‘अतुल्य भारत’चे सदिच्छादूत.. पंतप्रधान
०१. अधिकाधिक परदेशी पर्यटकांचे भारताकडे पाय वळावेत यासाठी आखण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ या प्रचार अभियानात आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच छबी झळकणार आहेत. पंतप्रधानांनी आतापर्यंत केलेल्या विदेशवाऱ्यांच्या ध्वनिचित्रफिती ‘अतुल्य भारत’च्या प्रचारातून दाखवल्या जाणार आहेत.


०२. ‘अतुल्य भारत’ अभियानातून अभिनेता आमिर खानची गच्छंती झाल्यानंतर त्याच्याजागी अमिताभ बच्चन यांच्याकडे या अभियानाची जबाबदारी सोपवण्याचे घाटत होते. मात्र, आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयानेच कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्याला या अभियानासासाठी पाचारण न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

०३. त्याऐवजी पंतप्रधानांची छबी आणि त्यांच्या विदेशातील भाषणांच्या ध्वनिचित्रफिती ‘अतुल्य भारत’ अभियानासाठी वापरण्याचा निर्णय मंत्रालयातर्फे घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या ध्वनिचित्रफितींची निवड सध्या सुरू असून नोव्हेंबर अखेरीस त्याचे प्रक्षेपण सुरू होईल.



भारत जपानकडून १२ विमाने खरेदी करणार०१. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौऱ्याच्या एक आठवडाआधी भारताने जपानकडून १२ विमानांची खरेदी केली आहे. १० हजार कोटी रुपयांना ही विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. 

०२. यूएस-२ आय विमानांच्या खरेदीमुळे भारत आणि जपानचे संरक्षण संबंध आणखी मजबूत होणार आहेत. अनेक वर्षांपासून हा खरेदीचा प्रस्ताव बारगळला होता.

०३. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११-१२ नोव्हेंबरला टोकियोच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी मोदी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोघांकडून बिगरसैनिकी अणू सहकार्य करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या बहुप्रतिक्षित कराराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

०४. याच भेटीदरम्यान यूएस-२ आय विमानांची खरेदी भारताकडून करण्यात येणार आहे.यातील ६ विमाने नौदल, तर ६ विमाने तटरक्षक दलासाठी खरेदी करण्यात येणार आहेत. 

०५. यूएस-२ आय विमाने कमीतकमी वेळात जमीन आणि पाण्यावरुन उड्डाण करु शकते. चार मोठ्या टर्बोप्रॉपवर चालणाऱ्या या विमानाचा पल्ला ४,५०० किलोमीटरहून अधिक आहे. तीन मीटर उंच लाटांमध्येही यूएस-२ आय विमान समुद्रात उतरु शकते. 

०६. हवाई-सागरी शोध मोहीम आणि मदतकार्यासाठी या विमानाची रचना करण्यात आली आहे. यूएस-२ आय विमाने अतिशय वेगाने उड्डाण करतात. ३० सैनिकांना वाहून नेण्याची क्षमता यूएस-२ आय विमानांमध्ये आहे. 

०७. या विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि जपानमध्ये २०१३ पासून बोलणी सुरू होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्यांच्या जपान दौऱ्यात या विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती.



भारतीय महिलांनी पटकावला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक
०१. सामन्याच्या अंतिम टप्प्यात निर्णायक गोल करत भारतीय महिलांनी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भारताने चीनला २-१ असे नमवत अंतिम फेरीत बाजी मारली.


०२. भारताने सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.दीपिकाने निर्णायक गोल करत भारताला विजेतेपद पटकावून दिले.

०३. साखळीतील चीनविरुद्धचा सामन्याचा अपवाद सोडल्यास या संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही.



लीलाधर कांबळी व चंदू डेग्वेकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
०१. राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या नटवर्य ‘प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कारा’साठी ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांची तर ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारा’साठी ज्येष्ठ गायक-अभिनेते चंद्रकांत ऊर्फ चंदू डेग्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.

०२. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी मुंबईत ही घोषणा केली.

०३. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज तसेच जर्नादन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, राजन ताम्हाणे, डॉ. वंदना घांगुर्डे यांचा समावेश होता.

०४. ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक कांबळी यांच्या नाटय़प्रवासात महत्त्वाचा टप्पा ठरले. ‘वात्रट मेले’हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. संगीत सौभद्र ते संगीत स्वरसम्राज्ञी आदी अनेक संगीत नाटकातून डेग्वेकर यांनी विविध भूमिका केल्या आहेत



महाराष्ट्राच्या ८ खेळाडूंना सरकारी नोकरी
०१. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी प्रस्तावाल मान्यता दिली आहे.

०२. महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे या खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

०३. या प्रस्तावानुसार धावपटू कविता राऊतची आदिवासी विकास विभागात नेमणूक केली जाईल. कुस्तीपटू संदीप यादव, तलवारबाज अजिंक्य दुधारे आणि तिरंदाज नीतू इंगोले यांची क्रीडा विभागात क्रीडा मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली जाईल. 

०४. वेटलिफ्टर ओंकार ओतारी आणि कबड्डीपटू नितीन मदने यांना महसूल विभागात तहसीलदारपद मिळणार आहे. तर नेमबाज पूजा घाटकरची विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षकपदी आणि कबड्डीपटू किशोरी शिंदेची नगरविकास विभागात नेमणूक केली जाईल.