भारताला नोटा बनवण्यासाठी आठ विदेशी कंपन्या पुरवणार कागद
०१. केंद्र सरकार नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता नव्या नोटा पुरेशा प्रमाणात छापण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असून जगातील आठ मोठ्या कंपन्यांना भारतासाठी नोटा बनवण्यासाठी लागणाऱ्या कागदांचा पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे. 


०२. एप्रिल २०१७ पासून या कंपन्या भारताला नोटांसाठी कागदाचा पुरवठा करतील. तेथून सुमारे २७, ५०० मेट्रिक टन कागद भारताला मिळेल. 

०३. या कागदातून छोट्या मूल्याच्या नोटा छापल्या जातील. यामध्ये १०, २०, ५० आणि १०० रूपयांच्या नोटांचा समावेश आहे. मोठ्या मूल्याच्या म्हणजे ५०० व २ हजार रूपयांच्या नोटांसाठीचा कागद भारत स्वत:च बनवणार आहे.

०४. याबाबतचा करार गुरूवार आणि शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ नोट मुद्रण प्रा. लि. च्या मुख्य कार्यालयात झाला.

०५. यासाठी स्वित्झर्लंडमधील लँकार्ड, दक्षिण कोरियाची कोमस्को, फ्रान्सची अॅरोगिनीस, स्वीडनची क्रेन, रशियाची गोझन्क, इंडोनेशियाची पीटी प्युरा, इटलीची फेब्रियानो आणि जर्मनीच्या लुईसेन्थल या कंपनीचे अधिकारी भारतात आले होते.

०६. ब्रिटनच्या डी ला रू कंपनीला हा व्यवहार करण्यासाठी बोलावण्यात आले नव्हते. सुमारे एक दशकाहून अधिक काळ डी ला रू ही कंपनी भारताला नोटा छपाईसाठी कागदाचा पुरवठा करते. 



राजमुद्रेचे चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे निधन
०१. भारतीय राज्यघटनेच्या पानांचे नक्षीकाम करणारे व राष्ट्रीय बोधचिन्ह अशोक स्तंभाचे डिझाईन करणाऱ्या कलाकारांच्या संचातील सहकलाकार दीनानाथ भार्गव यांचे इंदूर येथे शनिवारी निधन झाले.

०२. भारतीय राज्य घटनेच्या पानांचे नक्षीकाम करण्यासाठी प्रसिद्ध चित्रकार व शांती निकेतनमधील कला भवनचे तत्कालीन प्राचार्य नंदलाल बोस यांनी अवघ्या २० वर्षांच्या भार्गव यांची कलाकारांच्या संचात निवड केली. भार्गव हे तेव्हा शांतीनिकेतनमध्ये तीन वर्षांचा फाईन आर्टमध्ये डिप्लोमा करीत होते.

०३. कपड्यांमधील प्रसिद्ध मधुबनी पेंटींग ही त्यांचीच देणगी होती. त्यांच्या वॉश पेंटींग चित्रकला जगतात प्रसिद्ध होती. १९५० च्या दशकात युरोपमधील वर्ल्ड आर्ट टूरमध्येही त्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला होता. या चित्रांसाठी त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते



अय्यप्पा मसगी यांना जीवनगौरव पुरस्कार
०१. पाणीटंचाईवर विविध उपाय शोधणाऱ्या आणि बंगळुरूमधील ‘वॉटर वॉरियर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अय्यप्पा मसगी यांना ‘किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

०२. शासकीय सेवेत राहून पर्यावरणरक्षणाचे काम करणारे वेंगुल्र्याचे रामदास कोकरे यांना ‘वसुंधरामित्र कार्यकर्ता’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

०३. वाघांवरील लघुपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक व छायाचित्रकार सुब्बीह नल्लामुथ्थू यांना ‘वसुंधरामित्र फिल्ममेकर’ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

०४. पाणी आणि ऊर्जा स्रोतांच्या विकासासाठी काम करणाऱ्या ‘सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रीसर्च स्टेशन’ (सीडब्ल्यूपीआरएस) या संस्थेला ‘वसुंधरामित्र संस्था’ हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.



