दिल्लीत फटाके विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी
०१. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन) मधील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. 


०२. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषणात मोठी वाढ झाली होती. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आता दिल्ली आणि परिसरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी किती कालावधीपर्यंत असेल, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही.

०३. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटाक्यांमधील घटकांबद्दलचा अहवाल देण्यास सांगितले आहे. तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आलेत.

०४. दिल्ली अनेक दिवस धुरात हरवून गेल्याने राष्ट्रीय हरित लवादाने प्रकरण गंभीरपणे घेतले. परिस्थिती भीषण बनल्याने हरित लवादाने दिल्ली सरकारला चांगलेच फटकारले होते.



पंतप्रधान पीक विम्यात महाराष्ट्र देशात अव्वल
०१. राज्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये देशभरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आला. राज्यातील सुमारे ६७ लाख शेतकऱ्यांनी सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढले आहे.

०२. २०१६च्या खरीप हंगामासाठी देशातील ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील ६६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे प्रमाण वीस टक्क्यांहून अधिक आहे. 

०३. या योजनेत प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. आत्महत्याग्रस्त असलेल्या उस्मानाबाद, यवतमाळ, लातूर, बीडसारख्या जिल्ह्य़ांमध्ये सरासरी ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना विमा संरक्षणाखाली आवर्जून आणले आहे. 

०४. २००८ ते २०१४ या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील २२ हजार हेक्टर शेतीवर औद्योगिकीकरणाने गंडांतर आणल्याची माहिती राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मिळाली. दुसरीकडे आसाम, पंजाब आणि झारखंड आदी राज्यांमध्ये शेतीचे क्षेत्र आश्चर्यकारकरीत्या वाढले.



क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन
०१. क्युबाचे माजी पंतप्रधान आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. क्युबन क्रांतीचे प्रणेते फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन झाल्याचे क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले. 

०२. फिडेल कॅस्ट्रो यांनी १९५९ ते १९७६ या काळात क्युबाचे पंतप्रधानपद तर १९७६ ते २००८ या काळात क्युबाचे राष्ट्राध्यक्षपद भुषविले. क्युबात कम्युनिस्ट राजवटीचा एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यात फिडेल कॅस्ट्रो यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 

०३. १९५९ साली चे गव्हेरा यांच्या साथीने कॅस्ट्रो यांनी क्युबातील बॅतिस्ता यांची अमेरिकाधार्जिणी राजवट उलथून टाकली. कॅस्ट्रो हे क्युबाचे अध्यक्ष बनले आणि चे गव्हेरा हे मंत्रिपदी विराजमान झाले. 

०४. सत्ता हाती आल्यानंतर पुढल्याच वर्षी या कॅस्ट्रो यांनी क्युबातील सर्व अमेरिकी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून अमेरिकेचा राग ओढवून घेतला. 

०५. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांनी संतापून त्या वेळी क्युबावर आर्थिक निर्बंध घातले आणि राजनैतिक संबंधही तोडून टाकले होते. मात्र, फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्त्वामुळेच क्युबा हा लहानसा देश बलाढ्या अमेरिकेला पुरून उरला होता.


०६. जगभरात चर्चिल्या गेलेल्या या क्रांतीनंतर तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ फिडेल यांनी क्युबावर अधिराज्य गाजवले. २००८ साली प्रकृतीच्या कारणास्तव आपले धाकटे बंधू राउल कॅस्ट्रो यांच्याकडे त्यांनी क्युबाची धुरा सोपवली होती. 

०७. क्युबात क्रांती घडवण्यासाठी त्यांना चे गव्हेरा यांची साथ मिळाली. चे आणि फिडेल हे १९५५ मध्ये भेटले. त्याची विचारधारा समान होती. त्यामुळे गव्हेरा यांनी कॅस्ट्रो यांच्या क्रांती गटात सहभागी होण्याचे मान्य केले. गव्हेरा हा नेता डावा होता. विशेष म्हणजे क्युबा ही त्याची मायभूमी नव्हती. तरीही त्याने क्युबन क्रांतीत सहभाग घेतला होता. 

०८. १९८९ साली बर्लिनची भिंत कोसळली आणि शीतयुद्धाची अखेर झाली. दरम्यान जिमी कार्टर आणि त्यापुढील काळात बिल क्लिंटन यांनी क्युबन जनतेला अमेरिकेत येण्यासाठी उत्तेजन दिले आणि त्याबाबतचे र्निबधही सैल केले. 

०९. तरीही ते पूर्णपणे उठवले जाण्यासाठी २०१४ सालाची अखेर उजाडावी लागली. ही एका अर्थाने अमेरिकेची माघार होती. अमेरिकेच्या नाकीनऊ आणणाऱ्या कॅस्ट्रो यांचे निधन झाले आणि एका क्रांतिपर्वाची अखेर झाली.



