तोगी या त्रिकुटाने कांस्यपदक पटकावले.



स्मार्ट सिटी योजनेत आणखी २७ शहरे समाविष्ट
०१. सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेच्या पुढील टप्प्यात निवडण्यात आलेल्या शहरांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यादीमध्ये एकूण २७ शहरे आहेत. त्यामध्ये राज्यातील पाच शहरांचा समावेश आहे. 

०२. औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे या पाच शहरांची स्मार्टसिटीच्या पुढील टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे. 

०३. या टप्प्यासाठी निवडण्यात आलेल्या अन्य शहरांमध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि उज्जैन, पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर, राजस्थानमधील अजमेर आणि कोटा, आंध्र प्रदेशातील तिरुपती, गुजरातमधील बडोदा, उत्तर प्रदेशातील कानपूर, वाराणसी आणि आग्रा कर्नाटकमधील हुबळी-धारवाड, मंगळुरू, शिवमोगा आणि तुमाकुरू यासह इतर राज्यांतील शहरांचा समावेश आहे.


०४. स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांची निवड झाली होती.






वृक्षारोपणात महाराष्ट्राची लिम्का बुकमध्ये नोंद
०१. महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत १ जुलै रोजी २ कोटी ८० लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे.

०२. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण विभागाने संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. तसेच यामध्ये १ जुलै रोजी केवळ बारा तासांमध्ये २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ रोपे लावण्यात आली. त्यामध्ये राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 

०३. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर केले आहे.