स्वाध्याय परिवाराच्या निर्मलाताई आठवले यांचे निधन
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. ठाण्यातील तत्त्वज्ञान विद्यापीठातील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षांच्या होत्या.


निर्मलाताई यांचा जन्म ३ ऑगस्ट १९२६ रोजी राजापूर तालुक्यात झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी विवाह झाल्यावर निर्मलाताईंनी त्यांच्या कामात हातभार लावला. 



‘तारिणी’ हे प्रशिक्षण जहाज विश्वसंचारासाठी सज्ज
भारतीय नौदलाचे ५६ फुटी असलेले ‘आयएनएसव्ही तारिणी’ हे दुसरे प्रशिक्षण जहाज विश्वसंचारासाठी सज्ज झाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्याच्या मोहिमेवर निघणार आहे. 

या जहाजाची धुरा नौदलातील सहा महिलांकडे असेल. सर्व महिलांना कॅप्टन दिलीप दोंदे यांनी प्रशिक्षित केले असून भारतीय नौदलासाठी ही मोहीम प्रेरणादायी मानली जात आहे. कॅप्टन वर्तिका जोशी ह्या महिला टीमचे नेतृत्व करणार आहे. 

सध्या पणजी येथील कॅप्टन ऑफ पोटर्स येथे हे प्रशिक्षण जहाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

विश्वसंचारासाठी निघालेले हे दुसरे जहाज आहे. यापूर्वी आयएनएस म्हादईने अशी मोहीम पूर्ण केली होती. त्यातही महिलांची टीम होती. नौदलातील हे एक प्रतिष्ठेचे जहाज आहे.



देशातील १००० खेड्यांना मिळणार मोफत वाय-फायची सुविधा
देशातील १००० पेक्षा अधिक गावांना मोफत वाय-फाय कनेक्शन देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याआधी गुगलने मोफत वाय-फाय देण्याची घोषणा केली होती. 

सुरुवातीला ही योजना १०५० गावांमध्ये राबवली जाईल. नंतर हळुहळु या योजनेचा विस्तार केला जाईल असे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ग्लोबल टेक फर्म आणि भारतीय इंटरनेट प्रोवाइडर या कंपन्यांशी भागीदारी करुन खेड्यातील लोकांना ही सुविधा पुरवली जाऊ शकते. 

मोफत वाय फायची योजना सर्वप्रथम महाराष्ट्रातच राबवली गेली आहे. मुंबईमध्ये एकूण ५०० ठिकाणी हॉटस्पॉट सुविधा देण्यात आली आहे. १ मे पर्यंत आणखी ७०० ठिकाणी ही सुविधा देण्यात येणार आहे. गुगलने मुंबईतील अनेक रेल्वे स्टेशन्सवर मोफत वाय-फायची सुविधा सुरू केली आहे.



माजी मंत्री ई अहमद यांचे निधन
खासदार आणि इंडियन युनियम मुस्लिम लीगचे नेते ई अहमद यांचे बुधवारी सकाळी उपचारांदरम्यान निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. 

मंगळवारी संसदेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण सुरू असतानाच अहमद यांना चक्कर आली होती आणि ते जागीच कोसळले होते. त्यानंतर लगेचच त्यांना उपचारांसाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. पण बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

अहमद हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री होते. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे ते नेते होते. केरळमधील मलप्पुरम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 

केरळमधील दिग्गज राजकारणी अशी ओळख असणाऱ्या ई अहमद यांनी पश्चिम आशिया आणि भारतामध्ये सौहादपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. लोकसभा खासदार म्हणून २५ वर्षांची दीर्घ कारकीर्द राहिलेल्या अहमद यांनी आखाती देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. 

याशिवाय, त्यांनी १९९१ ते २०१४ या काळात अनेकदा संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्वही केले होते. 

हज यात्रेदरम्यान पवित्र काबा विधींसाठी जगभरातून आमंत्रण देण्यात आलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये ई. अहमद यांचा समावेश होता. 

