जल्लिकट्टूचा मार्ग मोकळा, अध्यादेश पारित होणार
जल्लिकट्टूच्या बंदीविरोधात तामिळनाडूत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने तामिळनाडू सरकारला यासंदर्भातील अध्यादेश जारी करण्याची परवानगी दिली. 


शनिवारी तामिळनाडूतील राज्य मंत्रिमंडळ बैठक घेऊन जल्लिकट्टूबाबतचा अध्यादेश जारी करण्याची विनंती राज्यपाल विद्यासागर राव यांना करतील.

जल्लिकट्टू या क्रीडा प्रकारावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या मुद्दय़ावरून तामिळनाडूत जनक्षोभ उसळला आहे. 

या सर्व पाश्र्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय गृह, कायदा व पर्यावरण मंत्रालयांनी राज्याच्या अध्यादेशाच्या मसुद्याची छाननी केली. तसेच स्पर्धेत भाग घेऊ न शकणाऱ्या प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळण्यात येण्याच्या अध्यादेशातील दुरुस्तीला मान्यता दिली. 

त्यानुसार आता जल्लिकट्टूत सहभागी असलेल्या बैलांना पशुक्रूरता प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी लागू होणार नाही. केंद्राच्या मान्यतेमुळे आता जल्लिकट्टूचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जल्लिकट्टू हा ‘बैलाला कवटाळण्याचा’ खेळ असून, तामिळनाडूत पोंगल सणाचा भाग म्हणून तो पुरातन काळापासून खेळला जातो. तो स्पेनमधील ‘बुल फायटिंग’ सारखा दिसत असला तरी यात बैलाला ठार मारण्यात येत नसल्यामुळे तामिळनाडूतील हा खेळ वेगळा आहे.
गेल्या काही वर्षांत जल्लिकट्टू दरम्यान अनेक लोक ठार झाले असले तरी एकही बैल ठार झालेला नाही किंवा त्याचे हाल झालेले नाहीत

जलीकट्टूवर बंदी उठवण्याची मागणी होत असताना केंद्र सरकारने समेटाची भूमिका घेत यावर कायदेशीर तोडगा लवकरात लवकर काढला जाईल व त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे स्पष्ट केले. 




आयएनएस विक्रमादित्यवर एटीएमची सुविधा
भारताची सर्वात मोठी युद्धनौका आणि नौदलाचे सामर्थ्य वाढवणा-या आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशिन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मशिन सॅटेलाईटवर चालणार असून एटीएमची सुविधा असलेली विक्रमादित्य ही पहिलीच युद्धनौका ठरणार आहे.

भारतीय नौदलात दाखल झालेली आयएनएस विक्रमादित्य ही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रमादित्य या बलशाली विमानवाहू युद्धनौकेवर अतिअद्ययावत संवाद आणि युद्धयंत्रणा बसविण्यात आली आहे. 

आयएनएस विक्रमादित्य या तरंगत्या युद्धभूमीची उंची ६० मीटर्स उंच असून ही उंची २० मजली इमारतीएवढी आहे. तिच्या २० मजल्यांमध्ये २४ डेक्स आहेत. युद्धनौकेची लांबी २८४ मीटर्स म्हणजेच फुटबॉलची तीन मैदाने एका ओळीत ठेवली तर त्यांच्या लांबीइतकी आहे. तिच्यावर असलेल्या १६०० ते १८०० नौसनिकांना महिन्याभरासाठी दर महिन्याला एक लाख अंडी, २० हजार लीटर्स दूध आणि १६ टन तांदूळ लागतो. 

ही रसद पूर्ण भरलेल्या अवस्थेत ही विमानवाहू युद्धनौका सलग ४५ दिवस प्रवास करू शकते. दर दिवशी ४०० टन खारे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी यावर एक जलशुद्धीकरण प्रकल्पच वसविण्यात आला आहे. 

या युद्धनौकेची २४ विमान आणि १० हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता आहे.२०१३ मध्ये यूपीए सरकारच्या काळात ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली होती.

विक्रमादित्य युद्धनौकेवरील नौसैनिकांच्या मदतीसाठी युद्धनौकेवर एटीएम मशिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने ही मशिन बसवली जाणार असून सॅटेलाईटच्या मदतीने ही मशिन चालणार आहे.



