कर्नाटकात कंबाला शर्यती परवानगीचे विधेयक मंजूर
कर्नाटकात म्हशींच्या कंबाला शर्यती, तसेच बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यास परवानगी देणारे विधेयक विधानसभेने मंजूर केले आहे. विधानसभेत सर्व पक्षांच्या पाठिंब्याने कंबाला व बैलगाडा शर्यती सुरू करण्यास मान्यता देणारे विधेयक मंजूर झाले. 


अलिकडे तामिळनाडूत बैलांच्या जलीकट्टू खेळाला परवानगी देणारे विधेयक मंजूर केले होते.

‘द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट, १९६०’ या कायद्यात त्यासाठी सुधारणा करणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत मंजूर झाले आहे. 

हे विधेयक मांडताना पशुसंवर्धन मंत्री ए.मंजू यांनी सांगितले की, कंबाला हा पारंपरिक लोकक्रीडा प्रकार आहे व त्यात प्राण्यांबाबत क्रूरता दाखवली जात नाही, हा खेळ शेतकऱ्यांच्या श्रद्धांशी निगडित आहे.



PSLV-C37 चे ऐतिहासिक उड्डाण सुरू
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) उद्या एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या वाटेवर आहे. यामध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रहांचा समावेश आहे. पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील. 


आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ३७ अवकाशात झेपावेल. पीएसलव्ही प्रक्षेपकाचे हे ३९ वे उड्डाण असून रॉकेटला अतिरिक्त मोटर्स लावण्यात येणाऱ्या एक्सएल प्रकारातील हे पीएसएलव्हीचे १६ उड्डाण ठरेल. 

पीएसएलव्ही सी-३७ च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या १०४ उपग्रहांमध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रह असतील.यामध्ये अमेरिका, जर्मनी, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे.

एकाचवेळी प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या संख्येमुळे ‘पीएसएलव्ही सी ३७’चे उड्डाण ऐतिहासिक ठरणार आहे. एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च अत्यंत कमी होतो. 
यापूर्वी एकाच उड्डाणातून अमेरिकेने सर्वाधिक २९, तर रशियाने ३७ उपग्रह अवकाशात पाठवले आहेत.

पीएसएलव्ही सी-३७कडून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या १०४ उपग्रहांमध्ये भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. कार्टोसॅट-२डी (वजन ७३० किलो), आयएनएस १ए आणि आयएनएस १बी (वजन प्रत्येकी ३० किलो) अशी या उपग्रहांची नावे आहेत. 

यापैकी कार्टोसॅट-२डी हा कार्टोसॅट मालिकेतील पाचवा अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह असेल. रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आणि अवकाशातून पृथ्वीची छायाचित्रे पाठविण्यासाठी मुख्यत्त्वेकरून कार्टोसॅट-२डी चा वापर केला जाईल. या माहितीचा उपयोग मॅप अॅप्लिकेशन्स, नागरी व ग्रामीण विकास आणि सुविधा व्यवस्थापनासाठी केला जाईल.

तर आयएनएस १ए या नॅनो उपग्रहाचा वापर भविष्यातील प्रयोग, विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात येणारे उपग्रह व अन्य तंत्रज्ञानासाठी केला जाईल.

आयएनएस १बी हादेखील नॅनो उपग्रह असून आएएनएस १ए नंतर तो अवकाशात प्रक्षेपित केला जाईल. या उपग्रहातील रिमोट सेन्सिंग कलर कॅमेऱ्याचा वापर उच्च क्षमतेची छायाचित्रे काढण्यासाठी करण्यात येईल.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख या नात्याने ए.एस. किरण कुमार यांच्याकडे पीएसएलव्ही सी-३७ मोहिमेची जबाबदारी आहे.



भारत-चीन सीमेवर तैनात होणार ब्रम्होस क्षेपणास्त्र
सामरिक दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाच्या असलेल्या अरुणाचल प्रदेशात ब्रम्होस क्षेपणास्त्राची अत्याधुनिक आवृत्ती तैनात करण्याचा केंद्र सरकारने मागील वर्षी घेतला होता.

भारतीय लष्कराच्या एका रेजिमेंटकडे ब्रम्होस क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती देण्यात येणार आहे. भारताच्या नव्या रेजिमेंटकडे जवळपास १०० क्षेपणास्त्रे, ट्रकवर तैनात असलेली पाच लाँचर आणि आवश्यक असलेले हार्डवेअर-सॉफ्टवेअर असणार आहेत. यावर भारतीय लष्कराकडून ४ हजार ३०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

हिमाचल भागात तैनात ब्लॉक-३ आवृत्तीत अत्याधुनिक गायडन्स यंत्रणा आहे. यामुळे क्षेपणास्त्र आवाजाच्या तीनपट अधिक वेगाने झेपावून लक्ष्य भेदू शकते. यामुळे पर्वतीय भागांमागे असलेल्या लक्ष्यांवरही हल्ला चढवला जाऊ शकतो. चीनला शह देण्यासाठी भारताकडून सीमावर्ती भागात अनेक नवे रस्ते तयार करण्यात आले आहेत.



इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी रूट
इंग्लंड क्रिकेट कसोटी संघाच्या कर्णधारपदी जो रूट याची निवड करण्यात आली आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने ही माहिती दिली. अ‍ॅलिस्टर कुक याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपकर्णधार रूट हा कर्णधार होईल अशीच चर्चा होती.

कुकने ५९ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले होते. कुक हा फलंदाज म्हणून कसोटीत खेळत राहणार आहे. कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याची नियुक्ती करण्यात आली आहे.



भारतीय अभिनेता देव पटेलला ‘बाफ्टा’ पुरस्कार

७० व्या ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार (बाफ्टा) सोहळ्यात दिग्दर्शक डेमियन शजैल यांच्या ‘ला ला लँड’ चित्रपटाला सर्वाधिक पाच पुरस्कार मिळाले. तर, भारतीय अभिनेता देव पटेलला ‘लायन’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

बाफ्टा पुरस्कारांमध्ये बाजी मारणाऱ्या ला ला लँड हा चित्रपट २६ फेब्रुवारीला घोषणा होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांतही मजबूत दावेदार आहे. 

तसेच या पुरस्कार सोहळ्यात एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. ‘मॅचेस्टर बाय द सी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी केसी अफ्लेकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 
तर ‘फेसिस’ या चित्रपटासाठी वियोला डेव्हिस सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.



पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवपदी प्रथमच महिलेची निवड
पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवपदी प्रथमच महिलेची निवड करण्यात आली आहे. तेहमिना जंजुआ असे त्यांचे नाव असून त्या एजाज अहमद चौधरी यांची जागा घेतील. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्या पदभार स्वीकारणार आहेत. 

इस्लामाबादच्या कायदे आझम या विद्यापीठातून तसेच न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. २०१५ पासून त्या संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

२०११ मध्ये त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या होत्या. २०११ ते २०१५ या काळात त्या पाकिस्तानच्या इटलीमधील राजदूत होत्या.



खगोल वैज्ञानिकांकडून १०० संभाव्य बाह्य़ग्रहांचा शोध
वैज्ञानिकांनी १०० संभाव्य बाह्य़ग्रह शोधून काढले असून त्यात ८.१ प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा समावेश आहे. खगोल वैज्ञानिकांनी रॅडिअल व्हेलॉसिटी पद्धतीच्या वापरातून घेतलेली निरीक्षणे सादर केली आहेत.

ग्रहाचे गुरूत्व हे ताऱ्यावर परिणाम करत असते या तत्त्वावर आधारित ही निरीक्षण पद्धत आहे. खगोलवैज्ञानिकांच्या मते ग्रहाची थरथर अभ्यासून ताऱ्यात निर्माण होणारे गुरूत्वाचे बदल लक्षात येतात. 

दोन दशके रॅडिअल व्हेलॉसिटी तंत्राने ग्रहशोधनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात हवाईतील मोना किया येथे डब्ल्यू एम केक वेधशाळेच्या ‘केक १’ या दहा मीटरच्या दुर्बिणीवरील वर्णपंक्तीमापी वापरण्यात आला आहे. 

या माहितीत एकूण ६१ हजार मापने असून १६०० ताऱ्यांचा त्यात समावेश आहे. याची माहिती जाहीर करून वैज्ञानिकांनी संभाव्य बाह्य़ग्रहांच्या संशोधनासाठी आणखी संधी उपलब्ध करून दिली आहे.



अस्थिमज्जा विकारावर ग्रीन टी उपयुक्त
अस्थिमज्जेशी संबंधित मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांमध्ये ग्रीन टीमधील संयुग गुणकारी ठरते. असे दिसून आले आहे. 

वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधनानुसार एपिगॅलोकॅटेसीन ३ गॅलेट हे संयुग पॉलिफेनॉल गटातील असून ती ग्रीन टीच्या पानांमध्ये आढळून येते. ते मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपकारक ठरते. 

लाइट चेन अमायलॉइडोसिस या रोगात शरीराच्या एका भागातील प्रतिपिंड विविध अवयवांमध्ये पसरतात, त्यात हृदय व मूत्रपिंडाचा समावेश असतो. यात लाइट चेन अमायलॉइडोसिसचा उलगडा आवश्यक होता व त्यावर ग्रीन टीमधील संयुग कसे काम करते हे समजते. 

लाइट चेन अमायलॉइडोसिस अस्थिमज्जा रोगाच्या रुग्णांमधून वेगळे काढले गेले. व नंतर त्यावर ग्रीन टीमधील संयुगाचे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. एपिगॅलोकॅटेसीन ३ गॅलेट या संयुगाचा परिणाम पार्किन्सन व अल्झायमर या रोगांमध्ये तपासण्यात आला. त्यात दोन्ही रोगांत साचत जाणाऱ्या घातक प्रथिनांना हे संयुग अटकाव करते. असे दिसून आले. लाइट चेन अमायलॉइडोसिसची पुनरावृत्ती व त्यांचे साचत जाणे यात थांबवले जाते.