मंकी फिव्हर रोगाची महाराष्ट्रातही लागण
मंकी फिव्हर हा रोग आता गोव्यानंतर महाष्ट्रातही आढळून आला आहे, असे गोव्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. या रोगाचे काही रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. 


संशोधकांच्या मते कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ात क्यासनूर जंगलातून या रोगाचा उगम झाला असून त्याला क्यासनूर फॉरेस्ट डिसीज म्हटले जाते. हा रोग पश्चिम घाटातील गोवा, केरळ व महाराष्ट्र या राज्यातील काही शेतकऱ्यांना झाला आहे. 

 २०१४ मध्ये गोव्यात मंकी फिव्हर जोरात होता. सत्तारीच्या पाले खेडय़ात काही जणांचा मृत्यू झाला होता. तो मंकी फिव्हर आहे हे दाखवून देण्याचे काम मणिपाल विद्यापीठाचे कुमार यांनी केले आहे. मंकी फिव्हरचा विषाणू माकडातून माणसात येतो. २०१५-१६ मध्ये त्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे व २६७ जणांना रोगाची लागण झाली होती.



महात्मा गांधी हत्येसंबंधी अहवालावरील कार्यवाही जाहीर करण्याचे निर्देश
स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे सहकारी हे महात्मा गांधींच्या हत्येच्या कटाचा भाग होते असे दर्शवणारा पुरावा असल्याचे नमूद करणाऱ्या जे. एल. कपूर आयोगाच्या अहवालावर काय कार्यवाही केली हे जाहीर करावे, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत.

ज्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित फाईल्स उघड करण्यात आल्या, त्याच धर्तीवर महात्मा गांधींबाबतचा र्सवकष कागदपत्रांचा संग्रह तयार करावा, अशीही शिफारस आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला केली आहे.

३० जानेवारी २०४८ रोजी झालेली महात्मा गांधींची हत्या, त्याचा पुढील तपास आणि न्यायालयीन खटला यांच्याशी संबंधित रेकॉर्ड मिळावा यासाठी माहितीच्या अधिकाराखाली करण्यात आलेला अर्ज माहिती आयोगाने या कार्यालयाकडे पाठवला.

गांधी हत्या प्रकरणात न्यायालयाने सावरकर यांना पूर्वी कटाच्या आरोपातून मुक्त केले होते. 



माजी सरन्यायाधीश अल्तामस कबीर यांचे निधन
माजी सरन्यायाधीश अल्तामस कबीर यांचे कोलकात्यामध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. देशातील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश अशी त्यांची ओळख होती. 

 कबीर यांनी त्यांच्या कारकीर्दीला १९७३ ला सुरुवात केली होती. आधी कोलकाता जिल्हा न्यायालय, नंतर कोलकता उच्च न्यायालय येथे त्यांनी वकिली केली. वकील म्हणून त्यांची दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही शाखांवर मजबूत पकड होती. 

त्यांची १९९० मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड करण्यात आली होती. २००५ मध्ये त्यांची नियुक्ती झारखंडचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. 

अल्तामस कबीर यांची २९ सप्टेंबर २०१२ मध्ये सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी हे पद १८ जुलै २०१३ पर्यंत भूषवले.



शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

आक्रमक फलंदाजी आणि उंच फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने यापूर्वीच २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमधून आणि २०१५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 

आता त्याने आपली २१ वर्षांची क्रिकेट कारकिर्द थांबविण्याचा निर्णय घेतला. आफ्रिदीने या महिन्याच्या सुरवातीलाच निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. 

आफ्रिदीने १९९६ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३७ चेंडूत शतक झळकाविण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विक्रम १७ वर्षे अबाधित होता. 

आफ्रिदीने ३९८ एकदिवसीय सामन्यांत ८०६४ धावा आणि ३९५ बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याची ओळख अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून होती.



जाहिरात विश्वात विराट कोहलीचा विक्रम
मैदानावर विक्रम रचणाऱ्या विराटने आता मैदानाबाहेरही नवा विक्रम रचला आहे. त्याने क्रीडा साहित्य निर्मितीमध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘पुमा’ कंपनीशी ११० कोटींचा करार केला आहे. एकाच कंपनीशी इतक्या मोठ्या रकमेचा करार करणारा विराट पहिलाच क्रीडापटू ठरला आहे. 


