‘कोल्डप्ले’ बँडच्या कार्यक्रमावेळी मोदींनी संवाद साधला
०१. ‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेसोबत सुरेल प्रवास करणारा ‘कोल्डप्ले’ हा बँडच्या पहिला कार्यक्रम मुंबईत शनिवारी सादर झाला. या कार्यक्रमाच्या पार्शभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमासाठी जमलेल्या तरुणाईशी संवाद साधला. 



०२. जगाला वेड लावणाऱ्या या बँडने मुंबईच्या पाश्चात्य संगीतप्रेमींमध्येही उत्साहाची लाट उसळली आहे.



रेल्वे अपघातात १२० बळी
०१. इंदूर येथून पाटण्याकडे निघालेल्या इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे तब्बल १४ डबे रुळांवरून घसरून झालेल्या भीषण अपघातात १२० जण ठार तर २०० हून अधिक प्रवासी जखमी झाले. 

०२. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास कानपूरनजीक पुखरायन या गावाजवळ हा अपघात झाला. अलीकडच्या काळातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे. रुळाला तडा गेल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

०३. अपघातात ठार झालेल्यांच्या नातेवाइकांना पंतप्रधानांकडून दोन लाख रुपये तर उत्तर प्रदेश सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली. रेल्वेतर्फे साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तर जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार असून किरकोळ जखमींना २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

६ जून १९८१ – मध्ये वादळाच्या तडाख्यामुळे बिहारमध्ये मोठा अपघात घडला होता. या अपघातामध्ये रेल्वे कोसी नदीत कोसळली होती. या दुर्घटनेत ८०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर हजारहून अधिक प्रवाशी जखमी झाले होते.

१६ एप्रिल १९९०- बिहारमधील पटनाच्या जवळ एका रेल्वेला आग लागल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये ७० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

२० ऑगस्ट १९९५ – उत्तरप्रदेशमधील फिरोजाबादमध्ये नवी दल्लीच्या दिशेने जाणाऱ्या पुरुषोत्तम एक्स्प्रेस आणि कालिंदी एक्स्प्रेसची टक्कर होऊन अपघात घडला होता. या अपघातामध्ये २५० प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. तर तेवढेच प्रवासी जखमी झाले होते.

३ ऑगस्ट १९९९ – दिल्लीच्या दिशेने जाणारी ब्रम्हपुत्रा मेल आणि आसाम एक्स्प्रेसची पश्चिम बंगालमध्ये झालेल्या समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला होता. यामध्ये २८५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातात ३१२ प्रवाशी जखमी झाले होते.

२ डिसेबर २००० – कोलकत्तावरुन अमृतसरला जाणाऱ्या हावडा मेल आणि दिल्लीच्या दिशेने जाणारी माल गाडीची टक्कर होऊन ४४ प्रवाशांनी जीव गमावला होता.या अपघातामध्ये १४० प्रवासी जखमी झाले होते.

१२ मे २००२ – नवी दिल्लीहून पटनाच्या दिशेने जाणारी श्रमजीवी एक्स्प्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातामध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

९ सप्टेबर २००२ – 
हावडाहून नवी दल्लीच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रसच्या अपघातामध्ये १२० प्रवाशी मृत झाले होते. तर १५० प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.



इंटरनेट वापरात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर
०१. सध्या देशात डिजिटल इंडियाचा बोलबोला सुरू असताना महाराष्ट्राने इंटरनेट वर्गणीदारांच्या संख्येत पहिला क्रमांक पटकावला आहे. 

०२. राज्यात २९.४७ दशलक्ष इतके इंटरनेटधारक आहेत. त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक यांचा क्रमांक लागला आहे. सरकारी माहितीनुसार मार्चअखेर भारतात ३४२.६५ दशलक्ष इतके इंटरनेट वर्गणीदार आहेत.

०३. तामिळनाडूत त्यांची संख्या २८.०१ दशलक्ष, आंध्रात २४.८७ दशलक्ष, तर कर्नाटकात २२.६३ दशलक्ष इतकी आहे. हिमाचल प्रदेशात सर्वात कमी इंटरनेट वर्गणीदार असून त्यांची संख्या ३.०२ दशलक्ष आहे. 

०४. शहरी भारतात इंटरनेट वर्गणीदारांची संख्या ३४२ दशलक्ष असून, ग्रामीण भारतात ही संख्या १११.९४ दशलक्ष आहे. तामिळनाडूत शहरी वर्गणीदार सर्वाधिक २१.१६ दशलक्ष आहेत, तर उत्तर प्रदेशात ग्रामीण वर्गणीदार सर्वाधिक म्हणजे ११.२१ दशलक्ष आहेत. 

०५. सरकारने डिजिटल इंडियाला प्राधान्य दिले असून, भारत नेट प्रकल्प सर्व २.५ लाख ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी राबवला आहे. भूमिगत फायबर लाइन्स व इतर साधनांचा वापर करून इंटरनेटची सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जात असून, मार्च २०१७ पर्यंत १ लाख ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जाणार आहेत.



पृथ्वीसारखा बाहय़ग्रह शोधण्यात वैज्ञानिकांना यश
०१. वैज्ञानिकांनी सूर्याजवळच्या एका ताऱ्याभोवती फिरणारा एक पृथ्वीसारखा ग्रह शोधून काढला आहे. त्याचे वर्णन महापृथ्वी असा करता येईल. 

०२. हा ग्रह पृथ्वीपेक्षा ५.४ पट मोठा आहे. बाह्यग्रह असलेल्या या ग्रहाचे नाव जीजे ५३६ बी असे ठेवण्यात आले असून, तो ताऱ्याच्या वसाहतयोग्य क्षेत्रात नाही. त्याचा परिभ्रमण काळ ८.७ दिवस असून, त्याच्या ताऱ्याची प्रकाशमानता जास्त आहे. 

