डिजिटल व्यवहारांसाठी हेल्पलाइन क्र. १४४४
०१. केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी १४४४ ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.


०२. या हेल्पलाइनवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्‍नांवर उत्तरे मिळणार आहेत.

०३. दूरसंचार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉम यांनी एकत्रितपणे ही हेल्पलाइन सुरू केली आहे.



स्टॅलिन आता द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष
०१. तामिळनाडूतील द्रमुक पक्षामध्ये नेतृत्वात फेरबदल करण्यात आले असून करुणानिधी (९३) यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन (६३) यांच्याकडे आता कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले आहे. एम. के. स्टॅलिन हे सध्या कोषाध्यक्ष म्हणून काम करीत होते. 

०२. स्टॅलिन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देताना त्यांना सर्वाधिकारही प्रदान करण्यात आले आहेत. द्रमुकच्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 



उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर
०१. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली. 

०२. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये मतदान होईल. गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एकाचवेळी मतदान होईल, तर दहशतवादी संघटनांचा उपद्रव असलेल्या मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होईल. ११ मार्चला निकाल जाहीर होतील.

०३. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी तसेच ए. के. जोती आणि ओ. पी. रावत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. 

०४. या पाच राज्यात ६१९ मतदारसंघ आणि ६० कोटी मतदार आहे. 

०५. या निवडणुकीत प्रथमच मतदारांच्या मार्गदर्शनासाठी रंगीत पुस्तिका (व्होटर गाइड) दिली जाईल.काही मतदारसंघांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रे उभारले जातील.गोव्यात मतदानानंतर प्रत्येकाला स्लीप मिळणार



न्या. जे. एस. केहर झाले सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहर बुधवारी भारताचे ४४ वे सरन्यायाधीश झाले. ते सुमारे सात महिने म्हणजे येत्या २८ आॅगस्टपर्यंत या पदावर राहतील. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात न्या. खेहर यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. 



महेंद्रसिंग धोनीने सोडले कर्णधारपद
०१. महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री तडकाफडकी भारतीय वन डे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. पण खेळाडू या नात्याने आपण संघात कायम राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

०२. २००७ साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या टी२० विश्वचषकावर कब्जा केला.२०११ साली धोनीने भारताला ५० षटकांचा आयसीसी विश्वचषक मिळवून दिला. २०१३ साली भारताने धोनीच्या नेतृत्वामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली.२००९ साली भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला.

०३. टी२० विश्वचषक, आयसीसी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा धोनी क्रिकेटविश्वातील एकमेव कर्णधार.



भारतीय महिलांना दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत चौथ्यांदा विजेतेपद
उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवत भारताने बांगलादेशवर ३-१ अशी मात केली आणि महिलांच्या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.



राज्याच्या मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर 
०१. राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनास जाहीर. 

०२. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. 

०३. यंदाचा मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार श्‍याम जोशी यांना जाहीर. 

०४. डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे, 

०५. मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच, २७ फेब्रुवारी २०१७ रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत.



पाकिस्तानात हिंदू विवाह कायदा मंजूर
०१. पाकिस्तानात राहणार्‍या हिंदू अल्पसंख्याकांना सर्वोच्च नियामक मंडळाच्या समितीनी नववर्षानिमित्त एक अनोखी भेट दिली आहे. समितीने बहु-प्रतीक्षित हिंदू विवाह कायद्याला अंतिम मंजूरी दिली आहे. आता पाकिस्तानात हिंहू विवाह कायदा लागू होणार आहे. 

०२. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात नॅशनल असेंबलीने पाकिस्तानात राहणार्‍या हिंदू नागरिकांसाठी हिंदू मॅरेज बिल- २००६ पारित केले होते. पाकिस्तानातील मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट सीनेटर नसरीन जलील यांच्या अध्यक्षतेखाली सीनेट कमिटीने कायद्यावर सविस्तर चर्चा केली. 

०३. मागील ६६ वर्षांपासून पाकिस्तानात राहणार्‍या हिंदू नागरिकांच्या विवाहाची नोंदणी होत नव्हती. यामुळे येथील हिंदू अस्वस्थ होते. मात्र, आता पाक लोकसंख्येच्या २ टक्के हिस्सा असलेले हिंदू नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

०४. याशिवाय घटस्फोट आणि जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यास मदत मिळणार आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.

०५. हा कायदा मंजूर झाल्याने पाकिस्तानात राहणार्‍या हिंदू नागरिकांना दुसरा विवाह करण्यास परवानगी मिळाली आहे. 



‘बुकर’ विजेते लेखक जॉन बर्जर यांचे निधन
०१. कलात्मक समीक्षेची परंपरा सुरू करणारे बुकर पुरस्कार विजेते कांदबरीकार जॉन बर्जर यांचे नुकतेच निधन झाले.

०२. मार्क्सवादी मर्मज्ञ म्हणून ओळखले जाणारे बर्जर यांच्या ‘वेज ऑफ सीईंग’ या ‘बीबीसी’वरील मालिकेतून कलात्मक समीक्षेमध्ये एक राजकीय दृष्टीकोन आणला. 

०३. ‘G’ हे एकाक्षरी शीर्षक असलेल्या कादंबरीसाठी त्यांना १९७२ मध्ये मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्काराच्या रकमेपैकी अर्धे मानधन ‘द ब्लॅक पँथर्स’ या आफ्रिकन-अमेरिकन चळवळीसाठी त्यांनी दिले होते.

०४. उत्तर लंडनमधील हॅकनी येथे जन्म झालेल्या बर्जर यांनी चित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांची चित्रकला १९४० मध्ये प्रदर्शनातून मांडल्यानंतर त्यांनी लेखनामध्ये नशीब अजमावले.



चीनहून लंडनला थेट मालगाडी!
०१. ‘सिल्क रोड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन काळात युरोपीय देशांशी व्यापार करण्याच्या खुश्कीच्या मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून चीनने थेट लंडनला रेल्वेने माल पाठविण्यास सुरुवात केली आहे.

०२. वस्तू व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेल्या पूर्व चीनमधील यिवू या शहरातून या नव्या रेल्वेमार्गावरील पहिली मालगाडी रवाना झाली.

०३. कझाकस्तान, रशिया, बेलारुस, पोलंड, जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स आणि इंग्लंड अशा आठ देशांतून तब्बल १२ हजार किमीचा प्रवास करून ही मालगाडी १८ दिवसांनी लंडनला पोहोचेल.

०४. ‘सिल्क रोड’ योजनेनुसार चीनने याआधी युरोपमधील इतरही अनेक शहरांशी थेट रेल्वेने व्यापारी संबंध प्रस्थापित केले आहेत. अलीकडेच यिवू ते स्पेनची राजधानी माद्रिदपर्यंत अशीच थेट मालगाडी सुरू करण्यात आली.

०५. रेल्वेने मालवाहतूक करण्यास हवाई वाहतुकीच्या तुलनेत निम्मा खर्च येतो व सागरी वाहतुकीच्या तुलनेत निम्मा वेळ लागतो.साहजिकच यामुळे बाजारपेठेत माल कमी खर्चात व लवकर पोहोचविता येतो.