त्यामुळे विराट आता जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट, असाफा पॉवेल, फुटबॉलपटू थिअरी हेन्री , ऑलिव्हर जिरूड या जागतिक ब्रँड अॅम्बेसिडरच्या पंक्तीत सामील झाला आहे.

‘पुमा’ने विराटसोबत केलेला हा करार आठ वर्षांचा आहे. पुमाने याआधीही अनेक दिग्गज क्रीडापटूंसोबत करार केला आहे. यापूर्वी तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी विविध एजन्सी आणि कंपन्यांसोबत १०० कोटींचे करार केले होते. मात्र, विराटने एकाच कंपनीसोबत एवढ्या मोठ्या रकमेचा करार करून विक्रम प्रस्थापित केला आहे.

गेल्या वर्षात कोहलीने ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून तब्बल ६०० कोटींची कमाई केल्याची माहिती ‘डफ अँड फेल्प्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आले होते. 
कोहलीने गेल्या वर्षभरात केलेली अफलातून कामगिरी आणि त्याच्या आकर्षक लूकमुळेच जाहिरातदारांची पसंती त्याला जास्त आहे. 

कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर कोहलीच्या ब्रॅण्डव्हॅल्यूमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. चार मालिकांमध्ये सलग चार द्विशतकं ठोकण्याचा पराक्रम कोहलीने ठोकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याबाबत कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. 

सध्याच्या घडीला कोहली २० अधिक ब्रॅण्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर अशा मोठ्या ब्रॅण्डचाही समावेश आहे.



मंगळ ग्रहावर मानवी वसाहत शक्य
संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) मंगळ ग्रहावर जीवनासाठी पोषक वातावरण निर्माण करून तेथे मानवी वस्ती स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम सुरू केले आहे. 

शेख मोहंमद बिन राशीद अल मख्तुम यांनी दुबईत या आठवड्याच्या प्रारंभी ‘मार्स २११७’ प्रकल्पाची घोषणा केली. हा प्रकल्प १०० वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
दुबईतील ५ व्या जागतिक सरकार शिखर परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. 



सईदला एटीएच्या यादीत टाकण्याच्या निर्णयाचे भारताकडून स्वागत
जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद याचा पाकिस्तानमधील पंजाब सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत (एटीए) यादीमध्ये समावेश केला आहे. भारताने पाकिस्तानच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

दहशतवाद संपवण्यासाठी घेतलेल्या या तर्कशुद्ध निर्णयाचे भारत स्वागत करतो असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी म्हटले आहे. याआधी पाकिस्तान सरकारने हाफिज सईदला दहशतवादी मानण्यास नकार दिला होता.


हाफिज सईद आणि त्याचा सहयोगी काजी काशिफ या दोघांची नावे एटीएच्या यादीमध्ये चौथ्या परिशिष्टात टाकण्यात आली आहेत. चौथ्या सूचीतील नियमांचे उल्लंघन केल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे हाफिज सईदला शिक्षा देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. 

या यादीमध्ये ज्यांच्या नावाचा समावेश आहे त्या व्यक्तींना परदेश प्रवासावर निर्बंध लावले जातात, त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होतात. त्यांना वेळोवेळी न्यायालयात हजर राहावे लागते आणि त्याच्यावर सरकारची करडी नजर असते. 

हाफिज सईदला ९० दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच यादीमध्ये त्याच्या नावाचा समावेश होण्याआधी त्याच्यावर परदेश प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

हाफिज सईदची फलाह-इ-इंसानियत नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत त्याने कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली आहे. या संस्थेच्या मालकीच्या अनेक रुग्णवाहिका आहेत. त्या माध्यमातून त्याने त्याचे मोठे जाळे निर्माण केले आहे. हाफिज सईदच्या जमात उद दवा या संघटनेवर बंदी आल्यानंतर फलाह-इ-इंसानियत मार्फतच तो त्याच्या कारवाया सुरू ठेवेल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.