०३. तारा जी ५३६ हा तांबडा बटू तारा असून, तो तुलनेने थंड आहे. सूर्याच्या जवळ तो आहे असे सांगण्यात आले. त्याची चुंबकीय आवर्तने ही सूर्यासारखीच असून, त्यांचा कालावधी मात्र तीन वर्षांचा आहे. 



बंदिशकार पं. बबनराव हळदणकर यांचे निधन
०१. आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार पंडित बबनराव हळदणकर यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ५० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणा-या हळदणकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

०२. १९२७ मध्ये जन्मलेले पं. बबनराव हळदणकर यांनी शास्त्रीय संगीताचे धडे उस्ताद खादीम हुसैन यांच्याकडून घेतले. पं. हळदणकर यांना कलेचा वारसा घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील हे ख्यातनाम चित्रकार होते. 

०३. सुरेलपणाबरोबरच तालावर प्रभुत्व असलेले, राग सादरीकरणामध्ये शुद्ध भाव जपण्याबरोबरच मोजकेपणा आणि चपखलता याचे मिश्रण असलेले आणि ख्याल गायनामध्ये ध्रुपदची परंपरा जतन करणारे एकमेव घराणे अशी आग्रा घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़े. 

०४. शास्त्रीय संगीतातील ५० वर्षाच्या योगदानासाठी हळदणकर यांना चतुरंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

०५. आग्रा घराण्याचा वारसा तरुण पिढीने पुढे न्यावा यासाठी पं. हळदणकर यांनी अनेक युवा गायकांना गायनाचे धडेही दिले. मुंबई विद्यापीठात भारतीय संगीताचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या ‘जुळू पाहणारे दोन तंबोरे’ या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता.



पी.व्ही.सिंधूला चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद
०१. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते पद पटकावले आहे. सिंधूने चीनच्या सून यू हिचा पराभव करून आपले पहिलेवहिले सुपरसीरिज विजेतेपद साजरे केले आहे. 


०२. सिंधूची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये आजवर केवळ तीन चीन व्यतिरिक्त बॅडमिंटनपटूंनी ही स्पर्धा जिंकली होती. यात दोन भारतीय महिला बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. याआधी ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम सायना नेहवाल हिने केला होता.

०३. पी.व्ही.सिंधूची ही कामगिरी तिच्या आगामी स्पर्धांसाठी खूप मोलाची ठरणार आहे. कारण, या स्पर्धेआधी पी.व्ही. सिंधूला डेन्मार्कपाठोपाठ फ्रान्स सुपर सीरिज स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

०४. त्यानंतर आता चायना सुपरसीरिजमध्ये सिंधूने पराभवाच्या धक्क्यातून सावरून स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले आहे.



डॉ. डेन्टन कुली यांचे निधन
०१. डॉ. डेन्टन कुली यांचे अलीकडेच निधन झाले. कुली यांनी त्यांच्या आयुष्यात किमान १ लाख तरी हृदय शस्त्रक्रिया केल्या. 


०२. मात्र जगातील पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान दक्षिण आफ्रिकेचे ख्रिश्चन बर्नार्ड यांनी त्याआधी पटकावला होता. 

०३. कुली यांनी मुलांच्या हृदयाच्या झडपा बदलण्यातही तंत्रज्ञान विकसित केले होते. 

०४. ४ एप्रिल १९६९ रोजी एका मरणाऱ्या रुग्णाला दात्याचे हृदय मिळत नव्हते, त्यामुळे त्याच्यावर त्यांनी कृत्रिम हृदयप्रत्यारोपण केले. नैसर्गिक हृदय मिळेपर्यंत हास्केल कार्प नावाच्या इलिनॉइसच्या त्या रुग्णाला ६५ तास जिवंत ठेवण्यात त्यांना यश आले, पण तो रुग्ण नंतर दगावला. 

०५. कुली यांनी वापरलेले कृत्रिम हृदय हे ह्य़ूस्टनच्या बेलर कॉलेज येथे डिबेकी यांनी तयार केले होते वैद्यकीय क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणारी ती घटना होती. 

०६. कुली यांचा जन्म २२ ऑगस्ट १९२० रोजी ह्य़ूस्टन येथे झाला. विद्यार्थिदशेत अ‍ॅथलीट असल्याने आपण शल्यकर्मात प्रवीण झालो, असे कुली सांगत असत.

०७. डॉ कुली त्यांना वडिलांप्रमाणे दंतशल्यचिकित्सक व्हायचे होते, पण ते हृदयशल्यचिकित्सक बनले. अर्थात ही वेगळी वाट त्यांना अजरामर करून गेली, कारण अमेरिकेतील पहिली कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्याचा मान त्यांना मिळाला. 

०८. बाल्टीमोर येथील जॉन हॉपकिन्स संस्थेतून त्यांनी वैद्यकाची पदवी घेतली. हार्ट लंग मशीन वापरून शस्त्रक्रिया करताना द्याव्या लागणाऱ्या रक्ताचे प्रमाण त्यांनी कमी केले, ही त्यांची मोठी कामगिरी होती. 

०९. विद्यार्थिदशेत त्यांच्या मनगट व बोटांवर खेळताना परिणाम झाला होता तरी ते वेगाने शस्त्रक्रिया करीत असत. ते तंत्रकुशल शल्यविशारद होते. ज्या काळात उपलब्ध साधने कमी अशा काळात त्यांनी केलेली ही कामगिरी प्रशंसनीय होती यात शंकाच नाही.