‘जीएसटी’ची कररचना जाहीर
०१. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीसाठी कर दरनिश्चित करण्यात आले असून ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के अशा चार टप्प्यांमध्ये कर दर आकारणी केली जाईल.



०२. ज्या वस्तूंवर व्हॅट आणि उत्पादन शुल्कासह एकूण ३०-३१ टक्के कर लावला जात होता. त्यावर आता २८ टक्के जीएसटी कर लावला जाईल. सर्व सामान्यांसाठी उपयोगी असलेल्या वस्तूंवर जीएसटी दराचे प्रमाण ५ टक्के असेल. 

०३. याशिवाय जीएसटीमध्ये १२ टक्के आणि १८ टक्के प्रमाणभूत दर असतील. अन्नधान्यावर कोणताही कर नसेल. अन्नधान्यासह सर्व सामान्य व्यक्तींशी निगडीत ५० टक्के वस्तूंवर कर नसेल.

०४. महागाईला कारणीभूत असलेल्या निम्म्या वस्तूंवर शून्य टक्के आणि ग्राहकांसाठी गरजेच्या असलेल्या प्रमुख वस्तूंवर पाच टक्के कर लावण्यात येणार आहे. 

०५. सेवा कर लागू असलेल्या वस्तूंवरही कर पंधरा टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर जाणार आहे.

०६. अत्यावश्यक वस्तू पाच टक्क्यांच्या गटात आणि चैनीच्या बाबी सर्वाधिक २८ टक्क्यांच्या गटात असतील. उर्वरित वस्तू १२ व १८ टक्क्यांमध्ये असतील.



‘एनडीटीव्ही’वर एक दिवसाची बंदी
०१. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वार्ताकन केल्याप्रकरणी ‘एनडीटीव्ही हिंदी’ या वृत्तवाहिनीला एक दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारतर्फे देण्यात आले आहेत. एखाद्या खासगी वाहिनीला अशा प्रकारचा आदेश दिला जाण्याची ही पहिलीच घटना आहे.

०२. जानेवारी महिन्यात पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. याप्रकरणी संबंधित वृत्तवाहिनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. 

०३. ९ नोव्हेंबर रोजी वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण दिवसभरासाठी बंद राहण्याची शक्यता आहे.



संपूर्ण देशात अन्न सुरक्षा कायदा लागू
०१. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आता संपूर्ण देशात लागू झाला आहे. अगोदर केवळ ११ राज्यांत या कायद्याची अंमलबजावणी होत होती. मात्र, आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात याचा अंमल सुरू झाली. 

०२. तमिळनाडू आणि केरळ आतापर्यंत या कायद्याच्या कक्षेबाहेर होते. तथापि, १ नोव्हेंबरपासून ही राज्येही पटलावर आली आहेत.

०३. या कायद्यामुळे ८० कोटी लोकांना सवलतीत धान्य मिळणार असून, केंद्राला त्यापोटी वार्षिक १ लाख ४० हजार कोटी एवढे अनुदान द्यावे लागणार आहे.


०४. २०१३ मध्ये संसदेने संमत केलेल्या या कायद्यांतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीला केवळ एक ते तीन रुपये किलो दराने दरमहा 5 किलो धान्य पुरविणार आहे.




रिलायन्सला गॅस चोरीसाठी १.५ अब्ज डॉलर्सचा दंड०१. ओएनजीसीच्या खाणीमधून गॅसचोरी करणा-या रिलायन्सला केंद्र सरकारने दणका दिला आहे. गॅसचोरी प्रकरणी केंद्र सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) या कंपनीकडे तब्बल १.५ अब्ज डॉलर्सची भरपाई मागितली आहे.

०२. रिलायन्सने ओएनजीसीच्या कृष्णा गोदावरी खो-यातून नैसर्गिक गॅसची चोरी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने एपी शहा समिती नेमली होती. 

०३. ओएनजीसीच्या खाणीतून गॅस चोरी करुन रिलायन्सने स्वतःचा फायदा करुन घेतला असा निष्कर्ष या समितीने काढला होता. याप्रकरणी रिलायन्सने भरपाई देणे गरजेचे आहे असे समितीने म्हटले होते.

