डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती
भारताच्या परम या पहिल्या सुपर कम्प्युटरची निर्मिती करणारे प्रसिद्ध वैज्ञानिक विजय भटकर यांची शुक्रवारी नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


अमेरिकेकडून भारताला सुपर कम्प्युटरची विक्री करण्यास नकार देण्यात मिळाल्यानंतर भटकर यांनी ‘परम’ या स्वदेशी सूपर कम्प्युटरची निर्मिती केली होती. 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे. २५ जानेवारी २०१७ पासून डॉ. भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलपती असतील.

काही दिवसांपूर्वीच सिंगापूरचे माजी मंत्री असलेले जॉर्ज यिओ यांनी नालंदा विद्यापीठाचे पद सोडले होते. विद्यापीठाच्या तत्कालीन हंगामी कुलगुरू व्हीसी गोपा सभरवाल यांच्या अचानकपणे करण्यात आलेल्या उचलबांगडीच्या मुद्द्यावरून नाराजी दर्शवत जॉर्ज यिओ यांनी हे पद सोडले होते. 


कुलपतींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विद्यापीठाच्या देररेख समितीत सभरवाल यांचा समावेश होता. मात्र, विद्यापीठाच्या नियमांप्रमाणे दुसऱ्यांदा मुदतवाढ न देता सभरवाल यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. 

यापूर्वी २०१५ मध्ये सरकारने नालंदा विद्यापीठाचे कुलपती अमर्त्य सेन यांच्या पदाला मुदतवाढ देण्यास नकार दिला होता.

दरम्यान, जॉर्ज यांच्या नंतर पंकज मोहन यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपद सोपविण्यात आले होते. प्रभारी कुलगुरु पंकज मोहन आणि विद्यापीठाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी डॉ. भटकरांचे अभिनंदन करत त्यांना तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 

डॉ. भटकरांना यापूर्वी पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. भटकर यापूर्वी पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या वैज्ञानिक समिती आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन देखरेख समितीचे सदस्य राहिले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या आयटी टास्क फोर्समध्येही त्यांचा समावेश होता.



‘गार’ १ एप्रिलपासून नवीन कायदा
कर चुकवेगिरीवर चाप लावण्यासाठी जनरल अॅन्टी अव्हायडन्स रुल अर्थात ‘गार’ या कायद्याची १ एप्रिल २०१७ पासून अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे.

कर चुकवण्यासाठी काही कंपन्या परदेशातून विशेषतः सिंगापूर आणि मॉरिशस यासारख्या देशांमधून गुंतवणूक करतात. व्होडाफोन – हचिसन्स या व्यवहाराच्या वेळी ही बाब प्रकर्षाने समोर आली होती. तेव्हापासून कर चुकवण्यासाठी केलेल्या स्थलांतरावर चाप लावण्यासाठी स्वतंत्र कायदा निर्माण करण्याची गरज भासली. 

तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अर्थसंकल्पातून या कायद्याचा उगम झाला होता. मात्र भांडवली बाजारासह अर्थ क्षेत्रातून या कायद्याबाबत नाराजी व्यक्त झाली आणि हा कायदा मागे पडला. 

अखेर ‘शोम समितीं’ नियुक्त करण्यात आली होती. या कायद्यासाठी आयकर विभागातील कर्मचा-यांना प्रशिक्षण द्यावे लागेल असे या समितीने म्हटले होते.

विचारविनिमय केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाने अखेर गार कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. २०१७ – १८ या आर्थिक वर्षापासून कायदा लागू होईल असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. 

भारताशिवाय ‘गार’ हा कायदा अन्य देशांमध्येही आधीपासूनच अस्तित्वात आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन. दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये हा कायदा अस्तित्वात आहे. 



लवकरच येणार हायपरलूप
केंद्र सरकार लवकरच हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याने प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार आहे. 

हायपरलूपच्या माध्यमातून १०८० किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास शक्य आहे. हायपरलूपची क्षमता ट्रेनसारखी असली तरी हायपरलूपमधील सोयीसुविधा मेट्रोसारख्या असतात,’ अशी माहिती हायपरलूप वनचे उपाध्यक्ष ऍलन जेम्स यांनी दिली आहे. 

भारतात पाच मार्गांवर हायपरलूप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवासी मार्ग सुरू केला जाणार आहे. याबद्दलची शासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये हायपरलूप तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे.

हायपरलूप तंत्रज्ञानावर काम करणारी हायपरलूप वन ही सध्या जगातील एकमेव कंपनी आहे.हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवासी किंवा सामानाची ने-आण करणे शक्य होते. 