कमार जावेद बाजवा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख
०१. काश्मीर आणि उत्तर भागातील समस्यांचा चांगला अनुभव असलेल्या कमार जावेद बाजवा यांची पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे. पाकिस्‍तानचे लष्‍कर प्रमुख राहील शरीफ २९ नोव्‍हेंबरला निवृत्‍त होत आहेत. 

०२. नवीन लष्कर प्रमुखपदासाठी चार नावांची चर्चा होती. त्यात जुबैर हयात, इश्फाक नदीम अहमद, जावेद इकबाल रामदे आणि कमार जावेद यांची नावे आघाडीवर होती. अखेर कमार जावेद यांची नवीन लष्करप्रमुखपदी वर्णी लागली. 

०३. नव्याने नियुक्त झालेल्या कमार जावेद यांचा काश्मीर आणि उत्तर भागातील समस्यांचा दांडगा अनुभव आहे. जनरल कमार जावेद बाजवा रावळपिंडी तुकडीचे कमांडर होते. ते ट्रेनिंग आणि मूल्यमापन विभागाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. बाजवा हेही ऑगस्ट २०१७ मध्ये निवृत्त होणार आहेत.



सचिन सिंगचा सुवर्ण‘पंच’!
०१. कनिष्ठ विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सचिन सिंगने रशियात सुरू असलेल्या एआयबीए युवा विश्व अजिंक्यपद स्पध्रेत ४९ किलो वजनी गटात सुवर्ण’पंच’ मारला. सचिनने क्युबाचा राष्ट्रीय विजेता जॉर्ज ग्रिननचा ५-० असा पराभव केला. 

०२. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा समीर हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. या स्पर्धेत भारताला प्रत्येकी एक सुवर्ण आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नमन तन्वरला ९१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

३. यापूर्वी भारताने २०१४ साली एक कांस्यपदकच जिंकले होते. सचिनने या सुवर्णकामगिरीसह थोकचोम नानाओ सिंग आणि विकास कृष्णन यांच्या यादीत स्थान पटकावले. नानाओने २००८ साली ४८ किलो वजनी गटात, तर विकासने २०१०साली वेल्टरवेट गटात सुवर्णपदक जिंकले होते.



डॉ. अनिल भारद्वाज यांना ईन्फ्रोसिस पुरस्कार
०१. ग्रहांच्या संशोधनात ज्या मोजक्या भारतीय वैज्ञानिकांनी मोलाचे संशोधन केले आहे, त्यात विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांचा समावेश आहे. त्यांना यंदा भौतिकशास्त्रात प्रतिष्ठेचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला आहे.

०२. उत्तर प्रदेशात जन्मले असले तरी गेली दोन दशके संशोधनाच्या निमित्ताने केरळ हीच त्यांची कर्मभूमी आहे. मंगळ व गुरूचा चंद्र युरोपा यांच्या वायुरूपातील वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांच्या मते त्यातून या दोन ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता नसली, तरी ग्रहमालेची उत्पत्ती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो. 

०३. भारद्वाज हे मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कम्पोझिशन अ‍ॅनलायझर या प्रयोगात मुख्य संशोधक आहेत. चंद्रा अ‍ॅटमॉस्फेरिक कम्पोझिशन एक्सप्लोरर या चांद्रयान दोनमधील प्रयोगाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. 

०४. आंतरराष्ट्रीय पातळीवर चंद्रा क्ष किरण दुर्बीण, हबल दुर्बीण, न्यूटन एक्सरे दुर्बीण तसेच भारतातील जीएमआरटी रेडिओ दुर्बीण या प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे अतिथी संपादक म्हणून काम करतानाच त्यांनी एकूण १२० शोधनिबंध लिहिले आहेत. भारतातील अनेक अवकाश संशोधन मोहिमांच्या नियोजन समित्यांवर त्यांनी काम केले. 

०५. आताचा पुरस्कार त्यांना चांद्रयान १ व मंगळ मोहिमेतील काही प्रयोगांसाठी देण्यात येत आहे. ग्रह संशोधनातून पृथ्वीची निर्मिती व आगामी काळात होणारे त्यातील बदल यावर प्रकाश पडतो, त्यामुळे त्यांचे संशोधन त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. 

०६. यापूर्वी त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.



ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन
०१. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.

०२. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते अभ्यासक म्हणून परिचीत होते. शिवाय, त्यांचा काश्मीर प्रश्नाबाबतचा अभ्यासही गाढा होता.

०३. पाडगावकर यांचा १ मे १९४४ रोजी जन्म झाला होता. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती. फ्रान्समधून दिग्दर्शन व पटकथा लेखन पदवी मिळवली होती. 

०४. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली होती. सन १९७८ ते १९८६ या काळात त्यांनी युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसेवा अधिकारी म्हणून काम पाहिले होते. फ्रान्सने २००२ मध्ये पाडगावकरांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते.