जळगावातील निशा पाटीलला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार
स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जळगाव जिल्ह्यातील निशाने आग लागलेल्या घरात उडी मारली. पूर्वी देशमुख ही सहा महिन्यांची चिमुरडीला ठेवलेल्या पाळण्यापर्यंत आग पोचली होती. मग निशा क्षणाचाही विलंब न लावता पाळण्यातील पूर्वीला जिगरबाजपणाने सुखरूप बाहेर घेऊन आली


ही गोष्ट घडली १४ जानेवारी २०१५रोजी. त्या शौर्यासाठी मंगळवारी तिला २०१६ चा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला. २३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर निशाला यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात सहभागी होण्याचा मानही दिला आहे. 

सध्या निशा ही भडगाव येथील आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यलयात बारावीत शिकत आहे. आठवीच्या वर्गात हिंदीच्या पुस्तकातील ‘साहसी बालक’ या धडयापासून साहसी कृत्याची प्रेरणा मिळाल्याचे तिने सांगितले.

निशाबरोबरच असे शौर्य दाखविणारया पंचवीस बालकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये चौघांचा मरणोत्तर सन्मान होत आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.



‘जलीकट्ट’साठी तामिळनाडूत तीव्र निदर्शने
जलीकट्टमूवरील (बैलांच्या शर्यती) बंदी उठविण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूमध्ये तीव्र आंदोलन सुरू आहे. 

जल्लीकट्ट हे तमिळ संस्कृतीचे प्रतीक असून, त्यावरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी बुधवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. हजारो लोकांनी मरीना समुद्र किनाऱ्यावर एकत्र येऊन जलीकट्टुच्या समर्थनार्थ निदर्शने केली. 

तमुक्कममध्ये या मागणीसाठी तीन विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी बैलांना मोकाट सोडून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. 

जलीकट्टुविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेविरोधातही आंदोलकांनी रोष व्यक्त केला. या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.

पोंगल सणाच्या दुसऱ्या दिवशी मदुराई येथून सुरू झालेल्या या राज्यव्यापी आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी २०० आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन आणखीनच भडकले.

पोंगल उत्सवादरम्यान आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला. मदुराई जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये निषेध म्हणून काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. 

जलीकट्टू या खेळाला सुमारे २,००० वर्षांची परंपरा आहे. बैलाच्या शिंगाला पैसे बांधून त्या बैलाला पळवले जाते. जी व्यक्ती पळणाऱ्या बैलाच्या शिंगावरुन पैसे काढेल ती व्यक्ती विजयी ठरवली जाते. 

या खेळामध्ये बैलांवर अत्याचार होतो तसेच आतापर्यंत अनेक जण या खेळामध्ये जखमी झाले आहेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी घातली होती. 



कपिल देव यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर, सुनील गावस्कर आणि नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या उपस्थितीत बुधवारी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. 

भारतीय संघासाठी १९८३ साली विश्वचषक जिंकून देणाऱया कपिल देव यांना भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाते. 

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि लेजड्ंस क्लबचे अध्यक्ष माधव आपटे यांच्या हस्ते कपिल देव यांना ‘हॉल ऑफ फेम’चे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. 

कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारे पहिले फलंदाज सुनील गावस्कर यांचाही प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. गावस्कर यांचा याआधीच ११ जुलै २०१३ साली क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.



केंद्राच्या धर्तीवरच राज्याचा अर्थसंकल्प
योजनेतर खर्चावर अंकुश ठेवण्याबरोबरच भांडवली खर्चावर अधिक भर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात योजना आणि योजनेतर निधी एकत्र करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

केंद्रीय अर्थसंकल्पात मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार रेल्वे अर्थ संकल्प आता सर्वसाधारण अर्थसंकल्पातच मांडण्यात येणार असून, योजना आणि योजनेतर खर्चही एकत्र दाखविण्यात येणार आहे. 