नोएडाच्या क्रिकेट स्टेडियमला आयसीसीकडून मान्यता
०१. आयसीसीने ग्रेटर नोएडा येथील शहीद विजयसिंह पथिक क्रिकेट स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी मान्यता दिली. 

०२. आयसीसीने सर्वात आधी डिसेंबर २0१५ मध्ये स्टेडियमची पाहणी केली होती आणि त्यावेळी फक्त असोसिएट सदस्यांच्या सामन्यांचे आयोजनास मान्यता मिळाली होती. त्यानंतर या स्टेडियममध्ये अतिरिक्त सुविधा दिली गेली. ज्यामुळे पूर्ण सदस्यांचे सामने येथे खेळले जाऊ शकतील. 



पाकिस्तानात धार्मिक सहिष्णुतेसाठी ‘ख्रिसमस रेल्वे’
०१. गैर-मुस्लिमांविरोधात हिंसेच्या वारंवार घटना घडणाऱ्या पाकिस्तानात नाताळच्या निमित्ताने एक खास रेल्वे फिरत आहे.  संपूर्ण देशात धार्मिक सहिष्णुता आणि शांतीचे आवाहन करत ही ख्रिसमस रेल्वे फिरत आहे.

०२. पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांची जयंती आणि नाताळच्या निमित्ताने ही रेल्वे गुरुवारी रवाना झाली. या रेल्वेत सांताक्लॉज आणि रेनडीअरचे पुतळेही आहेत. 

०३. याशिवाय जिना यांची छायाचित्रे आणि त्यांचे जीवनचरित्र सांगणारे फलक आहेत. देशभरात फिरल्यानंतर नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही गाडी कराची येथे पोचेल.



मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले. शिवसागरातील स्मारकासाठीच्या नियोजित ठिकाणी त्यांनी जलअर्पण केले.



ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे निधन
व्यंगचित्राला साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे शनिवारी सायंकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले.

०२. सरवटे यांचा जन्म १९२७ साली कोल्हापूर येथे झाला. पुण्याच्या इंजिनीअरिंग महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर सिमेंट कंपनीत त्यांनी अनेक वर्षे इंजिनीअर म्हणून काम केले. परंतु व्यंगचित्राकडे त्यांचा अधिक कल होता. 

०३. पु. ल. देशपांडे, श्री. दा. पानवलकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी आणि रमेश मंंत्री यांच्या मराठी पुस्तकांवरील मुखपृष्ठे सरवटे यांनी रेखाटली होती.  गेल्या ४० वर्षांपासून ललित मासिकात व्यंगचित्रे काढण्याचे काम त्यांनी केले.

०४. ज्येष्ठ विनोदी लेखक जयवंत दळवी यांच्या ‘ठणठणपाळ’ या मराठीतल्या खुशखुशीत साहित्यकृतीला व्यंगचित्राची जोड देण्याचे काम सरवटे यांनी केले.

०५. ‘खडा मारायचा झाला तर!’, ‘सावधान पुढे वळण आहे’, ‘खेळ रेषावतारी’, ‘खेळ चालू राहिला पाहिजे!’ या व्यंगचित्रसंग्रहातून त्यांनी काढलेली व्यंगचित्रे अधिक गाजली.

०६. सरवटे यांच्या तीन संग्रहांना राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले आहे. त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ कार्टुनिस्ट जीवनगौरव पुरस्कार, सह्याद्रीचा ‘कलारत्न’ पुरस्कार आणि कार्टुनिस्ट कंबाइन संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.



‘न-नापास’ धोरण पाचवीपर्यंतच
०१. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या ‘न-नापास’ धोरणावर निर्बंध घालण्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्रस्तावाला विधि मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे हे धोरण आता पाचवीपर्यंत सीमित राहणार आहे.

०२. विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण होण्याची भीती राहिली नसल्याने त्यांचे अभ्यासातील गांभीर्य कमी झाले आहे. शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे निरीक्षणही या टिपणीत नोंदविण्यात आले होते.

०३. शिक्षणाचा अधिकार कायद्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासंबंधीच्या तरतुदीबरोबरच ‘न-नापास’ धोरणाचाही समावेश करण्यात आला होता. या तरतुदीची अंमलबजावणी आणि सर्वव्यापी मूल्यांकनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची उपसमिती नेमण्यात आली होती.

