गुरूच्या ‘युरोपा’ या चंद्रावर पाण्याच्या वाफा
०१. गुरूच्या ‘युरोपा’ या चंद्रावर पाण्याच्या वाफा असल्याचे दिसून आले असून या चंद्रावर सूक्ष्मजीवसृष्टी असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.


०२. नासाच्या हबल अवकाश दुर्बीणीच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले आहे. अ‍ॅस्ट्रॉफिजिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून युरोपाच्या संशोधनासाठी जर यान पाठवले तर तेथील काही मैलांच्या प्रदेशातील बर्फाचे उत्खनन न करताही महासागराचे निरीक्षण करता येईल.

०३. गुरूच्या ६७ चंद्रांपैकी युरोपा हा सर्वात मोठा चंद्र असून २०१३ च्या अखेरीस तेथे पाण्याच्या वाफा हबल दुर्बीणीला दिसून आल्या होत्या. वैज्ञानिक जगतात हा उत्कंठावर्धक शोध मानला जात आहे. पाण्याच्या वाफा २०० कि.मी. उंचीवर जातात. त्यामुळे तेथे पाऊसही पडतो.

०४. युरोपा चंद्राभोवती पातळ वातावरण असून त्यात गुरूचा प्रकाश रोखण्याची क्षमता आहे. त्यामुळे सावलीसारखे दृश्य दिसते. युरोपा गुरूसमोरून तीन वेळा तरी जातो.



भारत-जपानमध्ये ऐतिहासिक अणुकरार
०१. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान भारत आणि जपानमध्ये ऐतिहासिक अणुकरारावर स्वाक्षरी झाली. विशेष म्हणजे जपानने पहिल्यांदाच अण्विक प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न करणाऱ्या देशाबरोबर अणुकरार केला आहे.


०२. डिसेंबर २०१५ मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दोन्ही देशांनी नागरी अणुकराराबाबतचा निर्णय घेतला होता. अणुउर्जा प्रकल्पांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जपानकडे असलेल्या तंत्रज्ञानाला जगभरात सर्वोत्तम मानले जाते.

०३. भारताने आतापर्यंत अमेरिकेसह ११ देशांसह नागरी अणुकरार केला आहे.

०४. यावेळी अणुपुरवठादार देशांच्या समूहातील समावेशाला पाठिंबा देणाऱ्या जपानच्या पंतप्रधानांचे नरेंद्र मोदी यांनी विशेष आभार मानले.



पुन्हा येणार एक हजाराची नोट
०१. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्याने एक हजाराची नोट इतिहासजमा झाल्याची चर्चा रंगली होती. पण एक हजाराची नोट पुन्हा एकदा बाजारपेठेत दाखल होणार आहे. 

०२. आगामी काही महिन्यांमध्ये नवीन रुपात आणि नवीन रंगात एक हजाराची नोट पुन्हा एकदा चलनात येतील अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी दिली आहे.

०३. आगामी काही महिन्यांमध्ये एक हजाराची नोट पुन्हा एकदा चलनात आणली जाईल. नवीन रंग,नवीन डिझाईन आणि नवीन क्रमांकासह या नोटा बाजारात उपलब्ध होतील असे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व बँकेतील दोन ते तीन अधिकारी नवीन नोटांची डिझाईन करण्याची तयारी करत आहेत असे ते म्हणालेत.

०४. केंद्र सरकारने काळा पैशावर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने बुधवारी मध्यरात्रीपासून पाचशे आणि एक हजाराची नोट रद्द करण्याची घोषणा केली होती. 

०५. या नोटांऐवजी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात येतील असे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यामुळे एक हजार रुपयांची नोट इतिहास जमा झाल्याची चर्चा रंगली होती.



आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी बात्रा
०१. हॉकीच्या जागतिक स्तरावर युरोपियन संघटकांचीच सत्ता मानली जाते. त्यांच्या वर्चस्वाला धक्का देत हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंदर बात्रा यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) अध्यक्षपद आपल्याकडे घेतले आहे. अध्यक्षपदी प्रथमच भारतीय संघटकाची निवड झाली आहे.