मुस्लिम विद्यार्थी संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणाच्या सुरूवातीच्या काळात ते १९६७ , १९७७, १९८०, १९८२ आणि १९८७ मध्ये केरळ विधानसभेवर निवडून गेले होते. १९८२ ते १९८७ मध्ये ते केरळ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.



बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कॅग विनोद राय

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या प्रशासकांची नियुक्ती केली असून, कॅगचे माजी महालेखापरिक्षक विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


इतिहासकार व स्तंभलेखक रामचंद्र गुहा, भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी आणि आयडीएफसीचे अध्यक्ष विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

विनोद राय हे कॅगचे माजी महालेखापाल असताना, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोळसा घोटाळा बाहेर आला. देशाचे ११ वे महालेखापाल म्हणून त्यांनी कार्य पाहिले आहे. टूजी आणि कोळसा घोटाळा बाहेर काढल्यामुळे ते चर्चेत होते.

रामचंद्र गुहा यांचे गांधीनंतरचा भारत हे गाजलेले पुस्तक आहे. इतिहासकार व स्तंभलेखक म्हणून देशभरात ते प्रसिद्ध आहेत. पर्यावरण, राजकीय, सामाजिक आणि क्रिकेट या विषयात त्यांचा अभ्यास आहे. क्रिकेटचा इतिहासही त्यांनी लिहिला आहे.

बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी आणि विक्रम लिमये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) बीसीसीआयचे प्रतिनिधीत्व करतील. न्यायालयाने बीसीसीआयमध्ये मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना पद न सांभाळण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयासंदर्भात हा निर्णय दिला आहे.

विनोद राय हे १९७२ च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस आहेत. २००८ ते २०१३ पर्यंत ते भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक (कॅग) राहिले आहेत. वर्ष २०१६ मध्ये नागरी सेवेत त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

सध्या ते संयुक्त राष्ट्रांच्या बाह्य लेखा परीक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते रेल्वेच्या कायाकल्प परिषदेचे मानद सल्लागारही आहेत. 

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथे त्यांचा जन्म झाला होता. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर लोकप्रशासन विषयात हॉवर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली.



‘टॉप’ समितीच्या प्रमुखपदी अभिनव बिंद्रा
बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याची केंद्र सरकारने पुनर्गठित टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) समितीच्या प्रमुखपदी निवड केली. पी.टी. उषा आणि प्रकाश पदुकोण यांचा देखील समितीत समावेश आहे.

बिंद्रा हा मागच्या समितीचा देखील प्रमुख होता पण त्याने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समितीचा राजीनामा दिला होता. 

दहा सदस्यांच्या समितीत अन्य दोन खेळाडू नेमबाज अंजली भागवत आणि सिडनी ऑलिम्पिकची कांस्य विजेती कर्णम मल्लेश्वरी यांचा तसेच टेनिस महासंघाचे अध्यक्ष सी.के. खन्ना, बॉक्सिंगमधील प्रशासक के. मुरलीधरन राजा, रेल्वे बोर्डाच्या सचिव रेखा यादव, साईचे कार्यकारी संचालक एस.एस. रॉय, संयुक्त क्रीडा सचिव इंदर धमीजा आदींचा समावेश आहे.

तसेच ही समिती खेळाडू निवडीची पद्धत स्वत: निश्चित करेल. गरज भासल्यास तज्ज्ञांना पाचारण करेल. समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.

२०२० आणि २०२४ च्या ऑलिम्पिकसाठी पदक विजेत्यांचा शोध घेणे हा टॉपचा उद्देश आहे. ही योजना आधी २०१६ आणि २०२० च्या ऑलिम्पिकला डोळ्यापुढे ठेवून आखण्यात आली होती.



टाइम क्रिस्टल तयार करण्यात यश
अमेरिकेतील बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी तयार केलेल्या आराखडय़ाच्या आधारे मेरीलँड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी काल स्फटिक (टाइम क्रिस्टल्स) तयार केले आहेत. 