यासाठी विशिष्ट प्रकारच्या ट्यूबची (बोगदा) निर्मिती करावी लागते. या ट्यूबमध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डबे असतात. हे डबे ट्यूबमधील चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरुन धावतील. ट्यूबमध्ये हवे प्रतिरोध नसल्याने आणि चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगाने धावू शकतात. 

एका डब्यामधून २८ ते ३० प्रवासी प्रवास करु शकतात. ३० सेकंदानंतर प्रत्येक कॅप्सूल सोडता येईल असा दावा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 

बुलेट ट्रेनसाठी प्रति किलोमीटर २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर हायपरलूपसाठी प्रति किलोमीटर २६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पण बुलेट ट्रेनपेक्षा हायपरलूप ट्रेनच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च खूप कमी आहे 



रॉजर फेडररचा १८ व्या ग्रँडस्लॅमचा विश्वविक्रम
विलक्षण इच्छाशक्तीचे प्रतीक असरणाऱया रॉजर फेडरर याने पुन्हा एकदा आपणंच टेनिसचे राजे असल्याचे सिद्ध करून दाखवले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्याच्या चुरशीच्या लढतीत राफेल नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ असा विजय प्राप्त केला.


 फेडररने या विजयासह आपल्या कारकीर्दीतील १८ ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याचा विश्वविक्रम केला. विशेष म्हणजे, फेडररचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील १०० वा सामना होता. पाच वर्षांनंतर फेडररच्या खात्यात ग्रँडस्लॅमचे विजेतेपद जमा झाले.

 २०११ नंतर आज पहिल्यांदाच रॉजर फेडरर आणि राफेल नदाल ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत टेनिस चाहत्यांना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये पाहायला मिळाली. फेडररच्या खात्यात आता तब्बल १८ ग्रँडस्लॅम जमा झाली आहेत. तर राफेल नदालकडे एकूण १४ ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत.

२००७ नंतर नदालने मिळवलेला हा पहिलाच विजय आहे आण ऑस्ट्रेलियन स्पध्रेतही फेडररने पहिल्यांदा नदालला नमवले. ३५ वर्षीय फेडरर त्याच्या कारकिर्दीत ग्रँड स्लॅम जिंकणारा वयस्क खेळाडू आहे.





सानिया मिर्झाचे मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये पराभव
सातव्यांदा ग्रॅण्डस्लॅम पटकावण्याचे सानिया मिर्झाचे स्वप्न रविवारी भंगले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डॉडीग या जोडीचा पराभव झाला आहे. 

कोलंबियाच्या ज्युआन सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अॅबिगेल स्पीअर्स या जोडीने सानिया – डॉडीग या जोडीचा ६-४, ६-४ ने पराभव केला. नवख्या जोडीने अव्वल सीडेड जोडीचा पराभव करत धक्कादायक  विजयाची नोंद केली आहे.

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या समांथा स्टोसूर आणि सॅम ग्रोथ जोडीवर ६-४, २-६, १०-५ असा विजय मिळवत सानिया-डॉडीग ही जोडी फायनलमध्ये पोहोचली होती. फायनलमध्ये सानिया-डॉ़डीगसमोर सेबास्टियन कॅबल आणि अमेरिकेची अॅबिगेल स्पीअर्स या जोडीचे आव्हान होते.


सानियाच्या खात्यात मिश्र दुहेरीची तीन ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदं जमा आहेत. २०१४ साली सानियाने ब्राझीलच्या ब्रुनो सोअर्सच्या साथीने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. 

मागील वर्षी सानियाला फ्रेंच ओपन स्पर्धा देखील जिंकण्याची संधी होती. पण सानियाला लिएण्डर पेस-मार्टिना हिंगीस जोडीसमोर पराभव स्विकारावाला लागला होता.



सेरेनाने स्टेफी ग्राफचा विक्रम मोडला
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आॅस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलंय. हा सेरेनाचा २३वा ग्रँड स्लॅम विजय अाहे. यावर्षीचं जेतेपद पटकावून सेरेनाने स्टेफी ग्राफचा विक्रम मोडलाय. 

अंतिम फेरीत सेरेनाने तिची बहीण व्हीनस विल्यम्सचा ६-४, ६-४ ने पराभव केला. सेरेनाने महिलांच्या टेनिसमध्ये आपलं अव्वल मानांकन परत मिळवलं आहे.

