लोकसभेत नवे आयकर विधेयक मंजूर

०१. केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधातील लढाई आणखी तीव्र केली आहे. केंद्र सरकारने नोटाबंदीच्या निर्णयानंतर करचुकवेगिरी करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी लोकसभेत सादर केलेल्या नव्या आयकर विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे.

०२. या नव्या विधेयकातील तरतुदींनुसार, स्वतःहून बेहिशेबी मालमत्ता घोषित करणाऱ्यांना घोषित रकमेवर पन्नास टक्के कर आणि दंडासह त्या रकमेचा २५ टक्के भाग चार वर्षांसाठी सरकारकडे जमा करावा लागणार आहे. याचाच अर्थ ती रक्कम संबंधित व्यक्तीला चार वर्षे वापरता येणार नाही. तसेच मालमत्ता घोषित करण्यात कुचराई केल्यास थेट ८० टक्क्यांपेक्षा जास्त कर आणि दंडाची तरतूद आहे.



कोलंबियात विमानाला अपघात
०१. बोलिवियाहून मेडेलिन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे. या चार्टर विमानातून ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉल संघ प्रवास करत होता. ७२ प्रवाशांना घेऊन प्रवास करत असलेले हे विमान कोलंबियात कोसळले आहे.

०२. या विमानाने बोलिवियाहून उड्डाण केल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाने ट्विटरवर दिली होती. या चार्टर विमानातून चॅपकोयन्स हा ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉल संघ प्रवास करत होता. 

०३. कोपा सुदामिरेका स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्यासाठी चॅपकोयन्सचा संघ मेडेलिनला जात होता. बुधवारी होणाऱ्या अंतिम फेरीत चॅपकोयन्सची गाठ ऍटलेटिको नॅशनल संघाशी पडणार होती.

०४. शहराबाहेर असणाऱ्या पर्वतीय भागात मध्यरात्रीच्या सुमारास हे विमान कोसळल्याची माहिती समोर येते आहे. या अपघाताची माहिती मिळताच बचाव दल आणि रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.



पंकजला अडवाणीला कांस्यपदक 
०१. पंधरा विश्वविजेतेपदे नावावर असलेल्या भारताच्या पंकज अडवाणीला दोहा येथे सुरू असलेल्या आयबीएसएफ विश्व स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.


०२. उपांत्य फेरीच्या सामन्यात वेल्सच्या अँड्रूृ पॅगेटने ७-२ अशा फरकाने गतविजेत्या पंकजचे आव्हान संपुष्टात आणले. 

०३. या स्पर्धेनंतर अडवाणी त्वरित बंगळुरूला दाखल होणार असून ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या सरावाला लागणार आहे. 

०४. स्नूकर आणि बिलियर्ड्स या दोन्ही विश्व अजिंक्यपद स्पध्रेत खेळणारा पंकज हा जगातील एकमेव खेळाडू आहे.



विकास कृष्णनला सर्वोत्तम मुष्टियोद्ध्याचा पुरस्कार जाहीर
०१. आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता विकास कृष्णनला यावर्षी त्याने केलेल्या सुरेख कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेतर्फे (एआयबीए) २० डिसेंबर रोजी विश्व संघटनेच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सर्वोत्तम मुष्टियोद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

०२. भारतीय बॉक्सिंग इतिहासातील ही पहिली घटना ठरेल. २०१०
 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि २०१४ मध्ये कास्यपदक जिंकणाऱ्या २४ वर्षीय विकासने यावर्षी दोन एपीबी बाऊटमध्ये सहभाग नोंदवला.



हाँगकाँग ओपन मध्ये पी.व्ही. सिंधूला उपविजेतेपद
०१. भारताच्या हाँगकाँग ओपन सुपर सीरीजमध्ये दोन विजेतेपद जिंकण्याच्या आशेला २७ नोव्हेंबर रोजी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि राष्ट्रीय विजेता समीर वर्मा यांच्या अंतिम फेरीतील पराभवामुळे तडा बसला.

०२. सिंधूला सलग दुसरे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावण्याची संधी होती. परंतु पराभवाने तिची ही संधी हुकली.
सिंधूला चिनी ताइपेच्या ताई जू यिंग हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला व उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.



देशात सर्व सेवा डिजिटल होणार
०१. देशातील सर्व सेवा भविष्यात डिजिटलाइज्ड केल्या जातील. नागरिकांना मिळणा-या सेवा ह्या डिजिटल पद्धतीच्या असतील, असे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड यांनी २८ नोव्हेंबर रोजी इफ्फीच्या समारोपावेळी केलेल्या भाषणावेळी सांगितले.

०२. सरकारने सुरू केलेले फिल्म फॅसिलीटेशन कार्यालय म्हणजे सिने निर्मात्यांसाठी एक खिडकी योजना आहे.

०३. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाने आयोजित केलेल्या स्वच्छ भारत चित्रपट महोत्सवासाठी आलेल्या विक्रमी प्रतिक्रिया याचेच द्योतक आहे.



हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मंजूर
०१. ‘भारतीय मुस्लीम महिला आंदोलन’च्या ८० महिलांनी चार वर्षांनंतर २९ नोव्हेंबर रोजी प्रथमच मजारपर्यंत प्रवेश केला. 

०२. हाजी अली ट्रस्टने २०१२ मध्ये महिलांना मजारपर्यंत जाण्यावर प्रतिबंध घातला होता. ट्रस्टच्या प्रतिबंधाविरोधात महिला संघटनांनी आवाज उठवला होता. 

०३. ‘हाजी अली सबके लिए’ या फोरमने ट्रस्टच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली होती. शेवटी हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.