‘आयएनएस चेन्नई’ला नौदलाचे पहिले कवच!
०१. गेल्या काही वर्षांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ)भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना शत्रूपासून रोखणारे ‘कवच’ प्राप्त करून देणारे संशोधन सुरू होते. 

०२. या ‘कवचा’चे सर्व पहिले प्रयोग ‘आयएनएस चेन्नई’ या विनाशिकेवर करण्यात आले. त्याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सर्वात पहिले ‘कवच’ही आता याच युद्धनौकेवर चढविण्यात आले आहे. आता यापुढे नौदलात दाखल होणाऱ्या सर्व युद्धनौकांनाही ‘कवच’प्राप्ती होईल.

०३. शत्रूच्या युद्धनौका अथवा हवाई टेहळणीदरम्यान भारतीय युद्धनौका आढळल्यानंतर त्यांनी क्षेपणास्त्र डागल्यास युद्धनौकेचा हमखास बचाव करणारे क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र वापरण्याखेरीज दुसरा पर्याय आजवर नौदलाकडे उपलब्ध नव्हता. 


०४. म्हणूनच गेली काही वर्षे ‘डीआरडीओ’तर्फे शत्रूच्या क्षेपणास्त्राला चकवा देणाऱ्या ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती सुरू होती. 

०५. शत्रूचे क्षेपणास्त्र येते आहे, हे लक्षात येताच ‘कवचा’मधून एक विशिष्ट आभासी असे काही डागले जाते की, त्यामुळे युद्धनौकेपासून दूर अंतरावर एक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभासी ढग निर्माण होतो. युद्धनौकेऐवजी त्या आभासी ठिकाणी जाऊन ते फुटते. परिणामी युद्धनौकेचा यशस्वी बचाव होतो, असे हे तंत्र आहे. 

०६. भारतीय नौदलाच्या ‘प्रकल्प १५ अल्फा’ मध्ये कोलकाता वर्गातील गायडेड मिसाईल विनाशिकांची निर्मिती करण्यात आली. त्यातील ही तिसरी आणि अखेरची विनाशिका आहे. या तीन विनाशिकांच्या प्रकल्पावर नौदलाने सुमारे साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. 

०७. १६४ मीटर्स लांबीच्या या विनाशिकेचे वजन तब्बल साडेसात हजार टनांचे असून त्यावर स्वनातीत वेगात भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारी ब्राह्मोस, त्याचप्रमाणे लांब पल्ल्याची भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसविण्यात आली आहेत. 

०८. याशिवाय पाणतीरांचा मारा झाल्यास त्यालाही चकवा देणारी ‘मारीच’ नावाची यंत्रणा प्रथमच बसविण्यात आली आहे. शत्रूचा संहार करणारी या अर्थाने संस्कृतमधील ‘शत्रो संहारक:’ हे या विनाशिकेचे घोषवाक्य आहे.



मद्यपींना दोनच ‘बाटल्यां’ची मुभा
०१. परवानाधारक मद्यपींना आता पूर्वीप्रमाणे केवळ दोनच मद्याच्या बाटल्या बाळगता येतील. काही दिवसांपूर्वी १६ बाटल्या बाळगण्याची परवानगी देणारा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा यांनी राळेगणसिद्धीत बोलताना दिली.

०२. राज्यातील अवैध दारूबंदीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी गावांतील ग्रामसुरक्षा दले सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

०३. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे ग्रामसुरक्षा दलांची स्थापना, त्यांना देण्यात येणारे कायदेशीर अधिकार व अवैध दारूविक्रीला प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शन घेतले जात आहे. 

०४. उत्पादन शुल्क विभागाने परवानाधारक व्यक्तीने घरी मद्य साठवण्याच्या बाटल्यांच्या क्षमतेमध्ये काही महिन्यांपूर्वी वाढ केली होती. त्या निर्णयानुसार परवानाधारकास दरमहा ६५० मिलिलीटरच्या बीअरच्या ४८ बाटल्या किंवा ७५० मिलिलीटरच्या वाइनच्या २४ बाटल्या किंवा विदेशी मद्याच्या ७५० मिलिलीटरच्या १६ बाटल्या बाळगण्यास परवानगी देण्यात आली होती.

०५. राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाच्या मदतीने महाविद्यालयीन तरुणांमध्ये व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नो लिकर, टोबॅको अँड ड्रग्ज हे या मोहिमेचे नाव असेल, नगर जिल्हय़ातून त्याची सुरुवात होईल. 

०६. दारूबंदीसाठी घेण्यात येणाऱ्या मतदानाची वेळ आता दुपारी दोनऐवजी पाच वाजेपर्यंत असेल. मतपत्रिकेवर उभ्या व आडव्या बाटलीचे चित्र असेल. या निर्णयाचीही अंमलबजावणी करण्यात आल्याचे राधा यांनी सांगितले.



आता पेट्रोल पंपावरही काढता येणार पैसे
०१. नोटाबंदीनंतर देशभरात निर्माण झालेल्या चलनकल्लोळानंतर सर्वसामान्यांना आता पेट्रोल पंपावरही पैसे काढणे शक्य होणार आहे. तुर्तास एसबीआयच्या पीओएस मशिन असलेल्या पेट्रोलपंपावर या सुविधेचा लाभ घेता येईल. 

०२. पहिल्या टप्प्यात देशातील अडीच हजार पेट्रोल पंपावर पैसे काढणे शक्य होणार आहे. पेट्रोल पंपावर प्रति व्यक्ती प्रति दिवस दोन हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतील.

०३. एसबीआय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा संयुक्त उपक्रम राबवला आहे. एसबीआयचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होईल. 
आगामी काळात एचडीएफसी, आयसीआयसीआय, सिटी बँक यासारख्या बँकांच्या ग्राहकांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल.



राष्ट्रीय आयुष परिषद तयार करण्याचा सरकारच विचार
०१. पारंपरिक आयुर्वेदिक शिक्षणाची गुणवत्ता टिकावी यासाठी सरकार आयुर्वेदिक डॉक्टरांचा राष्ट्रीय आयुष आयोग तयार करण्याच्या विचारात आहे. यामागे आयुष व्यावसायिक डॉक्टरांचे शिक्षण व नोंदणी याची दखल घेण्यात येणार आहे.

०२. आयुष खात्यातील सल्लागार (आयुर्वेद) डॉ. मनोज नेसरी यांनी आम्हाला याबाबतचा प्रस्ताव मिळाल्याचे सांगितले. सध्या याबाबत ‘व्हाइट पेपर’ तयार करण्यात येत असून श्रीपाद येस्सो नाईक यांच्याकडून संमती मिळाल्यावर ते निती आयोगाकडे पाठविले जातील. 

०३. प्रस्ताव अद्यापिही प्राथमिक पातळीवर असला तरी राष्ट्रीय आयुष आयोग हा स्वतंत्र असावा की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासोबत राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या ऐवजी संलग्न असावा, याबाबत चर्चा सुरू आहे.



गीरच्या प्रसिद्ध ‘मौलाना’ सिंहाचे निधन
०१. आशियाई सिंहांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासन गीरच्या विस्तृत अभयारण्यात गेली सोळा वर्षे संचार करणारा मौलाना नावाचा सिंह निधन पावला. गीरचे विख्यात वनराज मौलाना यांचे बुधवारी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.

०२. सुप्रसिद्ध सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘खुशबू गुजरात की’ या गुजरातच्या पर्यटनविषयक जाहिरातीत मौलाना झळकले होते. सर्वांत ज्येष्ठ आशियाई सिंह अशी त्यांनी कमावलेली ओळख जागतिक स्तरावर पोचली होती. दिलखेचक आयाळ आणि भारदस्त देह ही त्यांची वैशिष्ट्ये होती. 

०३. मौलाना हा विशेष सिंह होता. भारतीय प्राणिसंपदेचे जागतिक प्रतीक म्हणून त्याची आगळी ओळख होती. गीरची शान म्हणून त्याच्याकडे विस्मयादराने पाहिले जात असे. 


०४. आशियाई सिंह ही एक धोक्‍यात आलेली प्रजाती आहे. किंबहुना गीरचे जंगल सोडले तर दुसऱ्या कुठेही आशियाई सिंह औषधालाही सापडत नाहीत. 

०५. हा आफ्रिकन सिंहाचा हा धाकटा भाऊ म्हणायला हरकत नाही. आफ्रिकन सिंह हा जादा खुंखार, अधिक बलवान आणि आकाराने मोठा असतो. त्याच्या तुलनेत आशियाई सिंह थोडा कमजोर मानला जातो. 

०६. आफ्रिकेत सुखा-समाधानाने नांदणारा आफ्रिकन सिंह हा तुलनेने अधिक संरक्षित राहिला, तर आशियातल्या सिंहांना माणसाच्या भयानक भुकेपुढे नांगी टाकावी लागली. 

०७. गीर हे तर जुनागढ संस्थानाच्या नवाबांचे शिकारीसाठी राखीव ठेवलेले जंगल. परिणामी आशियाई सिंहांची तिथली संख्या घटत घटत तेवीसवर आली, तेव्हा त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काही करायला हवे असे वाटू लागले

०८. आजमितीस गीरच्या जंगलात पाचशेहून अधिक सिंह संचारत आहेत, हे या सामूहिक संवर्धनाच्या प्रयत्नांचे यश म्हणावे लागेल. 