०२. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत बात्रा यांनी ६८ मते मिळविली. त्यांचे प्रतिस्पर्धी डेव्हिड बलबिर्नी यांना २९ मते, तर ऑस्ट्रेलियाचे केन रीड यांना १३ मते मिळाली. 

०३. बात्रा यांना आशियाई, आफ्रिकन व मध्य अमेरिकेतील देशांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला होता. एफआयएचचे मावळते अध्यक्ष लिनाद्रो नेग्रे यांनीही बात्रा यांच्याकडे अध्यक्षपद येण्यासाठी प्रयत्न केले. 

०४. बात्रा यांच्याकडे चार वर्षे अध्यक्षपद राहणार असून त्यांनी लगेचच या नवीन पदाचे कामकाज सुरू केले.



तब्बल ६७ वर्षानंतर ‘हिट विकेट’ होणारा विराट पहिला भारतीय कर्णधार
०१. इंग्लंडविरोधात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथा दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीची हिट विकेट पडली. यापूर्वी देखील कोहली इंग्लड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हिट विकेटचा शिकार ठरला होता. 

०२. इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिदच्या षटकामधील चेंडूला कोहलीने सक्षमपणे टोलवले. मात्र चेंडू टोलवत असताना, बॅकपूटचा अंदाज चुकल्याने विराटचा पाय विकेटला लागला. क्रिकेटच्या नियमानुसार, विराट हिट विकेटचा शिकार बनला. 

०३. दरम्यान, कसोटी क्रिकेट सामन्यात अशा पद्धतीने बाद होणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. या पूर्वी १९४९ मध्ये लाला अमरनाथ यांची अशीच विकेट गेली होती. तसेच यापूर्वी २००२ मध्ये व्हीव्हीएस लक्ष्म्णची वेस्ट इंडिजविरोधात खेळताना हिट विकेट गेली होती.

०४. विराट यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारे बाद झाला आहे. १६ सप्टेबर २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळतानाच १०७ धावा करुन विराटने तंबूचा रस्ता धरला होता. यावेळी इंग्लंडचा फिरकीपटू ग्रेम स्वानच्या गोलंदाजीवर विराट हिट विकेट झाला होता.



पतंजलीचे दुग्ध व्यवसाय स्पर्धेत पदार्पण
०१. पतंजलीने आता दुग्ध व्यवसायात पदार्पण करत असून, नगर जिल्ह्यातील खडकाफाटा (ता. नेवासे) येथे त्यांचा पहिला दूध प्रकल्प सुरू होत आहे.

०२. पतंजलीचा तूप व दुग्धजन्य पदार्थनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ १६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, योगगुरू रामदेवबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

०३. यापूर्वी खासगी कंपन्यांकडून गायीचे तूप व दुधाची पावडर खरेदी करून त्याची विक्री पतंजलीच्या बॅण्डनेमने केली जात होती. 

०४. पहिल्या टप्यात कॅडबरीला टक्कर देणारा एनर्जीबार, बोर्नविटाशी स्पर्धा करणारा पॉवरविटा ही दुग्धजन्य उत्पादने बाजारात आणली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ते डेअरी उत्पादनात उतरले आहे. 

०५. शुद्ध प्रतीच्या देशी गायींची निर्मिती करण्याकरिता सुमारे २५० कोटींचे ५० वळू ब्राझिलवरून आयात केले असून, जागा मिळाल्यानंतर नेवाशात गोशाळा सुरू करण्यात येणार आहे. 



महावितरणाकडून वीज ग्राहकांसाठी अभय योजना लागू
०१. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक, उच्चदाब व अतिउच्चदाब वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली आहे. 

०२. तसेच या योजनेत सहभागी होणाऱ्यांना व्याज, दंड व विलंब आकारणीबाबत माफी मिळणार असून, ही योजना ३० एप्रिल २०१७ पर्यंत लागू राहील.

०३. कायमस्वरूपी वीज खंडित असलेले ग्राहक त्यांच्याकडील मूळ थकबाकीचा शंभर टक्के भरणा करतील.त्यांना शंभर टक्के व्याज व दंड आणि विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. 

०४. तसेच मूळ रकमेत पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारी २०१७ पूर्वी मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकारणी माफ होणार आहे.

०५. १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकित मूळ रक्कम भरल्यानंतर १०० टक्के विलंब आकार माफ करण्यात येणार आहे.