आजवर राज्याच्या अर्थसंकल्पात योजना आणि योजनेतर खर्चासाठी स्वतंत्र तरतुदी केल्या जात होत्या. योजनेतर खर्चातून कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन, दैनंदिन खर्च, दुरुस्ती आदी बाबींचा समावेश होतो. तर भांडवली खर्चात विकास कामे, योजना, प्रकल्पांवर होणाऱ्या खर्चाची तरतूद असते. 

योजनेतर खर्चापेक्षा योजनांवर खर्च जास्त झाल्यास राज्याच्या विकासाला गती मिळते. मात्र, अर्थसंकल्पावरील योजनेतर खर्चाचा भार वाढला आहे. त्यामुळे योजनांवर खर्च वाढविण्याच्या दृष्टीने तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या योजनेतर बाबींवर ७५ टक्के खर्च होत असून केवळ २५ टक्के निधी योजनांवर खर्च होत आहे. 
राज्याच्या २०१६-१७ च्या एकूण दोन लाख २० हजार कोटींच्या अर्थसंकल्पात ५६ हजार कोटींची तरतूद योजनेंतर्गत म्हणजेच विकासकामांसाठी करण्यात आली होती.

योजनेतर बाबींवरील खर्चावर विभागांचे दुर्लक्ष होत असून या खर्चात वाढ होत आहे. परिणामी राज्याच्या विकासावर परिणाम होत असून योजनेतर खर्चावर अंकुश आणण्यासाठीच ही तरतूद अर्थसंकल्पातून वगळण्यात येणार असल्याचे वित्त विभागातील सूत्रांनी सांगितले.



ज्येष्ठ साहित्यिक, कवी पुरुषोत्तम पाटील यांचे निधन
प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ कवी आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य प्रा. पुरुषोत्तम श्रीपत पाटील उपाख्य ‘पुपाजी’ यांचे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धुळे येथील राहत्या घरी  हृदयविकाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. साहित्यप्रेमींमध्ये ‘पुपाजी’ म्हणून ते प्रसिद्ध होते.

पाटील यांचा जन्म ३ मार्च १९२८ रोजी जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर (ता.पारोळा) येथे झाला. त्यांचे मूळ गाव ढेकू (अमळनेर, जिल्हा जळगाव) हे आहे. 

सातवीपर्यंत बहादरपूरला शिक्षण घेतल्यावर अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधून १९४६ मध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे ते पुण्याला गेले. फग्र्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्यांच्या कविता ‘सत्यकथा’मधून प्रकाशित होऊ लागल्या. 

१९४७ पासून काव्यलेखन करणाऱ्या पाटील यांचा पहिला काव्यसंग्रह ‘तळ्यातल्या सावल्या’ १९७८ मध्ये प्रकाशित झाला. त्यास राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. कवितेसाठी वाहिलेले ‘कवितारती’ हे द्वैमासिक त्यांनी १९८५ मध्ये सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे. 

नेक वर्तमानपत्रांमधून त्यांनी साहित्यिक व सामाजिक विषयांवर लेखन केले. ‘तुकारामाची काठी’ आणि निवडक मराठी कवितांचे मर्म उलगडून दाखविणारे ‘अमृताच्या ओळी’ ही त्यांची दोन पुस्तके अशा सदर लेखनांचा संग्रह आहेत. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांचे ते सदस्य होते. १९८५ मध्ये प्रजासत्ताकदिनी झालेल्या अखिल भारतीय बहुभाषिक कविसंमेलनात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य होते. 



मंगळावरील वातावरणात सूक्ष्म जीव टिकू शकतात
मंगळावरील विरळ हवेत सूक्ष्म जीव जिवंत राहू शकतात, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. पृथ्वीवरील मिथेन निर्मिती करणारे जिवाणू मंगळावर टिकाव धरू शकतील असा त्यांचा अंदाज आहे. भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाचा या संशोधनात समावेश आहे. 