तर महिलांच्या टेनिस स्पर्धांमध्ये सर्वधिक ग्रँड स्लॅमची विजेती होण्यासाठी आता तिला अजून दोन विजेतेपदांची गरज आहे. सध्या हा विक्रम मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे सेरेनाच्या आजच्या विजेतेपदाच्या साक्षीदार म्हणून मार्गारेट कोर्ट प्रेक्षकांमध्ये हजर होत्या.

ग्रँड स्लॅमसाठी आॅस्ट्रेलियन ओपन, विंबल्डन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन या स्पर्धांचा विचार होतो.


गेल्या वर्षी सप्टेंबरनंतर सेरेनाच्या स्थानाला अँजेलिक कर्बरने धक्का दिला होता. पण आपलं अव्वल स्थान सेरेनाने आता पुन्हा खेचून घेतलंय



राहुल द्रविडने नाकारली डॉक्टरेट
सातत्यपूर्ण कामगिरीने चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या राहुल द्रविडने बेंगळुरू विद्यापीठाने त्याला दिलेली मानद डॉक्टरेट उपाधी घेण्यास त्याने नकार दिला आहे. जेव्हा आपण क्रीडा क्षेत्रात संशोधन करू तेव्हाच ही उपाधी स्वीकारू असे म्हटले आहे. अत्यंत नम्रपणे त्यांने आपला नकार विद्यापीठ प्रशासनाला कळवला आहे.

वर्ष २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या राहुल द्रविडचा जन्म बेंगळुरू येथेच झाला. तिथेच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या तो भारतीय ‘अ’ संघ आणि १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे. 

बेंगळुरू विद्यापीठाचा २७ जानेवारी रोजी ५२ वा दिक्षांत समारोह आहे. आपल्याला डॉक्टरेटसाठी निवडल्याबद्दल राहुलने विद्यापीठाचे आभार मानले. मानद डॉक्टरेट स्वीकारण्यापेक्षा मी क्रीडा क्षेत्रात संशोधन करून डॉक्टरेटची पदवी मिळवेल, असे म्हटल्याचे बेंगळुरू विद्यापीठाचे कुलगुरू बी. थिमे गौडा यांनी सांगितले.

यापूर्वी द्रविडने २०१४ मध्ये गुलबर्गा विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभातही निमंत्रण असतानाही जाण्याची टाळले होते. तिथेही त्यांना मानद डॉक्टरेटसाठी निवडले होते. 



प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक
प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या संचलनात महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला आहे. 

महाराष्ट्राने लोकमान्य टिळक यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त देखावा सादर केला होता. तर तामिळनाडूने करंगट्टम लोकनृत्य सादर केले होते.

प्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्रासह १७ राज्यांचे व केंद्रीय मंत्रालयांचे सहा असे एकंदर २३ चित्ररथ सहभागी झाले होते. त्यापैकी अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला, तर त्रिपुराच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला. त्यांनी होजागिरी नृत्यप्रकार सादर केला होता.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांना शैल कर्म नृत्याबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या केंद्राने मध्य प्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्य़ातील गोंड जमातीचा लोकप्रिय नृत्यप्रकार शैल कर्म सादर केला होता.

मद्रास इंजिनीअर ग्रुप आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांना प्रजासत्ताकदिनी सर्वोत्तम संचलन करणारे पथक म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

राजपथावर झालेल्या संचलनात यंदा महाराष्ट्राकडून लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारा चित्ररथ सादर करण्यात आला होता. प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी या चित्ररथाची संकल्पना मांडली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कलाकारांनी हा देखणा चित्ररथ उभारला होता. 


चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्यांचा अग्रलेख लिहितानाचा १५ फुटी भव्य पुतळा होता. त्याच्यामागे एक छापखाना दाखविण्यात आली होती. १९१९ मध्ये टिळकांनी लंडनहून डबल फिल्टर छपाई मशिन मागवून त्याद्वारे ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्राची छपाई सुरू केली होती. हे दृश्य साकारण्यात आले होते. 



सरकारी कार्यालयात देवदेवतांच्या छायाचित्रांना मनाई करणारे परिपत्रक मागे
सरकारी कार्यालयात देवदेवतांचे फोटो यापुढे लावता येणार नाही हा राज्य सरकारने घेतलेला आदेश मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याची माहिती उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.

राज्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे ही सर्वच ठिकाणे सर्व प्रकारच्या धार्मिक उत्सवांपासून मुक्त करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून ‘सर्व कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमधील देवदेवतांच्या प्रतिमा सन्मानाने बाहेर काढून घ्याव्यात’, असा आदेश शासनाने दिला होता.