०४. उपसमितीच्या बैठकीत अनेक राज्यांनी या धोरणाला विरोध करत त्याचा आढावा घेण्याची मागणी केली होती.



पाकने २२० भारतीय मच्छिमारांची केली सुटका
०१. उरी दहशतवादी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आली आहे. 

०२. पाकिस्तानने त्यांच्या सागरी हद्दीत गेलेल्या २२० भारतीय मच्छिमारांची आज, रविवारी सुटका केली आहे. पाकिस्तानच्या या कृतीमुळे दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध निवळण्यात मदत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

०३. पाकिस्तानी हद्दीत चुकून गेलेल्या मच्छिमारांची मालिर तुरुंगातून सुटका करण्यात आल्याचे तुरुंग अधीक्षक हसन सेहतो यांनी सांगितले. सुटका केलेल्या मच्छिमारांना लाहोर येथे जाणाऱ्या रेल्वेगाडीतून पाठवण्यात आले आहे. तेथून वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात त्यांना दिले जाईल.

०४. २२० भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली असून, अद्याप २१९ मच्छिमार ताब्यात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

०५. अलिकडेच भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या मच्छिमारांना तटरक्षक दलाने अटक केली होती. या मच्छिमारांकडून बोटीही जप्त केल्या होत्या. 

०६. त्यापूर्वी भारतीय सागरी हद्दीत सीर क्रीक भागात घुसखोरी केलेली पाकिस्तानी बोट बीएसएफने जप्त केली होती. तर सीर क्रीक भागातच ९ पाकिस्तानी नागरिकांना बोटीसह ताब्यात घेण्यात आले होते.



रशियन लष्कराचे बेपत्ता विमान कोसळले
०१. रशिया ते सिरिया या प्रवासासाठी निघाल्यानंतर बेपत्ता झालेल्या रशियन विमानाचा अपघात झाल्याची अधिकृत माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. 

०२. काळा समुद्रपरिसरात झालेल्या या अपघातामध्ये विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 

०३. सोत्शी येथून उड्डाण केलेले रशियन लष्कराचे टी-यू १५४ विमान रडारावरून बेपत्ता झाले होते. या विमानातून स्क्रू मेंबरसह ९२ प्रवासी प्रवास करत होते. 

०४. हे विमान रशियातील जलक्षेत्रात बेपत्ता झाले होते. बेपत्ता विमानाची शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. सोत्शीच्या तळापासून जवळपास दिड किलोमीटर अंतरावर विमानाचे काही अवषेश सापडल्यानंतर बेपत्ता विमानाचा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. 

०५. अखेर विमानातील सर्व प्रवाशांनी जीव गमावला असल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विमान दुर्घटनेमध्ये ९ रशियन पत्रकारांसह कलाकार आणि सैनिकांचाही समावेश होता.



ब्रिटिश पॉप गायक मायकल जॉर्ज कालवश
०१. ब्रिटिश पॉप गायक मायकल जॉर्ज यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले आहे. जॉर्ज यांच्या अल्बम्सच्या आतापर्यंत १० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. मायकल जॉर्ज यांच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

०२. काही वर्षे एकांतवासात राहिलेले मायकल जॉर्ज अंमली पदार्थांच्या अनेक घटनांमुळे चर्चेत आले होते.क्लब ट्रॉपिकॅना, लास्ट ख्रिसमस, केअरलेस विस्पर आणि फेथ यामुळे मायकल जॉर्ज अनेकांच्या लक्षात आहेत. 

०३. जॉर्ज मायकल यांनी अगदी सहजसोप्या पद्धतीने त्यांच्या गाण्यातून जगण्याचे विविध अनुभव मांडले. चीनमध्ये निर्बंध असताना जॉर्ज चीनमध्ये जाऊन गायले होते. त्यावेळी त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. 

०४. इतर पॉप गायकांप्रमाणेच जॉर्ज मायकल यांची जीवनशैलीदेखील थोडी बेधुंद होती. त्यामुळेच त्यांना अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय लागली होती. त्यामुळे त्यांना काही वेळा तुरुंगवासदेखील भोगावा लागला होता.