द्रव्याची ही नवी अवस्था असून ती काळाशी सममित आहे. हे स्फटिक त्यांची रचना काळाच्या मितीत सतत पुनरावृत्त करतात. असमतोलित द्रव्य अवस्थेचे हे उदाहरण आहे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.


टाइम क्रिस्टल्स हे क्युबिट सिस्टीमसारखे काम करतात म्हणजे त्यांचा उपयोग क्वांटम संगणकात करता येऊ शकतो. 

मेरीलँड विद्यापीठाच्या ख्रिस मन्रो व सहकाऱ्यांनी येटेरबियमचे १० आयन वापरून या स्फटिकांची निर्मिती केली आहे. याची संकल्पना कॅलिफोर्निया विद्यापीठाचे नॉर्मन येव व इतर दोन संशोधक गटांनी मांडली होती. 

साधारण स्फटिकांची आण्विक रचना अवकाशमितीत पुनरावृत्त होते, तर टाइम क्रिस्टल्सची आण्विक रचना ही कालमितीत पुनरावृत्त होते. हे स्फटिक गतिहीन समतोलात स्थिर होत नाहीत व ते स्पंदित होत राहतात.

इलेक्ट्रॉन हे विशिष्ट सममितीत न बसल्यास साधारण स्फटिकांची निर्मिती होते व ते स्फटिक स्थिर गुणधर्म दाखवतात, पण टाइम क्रिस्टल हे अस्थिर असतात. मेरीलँडमधील प्रयोगात येटेब्रियमच्या अणूंवर चुंबकीय क्षेत्र व लेसरचा मारा करून त्यांची आण्विक रचना कालमितीत पुनरावृत्त करण्यात आली.

हिऱ्यामध्ये कार्बनचे जाळे अवकाशमितीत पुनरावृत्त होते, तसेच टाइम क्रिस्टलमध्ये अणूंचे जाळे कालमितीत पुनरावृत्त होते. 


अगदी सुरुवातीला या स्फटिकांची संकल्पना नोबेल विजेते वैज्ञानिक फ्रँक विलझेक यांनी २०१२ मध्ये मांडली होती, त्यात स्फटिकांची रचना अशी होती ज्यात शून्य ऊर्जावस्था दाखवली होती. या अवस्थेत हालचाली शक्य नसतात, पण टाइम क्रिस्टलमध्ये या अवस्थेतही इलेक्ट्रॉनच्या हालचाली होतात असे त्यांनी सांगितले होते



फ्रेंच सौंदर्यवती ईरिस मित्तेनेर ठरली ‘मिस युनिव्हर्स’
सौंदर्य आणि प्रतिभेच्या कसोटीवर निवडल्या जाणाऱ्या, संपूर्ण जगात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ किताबाची यावर्षीची मानकरी ठरलीय फ्रेंच सौंदर्यवती ईरिस मित्तेनेर. 

तसेच यापूर्वी ‘मिस फ्रान्स’ बनलेल्या २४ वर्षीय फ्रेंच मॉडेल ईरिस हिने इतर ८५ स्पर्धक युवतींचा पराभव करीत हा किताब पटकावला.

उपविजेतेपद २५ वर्षीय मिस हैती रॅक्वेल पेलिसिअरला मिळाले, तर २३ वर्षीय मिस कोलंबिया आंद्रिया तोवर ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली. 

फ्रान्सला तब्बल ४४ वर्षांनी हा मान मिळाला आहे. मागील वर्षी पिया वुर्त्सबाख हिच्या रुपाने फिलिपिन्सला ४० वर्षांनी ‘मिस युनिव्हर्स’चा मान मिळाला होता. 

मिस युनिव्हर्स हा किताब १९५२ मध्ये सुरू झाला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९५३ मध्ये फ्रेंच सुंदरी ख्रिस्तियान मार्टेल हिने हा किताब पटकावला होता. मात्र, त्यानंतर फ्रेंच चाहत्यांना ४४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. ईरिसने यंदा हा मान मिळवला.