न्यूझीलंडला भूकंपाचा धक्का
०१. न्यूझीलंडला रविवारी ७.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला असून अमेरिकेच्या भूवैज्ञानिक संस्थेने त्सुनामीचा इशारा दिला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या काही भागांतील वीज आणि भ्रमणध्वनी सेवा खंडित झाली आहे.


०२. ख्राईस्टचर्चपासून ९० किमी अंतरावरील भागाला या भूकंपामुळे तडाखा बसला आहे. पाच वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०११ मध्ये न्यूझीलंडला ६.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यात १८५ जणांचा मृत्यू झाला होता.

०३.रविवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल होती. या भूकंपामुळे ग्रामीण भागातील इमारतींचे नुकसान झाले आहे. .

०४. या भूकंपात कोणीही जखमी झाले नसल्याचे रुग्णवाहिका सेवेकडून सांगण्यात आले आहे. संभाव्य त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे त्या दृष्टीने सुरक्षाविषयक नियोजन करण्यात येत आहे.



मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर
०१. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात झाली आहे. 

०२. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते. ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. सध्या अभिनेते मोहन जोशी हे संमेलनाध्यक्ष आहेत.

०३. रंगभूमीवर सहा दशके वावरताना समोरच्या रसिकांना त्या भूमिकेत गुंतवून ठेवण्याची किमया सावरकर यांच्याकडे आहे.  
विजया मेहता, दामू केंकरे यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना रंगभूमीवर वावरता आले आणि ‘लिटिल थिएटर’ या सुधा करमरकर यांच्या बालनाटय़ चळवळीतही ते काम करू शकले. 

०४. आजही रंगभूमीवरील कलाकारांसाठी दंतकथा बनून राहिलेल्या केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना मिळाले. 

०५. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, व्यक्ती आणि वल्ली, तुझे आहे तुजपाशी, ययाति आणि देवयानी, एकच प्याला अशा विविधरंगी नाटकांमधून जयंत सावरकर अतिशय आत्मविश्वासाने वावरले.



विश्वातील दीर्घिकांना जोडणाऱ्या वेटोळ्यांचा सैद्धांतिक पातळीवर शोध
०१. वैज्ञानिकांनी प्रथमच विश्वातील आतापर्यंत माहिती नसलेले दीर्घिका पुंज व त्यांना जोडणारी वेटोळी गणितीय सैद्धांतिक पातळीवर शोधून काढली आहेत. आयुका व पुणे विद्यापीठातील वैज्ञानिक डॉ. सुरजित पॉल यांनी गोवा येथे एसकेए परिषदेत हे निष्कर्ष सादर केले आहेत. 

०२. विश्वातील हे दीर्घिका पुंज म्हणजे हायड्रोजनची एकमेकांशी जोडलेली वेटोळी असून ती विशिष्ट बिंदूंवर जोडली गेली आहेत. गुरुत्वीय आकर्षणामुळे आपल्या आकाशगंगेसारख्या अनेक दीर्घिका एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. दीर्घिकांना जोडणारी वेटोळी ही त्यांच्या वृद्धीस उत्तेजन देणारी आहेत. 

०३. ही वेटोळी आतापर्यंत शोधली गेली नव्हती ती पॉल व त्यांच्या चमूने गणिती पद्धतीने शोधली आहेत. द स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे या जगातील सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बीणीच्या मदतीने केलेल्या संशोधनात त्यांचे अस्तित्व प्रत्यक्षात दिसू शकेल असे सांगण्यात आले. 

०४. या वेटोळ्यांच्या शोधामुळे आधुनिक खगोलभौतिकीतील अनेक कूटप्रश्न सुटणार आहेत. बॅरियॉन्स हे काही द्रव्य बाहेर फेकत असतात. त्यातून तारे, तेजोमेघ व आकाशगंगा तयार होतात त्यावर नवीन प्रकाश यातून पडू शकेल.



२०१६ सर्वात उष्ण वर्ष असल्याचा जागतिक हवामान संघटनेचा इशारा
०१. २०१६ हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले असून जागतिक तापमानवाढ थांबली नाही तर अनेक आपत्ती येतील असा इशारा दिला आहे. 

०२. २०१६ या वर्षांत सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत १.२ अंश सेल्सियसने जास्त राहण्याची शक्यता आहे. या शतकात किमान १६ वर्षे सर्वात उष्ण होती असा याचा अर्थ होतो असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे.

०३. तापमानवाढीची उच्चतम मर्यादा २ अंश सेल्सियस असताना आपण निम्म्या मार्गावर आहोत, संयुक्त राष्ट्रांनी हवामान बदलांबाबत केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. 

०४. एल निनोमुळे तापमान यावर्षीच्या सुरुवातीच्या काही महिन्यात वाढले पण तो परिणाम कमी झाल्यानंतर पारा वाढलेलाच राहिला. जागतिक हवामान संघटनेचा अहवाल माराकेश येथील चर्चा सुरू असताना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये हवामान परिषद झाली होती.

०५. राजस्थानात गेल्या मे महिन्यात फालोरी येथे ५१ अंश तपमानाची नोंद झाली होती असेही अहवालात म्हटले आहे.



सोमवारी सायंकाळी सुपरमून दिसणार 
०१. पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल, तर त्याला सुपरमून म्हणतात. त्यावेळी चंद्रबिंब चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त तेजस्वी दिसते.


०२. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर एवढे आहे. पंरतु,सोमवारी हे अंतर ३ लक्ष ५६ हजार ५०९ किलोमीटर एवढे असणार आहे.

०३. खगोलप्रेमींसाठी हा दूग्धशर्करा योग जवळजवळ ६८वर्षांनी साधून आला आहे.