मंगळाचा पृष्ठभाग सध्या कोरडा व थंड आहे, पण तेथे नद्या, सरोवर व सागर अब्जावधी वर्षांपूर्वी होते याचे पुरावे आहेत. पृथ्वीवर जेथे द्रव आहे तेथे सूक्ष्म जीव आहेत. मंगळावरील ओलसरपणा होता त्यामुळे तेथे अजूनही सूक्ष्म जीव असावेत. 

अमेरिकेतील अरकान्सास विद्यापीठाच्या रिबेका मिकॉल यांनी सांगितले की, पृथ्वीवर जसे सूक्ष्म जीव आहेत तसे तिथेही असू शकतात. अगदी आपल्यासारखेच सूक्ष्म जीव तिथे असतील असे नाही, तर त्यात फरक असू शकतो. 

आधीच्या संशोधनानुसार मंगळाच्या वातावरणात मिथेनचा कार्बनी रेणू सापडला होता. मिथेन निर्मितीचे अजैविक मार्गही आहेत, त्यात ज्वालामुखीची क्रिया हा एक आहे. पृथ्वीवर या वायूची निर्मिती गाईगुरांच्या शेणातून होत असते. मंगळाच्या वातावरणातही मिथेन आहे. 

पृथ्वीवर जैविक पद्धतीने मिथेनची निर्मिती होते. पृथ्वीवर मिथॅनोजेन्स नावाचे सूक्ष्म जीव आहेत, त्यांचा यात मोठा वाटा आहे. त्या सूक्ष्म जिवांना अ‍ॅनेरोब्स म्हणतात. त्यांना ऑक्सिजन लागत नाही. ते ऊर्जेसाठी हायड्रोजन वापरतात व कार्बनी रेणू निर्मितीत ते कार्बन डायॉक्साईडमधील कार्बन अणू वापरतात. 

मिथॅनोजेन्सना ऑक्सिजन लागत नाही व प्रकाशसंश्लेषणही लागत नाही. याचा अर्थ ते मंगळाच्या पृष्ठभागाखाली जिवंत राहू शकतात. त्यामुळे ते मंगळावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पदवीधर विद्यार्थिनी नविता सिन्हा यांनी मिथॅनोजेन्सच्या चार प्रजातींवर प्रयोग केले असून त्यात मिथॅनोथर्मोबॅक्टर वुल्फेई, मिथॅनोसारसिना बारकेरी, मिथॅनो बॅक्टेरियम फॉर्मिसिसीयम व मिथॅनोकॉकस मारीपॉलुडिस या जिवाणूंचा समावेश आहे. हे संशोधन ‘जर्नल ओरिजिन्स ऑफ लाईफ अँड इव्होल्यूशन ऑफ बायोस्पिअर्स’मध्ये प्रकाशित झाले आहे.



सर्वसमावेशक विकासात भारत ६० वा 
सर्वसमावेशक विकासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या जगातील ७९विकसनशील राष्ट्रांच्या यादीत भारताला ६० वे स्थान मिळाले आहे.

जागतिक आर्थिक मंचाद्वारे (डब्ल्यूईएफ) सोमवारी ‘समावेशक वाढ आणि विकास अहवाल २०१७’ प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार , समावेशक विकास निर्देशंकात भारताला शेजारच्या पाकिस्तान आणि चीन यांच्यापेक्षाही खालचे म्हणजे ६० वे स्थान मिळाले आहे. 

या अहवालात म्हटल्याप्रमाणे बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये आर्थिक विकासाच्या संधी आणि विषमता कमी करण्याच्या संधींना मुकावे लागत आहे. यासाठी धोरणकर्त्यांकडून तयार करण्यात येणारे विकासाचे प्रारूप आणि विकास मोजण्याच्या निकषांमधील त्रुटी कारणीभूत आहेत.