अंतराळ तंत्रज्ञानच्या आधारे रस्त्यावर धावणार इलेक्ट्रॉनिक वाहने
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) संयुक्तपणे एका प्रकल्पावर काम करत आहेत. 

या प्रकल्पामुळे अंतराळात वापरली जाणारे तंत्रज्ञान जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये वापरले जाऊ शकते. या प्रकल्पांतर्गत एका गाडीवर हा प्रयोगदेखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

इस्रो आणि एआरएआय मिळून लिथियम ऑयन बॅटरी तंत्रज्ञानाच्या आधारे जमिनीवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्याच्या तयारीत आहेत. जर हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात क्रांती होऊ शकते

इस्रो आणि एआरएआयने ज्या गाडीमध्ये अंतराळातील तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयोग केला, त्या गाडीमध्ये ४८ वोल्ट आणि ५० ऍम्पियरची बॅटरी लावण्यात आली होती. प्रयोगासाठी वापरण्यात आलेली गाडी २ तासांच्या चार्जिंगनंतर ९० किलोमीटर चालू शकते. ही गाडी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने रस्त्यावर धावू शकते.



कटक सामना जिंकून भारतीय संघाचा मालिका विजय
कटक सामन्यात भारतीय संघाने १५ धावांनी विजय प्राप्त करून तीन सामन्यांची मालिका २-० ने खिशात घातली आहे. भारतीय संघाकडून दीडशतकी कामगिरी करणारा युवराज सिंग आणि त्याला साजेशी साथ देत १३४ धावांची खेळी साकारलेला महेंद्रसिंग धोनी हे विजयाचे शिल्पकार ठरले



सायनाची मलेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये धडक
भारताची फुलराणी सायना नेहवालने मलेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रियानी या खेळाडूचा २१-१५, २१-१४ ने पराभव केला.

पुरूष एकेरीमध्ये मात्र भारताच्या अजय जयरामचा पराभव झाला. क्वार्टर फायनलमध्ये इंडोनेशियाच्या अँथनी गिंटिंगने जयरामचा २१-१३, २१-८ असा पराभव केला. २८ मिनिटं चाललेल्या या मॅचमध्ये १९ व्या सीडेड जयरामचं आव्हान संपुष्टात आलं. या खेळाडूविरूध्द जयरामचा झालेला हा तिसरा पराभव आहे.



डॉ. विजया राजाध्यक्ष यांना ‘जनस्थान’
साहित्य क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या यंदाच्या जनस्थान पुरस्कारासाठी ज्येष्ठ समीक्षक आणि कथाकार डॉ. विजया राजाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

सर्जनशील लेखन, समीक्षा, कथा आदी वाङ्मयीन प्रकारात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. विजया राजाध्यक्ष यांना हा पुरस्कार २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे वितरित केला जाईल. पुरस्काराचे यंदा १४ वे वर्ष आहे.

विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल, ना.धों महानोर, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे, अरुण साधू यांना यापूर्वी हा ‘जनस्थान’ पुरस्कार मिळाला आहे.



प्रगतीशील शहरांच्या यादीत बंगळुरू नंबर वन
शांघाय, सिलिकॉन व्हॅलीला मागे टाकत बंगळुरू शहराने प्रगतीशील शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. 

जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) प्रगतीशील शहरांची नवी यादी जाहीर केली आहे. तंत्रज्ञानाचा आणि नाविण्यपूर्ण गोष्टींचा अंगिकार हे मुदे विचारात घेऊन प्रगतीशील शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. 

बंगळुरुसोबतच हैदराबाद शहरानेही पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. प्रगतीशील शहरांच्या यादीत हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे.

बंगळुरूनंतर प्रगतीशील शहरांच्या यादीत व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराने दुसरे स्थान पटकावले आहे. तर सिलिकॉन व्हॅली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ३० प्रगतीशील शहरांची यादी तयार केली आहे. यामध्ये बंगळुरू, हैदराबादसह दिल्ली, मुंबई आणि चेन्नईला स्थान देण्यात आले आहे.

बंगळुरू शहर देशाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी समजली जाते. याशिवाय नवउद्यमींसाठी (स्टार्ट अप) बंगळुरूतील वातावरण पोषक समजले जाते.