०४. कृष्णा गोदावरी खो-यातील नैसर्गिक गॅस खाणीत रिलायन्स आणि ओएनजीसीची भागिदारी आहे. पण या खाणीत रिलायन्सने ओनजीसीच्या वाट्यातील ११.१२२ बिलियन क्यूबिक मीटर गॅसची चोरी केली होती. 

०५. तब्बल सात वर्ष ओनएजीसीच्या खाणीतून रिलायन्सदेखील नैसर्गिक गॅस काढत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने रिलायन्सला नोटीसही बजावली आहे.



मंगळावर चेंडूच्या आकाराचा उल्कापाषाण
०१. मंगळावर गोल्फ चेंडूच्या आकाराचा पदार्थ नासाच्या क्युरिऑसिटी गाडीला सापडला असून, तो लोह व निकेल यांचा बनलेला उल्कापाषाण आहे. 

०२. मंगळाच्या आकाशातून तो तेथे पडला असावा. त्याला एग रॉक असे नाव देण्यात आले आहे. लोह निकेल उल्कापाषाण हा अवकाशीय खडकांचा एक प्रकार असून ते पृथ्वीवरही सापडतात. 

०३. मंगळावर यापूर्वीही उल्कापाषाण सापडले असून एग रॉक त्यापेक्षा वेगळा आहे. त्याचे निरीक्षण लेसर फायरिंग स्पेक्ट्रोमीटरने करण्यात आले आहे, असे नासाने सांगितले.

०४. क्युरिऑसिटी गाडीवरील केमकॅम म्हणजे रसायन तपासणी यंत्राने या खडकातील रसायनांची माहिती घेण्यात आली आहे. मार्स सायन्स लॅबोरेटरी प्रकल्पात सुरुवातीला क्युरिऑसिटी गाडीच्या मास्टकॅमला वेगळा खडक दिसला.

०५. मंगळावर वेगवेगळय़ा प्रकारचे उल्कापाषाण सापडतात असे न्यू मेक्सिको विद्यापीठाचे हॉर्टन न्यूसॉम यांनी म्हटले आहे. मंगळावरील उल्कापाषाणांवर किती वर्षांपासून वातावरणाचा परिणाम होत आहे हे यातून कळते. काही दशलक्ष वर्षांपूर्वी एग रॉक हा उल्कापाषाण मंगळावर कोसळला असावा असे नासाने म्हटले आहे.



एम. एन. शर्मा यांचे निधन

०१. चंडीगढ हे भारतातील पहिले सुनियोजित शहर वसवण्याच्या प्रक्रियेत अगदी सुरुवातीपासून सहभागी असलेले एम. एन. शर्मा अखेर वयाच्या ९३ व्या वर्षी वारले. चंदीगडचे पहिले भारतीय मुख्य वास्तुरचनाकार, अशीही त्यांची ख्याती होती.


०२. त्यांनी अगदी उतारवयात, पंचाऐंशीची उमर गाठल्यानंतर कॅनव्हासवर रंगविलेल्या निवडक २४ चित्रांचे प्रदर्शन चंदीगडच्या ‘अलियाँ फ्रान्से’ने गेल्याच वर्षी भरविले होते.

०३. चंदीगड हेच त्यांचे अध्यात्म होते. त्यातूनच, ‘द मेकिंग ऑफ चंदीगड : ल कॉर्बुझिए अँड आफ्टर’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

०४. त्या शहराच्या उभारणीपूर्वी, ‘भारतीयांची घरे कशी असतात’ हे चंदीगडकर्ते वास्तुरचनाकार ल कॉर्बुझिए यांना पाहायचे होते, तेव्हा शर्मा यांनी त्यांना स्वत:च्या घरीही नेले. 

०५. पुढे कॉर्बुझिए आणि अन्य तिघा युरोपीय वास्तुरचनाकारांच्या पथकांसह तंबूंमध्ये राहून या नगराची आखणी, उभारणी सुरू झाली. या कामासाठी निवडले गेले, तेव्हा (१९४९) शर्मा ब्रिटनमध्ये शिकत होते. 

०६. ल कॉर्बुझिए यांच्या कल्पनेतून साकारलेले हाताच्या तळव्याची पाच बोटे आणि त्यातून उडणारे कबूतर अशा प्रतिमेचे शिल्प प्रत्यक्ष उभारण्याची कामगिरी शर्मानीच केली.