१२ निर्देशक घटकांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्त्पनाशिवाय (जीडीपी) वाढ आणि विकास, समावेशकता आणि शाश्वतपणा या अन्य तीन निकषांचाही विचार करण्यात आला होता. 

या सर्व निकषांच्याआधारे तयार करण्यात आलेल्या ७९ देशांच्या यादीत लिथुआनिया या देशाने पहिला क्रमांक पटकावला असून अझेरबैजान व हंगेरी या दोन राष्ट्रांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले आहे. 

मात्र, या यादीत भारत जवळपास तळाला म्हणजे ६० व्या स्थानावर फेकला गेला आहे. विशेष गोष्ट म्हणजे भारताची शेजारी राष्ट्रे भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत. यामध्ये चीन १५ व्या, नेपाळ २७ व्या , बांगलादेश ३६ व्या आणि पाकिस्तान ५२ व्या स्थानावर आहे. 

याशिवाय, ब्रिक्स राष्ट्रांपैकी एक असणारे रशिया आणि ब्राझील अनुक्रमे १३व्या आणि ३०व्या स्थानावर आहेत. 

प्रचंड मनुष्यबळ आणि प्रति माणसी जीडीपीच्याबाबतीत जगातील पहिल्या दहा देशांमध्ये असूनही भारताला यादीत ६० वे स्थान मिळाले आहे, ही बाब निश्चितच लक्ष वेधून घेणारी आहे. 

दरम्यान, विकसित राष्ट्रांसाठी अशाचप्रकारे तयार करण्यात आलेल्या अहवालात नॉर्वेने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर लक्झेम्बर्ग , स्वित्झर्लंड, आईसलँड आणि डेन्मार्क या राष्ट्रांनी अनुक्रमे पहिल्या पाचांमध्ये स्थान पटकावले आहे.



फाल्कन ९ अग्निबाणाचा मोठा भाग उपग्रह सोडून पृथ्वीवर परत
स्पेस एक्स कंपनीने त्यांचा फाल्कन ९ अग्निबाण उडवला. नंतर त्याचा पहिल्या टप्प्याचा भाग पृथ्वीवर परतला, त्याचा फेरवापर करता येतो. त्यामुळे अग्निबाणाच्या मदतीने उपग्रह सोडण्याचा खर्च कमी होत असतो. 

सप्टेंबरमध्ये या कंपनीच्या अग्निबाणाचा स्फोट झाला होता त्यानंतरचे हे पहिलेच यशस्वी उड्डाण आहे. 

पांढऱ्या रंगाचा लांबलचक अग्निबाण स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.५४ वाजता अवकाशात झेपावला व त्याने इरिडियम या मोबाईल व डाटा कम्युनिकेशन कंपनीचे दहा उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले. 

फाल्कन ९ अग्निबाण अवकाशात झेपावल्यानंतर त्याचे दोन भाग वेगळे झाले. उपग्रह अवकाशातील कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर त्याचा लांबलचक भाग पृथ्वीवर परत आला. 

स्पेस एक्स कंपनीने आतापर्यंत उपग्रह सोडून झाल्यानंतर अग्निबाण जमीन व पाण्यात यशस्वीपणे उतरवले आहेत. त्यांचा फेरवापर करता येत असल्याने खर्च वाचतो. 

येत्या काही महिन्यांत स्पेसएक्स कंपनी इरिडियमचे ८१ उपग्रह अवकाशात पृथ्वी निकटच्या कक्षेत सोडणार आहे. 

सप्टेंबरमध्ये स्पेसएक्सच्या अग्निबाणाचा स्फोट होऊन २० कोटी डॉलर्सचा उपग्रह नष्ट झाला होता. हा उपग्रह फेसबुकची सेवा आफ्रिकेत इंटरनेट मार्फत पुरवण्यासाठी सोडला जात होता. ड्रॅगन कार्गो शिप अवकाश स्थानकात मालसामान घेऊन जात असताना जून २०१५ मध्येही एक स्फोट झाला होता.