अर्थसंकल्पाच्या तारखेवर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब
३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावास राष्ट्रपतींनी मंजुरी देऊन शिक्कामोर्तब केले.



३१ जानेवारीला दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला प्रथेनुसार प्रारंभ होईल. यानंतर सरकारतर्फे अर्थसंकल्पपूर्व पाहणी अहवाल संसदेला सादर केला जाईल. 

एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल. अधिवेशनाचा कालावधी तूर्तास नऊ फेब्रुवारीपर्यंतच आहे.




रेल्वे स्थानकांवर २ हजारांहून अधिक एटीएम
इतर मार्गानी उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने रेल्वे देशातील महत्त्वाच्या फलाटांवर २ हजारांहून अधिक एटीएम उभारण्याची जागा उपलब्ध करून देणार आहे.

रेल्वेगाडय़ा, रेल्वे फाटके आणि रेल्वे रुळांशेजारील जागेत जाहिराती करण्यासाठी या क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांशी संपर्क साधत आहे. या मार्गानी वर्षांला सुमारे २ हजार कोटी रुपये मिळवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.



तेलंगणच्या महोत्सवात आता दूरनियंत्रित पतंगांचा वापर
पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे अनेकदा पक्षी व माणसेही मरतात त्यावर उपाय म्हणून तेलंगणातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात दूरनियंत्रित पंतगांचा वापर केला जाणार आहे. या पतंगांना दोरीच नसेल. १२ ते १७ जानेवारीदरम्यान हा महोत्सव होणार आहे.

पतंगाच्या मांजात काच वापरली जाते तसेच चिनी मांजा हा नायलॉनचा असतो. आगा खान अकादमीचे जॉफ्री फिशर यांनी सांगितले की, पारंपरिक पतंग हे दोऱ्याच्या मदतीने उडवले जातात पण दूरनियंत्रित पतंग ही या क्षेत्रातील क्रांती आहे. दूरनियंत्रित पतंगाचा अनुभव भारतीयांनाही आनंद देईल यात शंका नाही.

हैदराबाद येथे पीपल्स प्लाझा येथे दूरनियंत्रित पतंग हे १२ जानेवारीला उडवले जाणार आहेत. 

काईट २०१७ हा पतंग महोत्सव खरेतर मुलींच्या शिक्षण सक्षमीकरणासाठी आहे त्यातून पर्यटन व सांस्कृतिक वारसा हे उद्देशही साध्य होतात. १६ देशातील पतंगबाज येथे येतात तसेच एकूण १० क्लबचे भारतीय तेथे सहभागी होतात. 

तेलंगणा टूरिझम व इन्क्रेडिबल इंडिया यांनी एकत्र येऊन आगा खान अकादमीच्या मदतीने हा महोत्सव अकादमीच्या १०० एकर जागेत आयोजित केला आहे. ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यावेळी उपस्थित राहणार आहे.

मात्र महाराष्ट्र सरकारने मांजावर बंदी घातली आहे. विशेष करून ही बंदी नायलॉनच्या मांजावर आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम ५ अन्वये ही बंदी घातली आहे.






१५ वे प्रवासी भारतीय संमेलन

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ‘१५ वे प्रवासी भारतीय दिवस’ संमेलन भरवण्यात आले आहे. संमेलनातील ‘भारत को जानो’ या कार्यक्रमात भारतीय वंशाचे जवळपास १६० तरुण सहभागी झाले आहेत. 

तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे २५० विद्यार्थी आणि बंगळुरूतील विविध महाविद्यालयांतील २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. भारत दौऱ्यावर आलेले पोर्तुगीज पंतप्रधान अँटोनियो कोस्टा हेही या संमेलनात सहभागी झाले आहेत.

परदेशी जाणाऱ्या भारतीय कामगारांसाठी पंतप्रधानांनी ‘प्रवाशी कौशल्य  विकास योजना’ सुरू केली जात असल्याचं मोदींनी जाहीर केलं. 


त्यासोबतच भारतीय वंशाच्या ‘पीआयओ’ कार्डधारकांना ‘ओसीआय’ कार्ड घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.ओसीआय कार्ड म्हणजेच ‘ओव्हरसीज् सिटिझनशिप कार्ड’चा फायदा भारतातून स्थलांतर करत दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलेल्यांना होऊ शकतो. 

अनिवासी भारतीयांना ‘वज्र स्कीम’ अंतर्गत भारतात नोकरी करण्याची संधी देण्यात येणार असल्याचं मोदींनी जाहीर केलं.

भारतीय वंशाच्या परदेशी तरूणांसाठी ‘Know इंडिया प्रोग्रॅम’ मोदींनी जाहीर केला. या प्रोग्रॅममधून दरवर्षी भारतीय वंशांच्या तरूणांना त्यांच्या मातृभूमीची ओळख व्हावी यासाठी भारतात आणलं जाणार आहे.



सानियाला दुहेरीचे विजेतेपद
भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथानी माटेक सँड्स हिच्या साथीने ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत महिला दुहेरीच्या रूपाने या सत्रातील आपले पहिले विजेतेपद पटकावले. परंतु नंबर वनची दुहेरीची रँकिंग मात्र तिने गमावली आहे. आता नंबर वन स्थानावर बेथानीने कब्जा मिळविला आहे



क्रीडा मंत्रालयाची एसएसपीएफला मान्यता
क्रीडा मंत्रालयाने स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशनला (एसएसपीएफ) मान्यता दिली आहे.  पहिल्या वर्षी केलेल्या शानदार प्रदर्शनामुळे खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय खेळ संवर्धन संघटनेच्या रुपात सरकाने ही मान्यता दिली आहे.ही अशी पहिली स्वतंत्र संस्था आहे. ज्याला सरकारने मान्यता दिली आहे.



चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा
एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात आक्रमक खेळ करताना स्पेनच्या रॉबर्टो बितिस्ता आगुतने रशियाच्या युवा खेळाडू डेनिल मेदवेदेव याला ६-३, ६-४ असे नमवून चेन्नई ओपन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. आगुतचे हे करिअरमधील पाचवे एकेरी विजेतेपद ठरले. तर, मेदवेदेव आपल्या पहिल्या एटीपी वर्ल्ड टूर विजेतेपदापासून वंचित राहिला.

एकेरी विभागात जरी भारताचे आव्हान लवकर संपुष्टात आले असले, तरी पुरुष दुहेरीमध्ये मात्र भारतीयांचेच वर्चस्व राहिले. 
भारतीय खेळाडूंमध्येच झालेल्या अंतिम सामन्यात स्टार खेळाडू रोहन बोपन्नाने जीवन नेदुनचेझियानसह खेळताना दिविज शरण-पुरव राजा यांना नमवून जेतेपदाला गवसणी घातली.बोपन्नाचे हे कारकिर्दीतील १५ वे जेतेपद असून जून २०१५ नंतरचे त्याचे हे पहिलेच विजेतेपद ठरले.



बंधुता साहित्य संमेलनाचे यंदा इस्लामपूर येथे आयोजन
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व बंधुता प्रतिष्ठान (पुणे) तर्फे २०१७ मध्ये होणारे १९ वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन यंदा इस्लामपूर येथे होणार आहे. 

अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांची, तर स्वागताध्यक्ष म्हणून महेंद्र भारती यांची निवड करण्यात आली. ही माहिती संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली. नवी पेठ पुणे येथे झालेल्या १८ व्या संमेलनात घोषणा झाली. 

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी बंधुता परिवारच्या वतीने १७ वर्षांपासून साहित्य संमेलन भरवले जाते. 



गडचिरोलीत शेतकरी साहित्य संमेलन
तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी २०१७ रोजी गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. 

 या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. शेषराव मोहिते असतील, तर उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होणार आहे.

या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शालिक पाटील नाकाडे तसेच संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे उपस्थित राहणार आहे. 

२०१५ मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते



आता शास्त्रीय, लोककला, चित्रकलेसाठी वाढीव गुण
शास्त्रीय कला, लोककला आणि चित्रकलेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मार्च २०१८ पासून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शनिवारी घेतला. 

त्यासाठी विविध श्रेणी ठरविण्यात आलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ५, १० किंवा २५ वाढीव गुण मिळणार आहेत.



पुण्यातील जीएमआरटी दुर्बिणीच्या माहितीआधारे विश्वातील दोन खगोलीय घटनांचा शोध
पुणे जिल्ह्य़ात नारायणगावजवळ खोडद येथे असलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे खगोलवैज्ञानिकांनी विश्वातील दोन महत्त्वाच्या चमत्कारिक खगोलीय घटनांचा शोध लावला आहे. हे संशोधन ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

त्यात दोन जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे व पृथ्वीपासून दोन अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या महाकाय दीर्घिकांची टक्कर यांचा समावेश आहे. दोन्ही घटना अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

कृष्णविवर व दोन महाकाय दीर्घिकांची टक्कर यांचा संबंध आम्ही प्रथमच शोधला आहे असे त्यांनी सांगितले. आबेल ३४११ व आबेल ३४१२ या दीर्घिका समूहांची टक्कर पृथ्वीपासून २ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर झाली.

आबेल ३४११ व आबेल ३४१२ या दीर्घिकासमूहांचा शोध जीएमआरटी दुर्बिणीमुळे लागल्याने विश्वात लाखो प्रकाशवर्षे अंतराचे रेडिओ लहरींचे पट्टे का पसरलेले असतात याचे मूळ शोधता आले आहे



दोन भारतीय डॉक्टरांना सर्वोच्च नागरी पुरस्कार
भारतीय वंशाच्या अमेरिकन डॉ. भरत बरई आणि डॉ. संपत शिवांगी यांना प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. अन्य देशात राहणार्‍या भारतीय आणि भारतीय वंशाच्या नागरिकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 

प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ९ जानेवारी बंगळुरू येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या पुरस्काराची सुरूवात परराष्ट्र खात्याने २००३ मध्ये केली होती.आतापर्यंत विदेशात स्थायीक झालेल्या २८ भारतीयांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.