०९. गीरचा अधिवास हा आशियाई सिंहांना बराच सोयीचा आहे. या जंगलात मालधारी जमातीचे आदिवासीही सिंहांबरोबरच राहतात. त्यांच्या तिथे वस्त्या आहेत. सिंहांची शिरगणती आणि त्यांच्या संवर्धनात तिथल्या स्थानिक महिलांचा पुढकार विशेषत्वाने आहे. जवळपास चाळीसहून अधिक महिला वनरक्षकांचे या सिंहांवर लक्ष असते. 

१०. मौलाना हा या संवर्धनाचा ज्येष्ठ साक्षीदार आणि लाभार्थी होता. त्याच्या प्रथमदर्शनाने मोहीत झालेल्या बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा मौलानाचा उल्लेख केला होता.



पुणे मेट्रोला नगरविकास खात्याची मान्यता
०१. केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ‘पुणे मेट्रो’ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मेट्रोच्या प्रस्तावास केंद्रीय नगर विकास खात्याने मंजुरी दिली असून हा प्रस्ताव आता अर्थ मंत्रालयाकडे जाणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव अंतिम मंजुरी मिळणार आहे. 

०२. ‘पीआयबी’च्या मान्यतेनंतर पुणे मेट्रो चा प्रस्ताव केंद्रीय नगर विकास खात्याकडे मंजुरीसाठी गेला होता. त्यास नुकतीच मंजुरी मिळाली.

०३. पुणे मेट्रो मार्गाची एकूण लांबी एकूण  ३१ किमी आहे. या मार्गापैकी एकूण एलिव्हेटेड मार्ग २६ किमी तर भुयारी मार्ग ५ किमी आहे. प्रकल्पाची एकूण किंमत १२२९८ कोटी आहे. या मार्गावर एकूण ३१ प्रस्तावित मेट्रो स्टेशन आहेत.



ध्वनिप्रदूषण केल्यास पाच वर्षे कारावास
०१. सणांनिमित्त होणाऱ्या आतषबाजीमुळे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून, यासंदर्भात कठोर कारवाईचा आदेश सरकारने पोलिस नियंत्रणास दिले आहेत.

०२. ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डेसिबल, तर रात्री ७० डेसिबल एवढी ध्वनिमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा ६५ डेसिबल, तर रात्री ५५ डेसिबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल, तर रात्री ४५ डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल ते रात्री ४० डेसिबलपर्यंत ध्वनिमर्यादा आहे. 

०३. ध्वनिप्रदूषण नियम व नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे. नागरिकांनी पोलिसांत तक्रार करावी व पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असा आदेश सरकारने दिला आहे.



भारत-चीनचे लष्कर दहशतवादाविरोधात एकत्र
०१. भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातील ‘हॅंड इन हॅंड’ या सहाव्या संयुक्त सरावाला पुण्यात सुरवात झाली. हा संयुक्त लष्करी
सराव सुरू झाल्याचे पीपल्स लिबरेशन आर्मीचे मेजर जनरल वांग हायजिआंग यांनी सांगितले. 

०२. भारतीय लष्कराचे मेजर जनरल योगेशकुमार जोशी या वेळी उपस्थित होते. निमशहरी भागात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संयुक्त नियोजन करणे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश असल्याचे दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

०३. भारतीय पारंपरिक युद्धकौशल्य असलेल्या कलारीपटूचे भारतीय लष्करातर्फे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यात दांडपट्टा, भाला, ढाल-तलवार, काठी यांच्या साहाय्याने शत्रूला नेस्तनाबूत करण्यात आले. त्यानंतर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी दाखविलेल्या मार्शल आर्टलाही उपस्थितांनी दाद दिली. या वेळी दोन्ही देशांच्या राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली.



आता व्हॉ़ट्ऍपवरुन करता येणार व्हिडिओ कॉल
०१. फेसबुक वरुन काल (मंगळवार) मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअॅपची बहुप्रतीक्षित व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरु झाल्याची घोषणा केली.

०२. व्हॉट्सऍप अपडेट केल्यानंतर युजर्सना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आयेफोन युजर्ससाठी ही सुविधा मोफत असुन, ऍन्ड्रॉइड आणि विंडोज युजर्सला कंपनीच्या डेटानुसार व्हिडिओ कॉलिंगसाठी इंटरनेटचा दर लागू होणार आहे. 



स्वीडनमध्ये कागदी चलन जाणार, ई-चलन येणार
०१. स्वीडनच्या केंद्रीय बँकेकडून ई-चलन आणण्याचा विचार सुरू आहे. स्वीडनच्या रिक्सबँकने हा निर्णय घेतल्यास असे पाऊल उचलणारा स्वीडन हा जगातील पहिला देश ठरणार आहे. 


०२. ३०० वर्षांपूर्वी युरोपात पहिल्यांदा नोटा वापरण्याची सुरुवात स्वीडनमधूनच झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून स्वीडनमधील नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला.