स्वच्छ भारत योजनेत महाराष्ट्र पहिला
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील १२७ शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून, आतापर्यंत नागरी भागात ३१२८२५ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही संख्या अन्य राज्यांचा तुलनेत सर्वाधिक असून, याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने राज्याचे अभिनंदन केले आहे. 


राज्यात सध्या १५३५१० शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. हागणदारीमुक्त झालेल्या शहरांमध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील १३ शहरांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर नगर, कोल्हापूर आणि नागपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी दहा शहरे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग व सोलापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी आठ शहरांचा समावेश आहे. 

याची फलश्रुती म्हणजे हागणदारीमुक्त शहरांच्या तपासणीसाठी केंद्राने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत देशातील दहा शहरांमधे राज्यातील पाचगणी, कागल, मुरगुड, पन्हाळा आणि वेंगुर्ला या पाच गावांचा समावेश आहे. 


स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी स्वच्छतेच्या सप्तपदीमधील पहिले पावलात १९ शहरे २ ऑक्‍टोबर २०१५ रोजी हागणदारीमुक्त झाली आहेत. दुसऱ्या पावलात २६ जानेवारी २०१६ पर्यंत ३२ शहरे हागणदारीमुक्त झाली आहे. संपूर्ण हागणदारीमुक्त होणारी कोल्हापूर महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. 

३६ शहरे २ ऑक्‍टोबर २०१६ पर्यंत हागणदारीमुक्त झाली आहेत. त्याचबरोबर २ ऑक्‍टोबर २०१६ ३२ शहरे, तर नवी मुंबई, चंद्रपूर, धुळे, पुणे, नाशिक, सांगली, वसई-विरार आणि नगर ही महापालिकेची आठ शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. सर्व शहरे २ ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारक विधेयक मंजूर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले. शिवसेना मंत्री गैरहजर असताना हे विधेयक चर्चेला आले व मंजूर झाले. महापौर निवासात हे स्मारक होणार आहे. 

नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महानगरपालिका सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे विधेयक मांडले. भारतातील ५ वर्षांखालील निम्म्यापेक्षा जास्त बालके अशक्त
देशातील पाच वर्षांपेक्षा कमी वयाची निम्म्यापेक्षा अधिक बालके अशक्त असल्याची चिंताजनक माहिती कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

देशातील पाच वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेल्या मुलांची शारीरिक स्थिती अशक्त असल्याने ही मुले अतिशय सहजपणे संसर्गांना बळी पडतात. यासोबत शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे या मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होतो, असे कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. 

२०१५-१६ या कालावधीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सहा लाख कुटुंबांचा आढावा घेण्यात आला. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ३८% मुलांची वाढ योग्य प्रमाणात झालेली नाही. यासोबतच २१% मुले ही शक्तीहीन आणि ३६% मुले ही कमी वजनाची असल्याचेदेखील या सर्वेक्षणातून समोर आलेले आहे.

मुलांची शारीरिक असमर्थता ठरवणाऱ्या मापदंडांमध्ये २००५-०६ मध्ये सुधारणा करण्यात आल्या. मुलांमधील अशक्ततेचे प्रमाण वाढत असल्यामागील सर्वात मोठे कारण हे वाढती गरिबी असल्याचे समोर आले होते. गरिबीचे प्रमाण वाढल्याने मुलांमधील अशक्ततेचे प्रमाण वाढले आहे. 

२०११ च्या जनगणनेनुसार २०१५ मध्ये देशातील पाच वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेल्या बालकांची संख्या १२.४ कोटी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे देशातील जवळपास ७.२ कोटी बालके अशक्त आहेत. 

शारीरिकदृष्ट्या अविकसित असलेल्या मुलांची संख्या ५ कोटी, शक्तीहीन बालकांची संख्या २.६ कोटी आणि वयाच्या तुलनेत वय कमी असलेल्या बालकांची संख्या ४.४ कोटी इतकी आहे.

देशभरातील निम्म्यापेक्षा जास्त गर्भवती महिला अशक्त आहेत, असेही कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. गर्भवती महिला अशक्त असल्याने त्यांच्या मुलांची वाढदेखील योग्य प्रमाणात होत नाही. १५ ते ४९ वयोगटातील ५३% महिला आणि २३% पुरुष अशक्त असल्याचे कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगभरातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत हैदराबाद अव्वल
जगभरातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत हैदराबाद विमानतळाने अव्वल स्थान गाठले आहे. वर्षाला ५० लाख ते दीड कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात हैदराबाद अव्वल स्थानी आहे. 

एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) दरवर्षी जगभरातील सर्वोत्तम विमानतळांची निवड केली जाते. विमानतळावर मिळणा-या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी -एएसआय) आधारे ही निवड केली जाते. यात विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे विमानतळांची विभागणी केली जाते. 


हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमातळाने २०१६ मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. ५० लाख ते दीड कोटी प्रवासी प्रति वर्ष या गटात हैदराबादने बाजी मारली आहे. 

हैदराबामधील विमानतळाला यंदा ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा म्हणजेच २०१६ मध्ये प्रवाशांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली.

दरम्यान, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानेही जगातील सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. वर्षाला ४ कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या गटात इंदिरा गांधी विमानतळ दुस-या स्थानी पोहोचले आहे. पहिल्या स्थानी दक्षिण कोरियातील विमानतळाचा नंबर लागला आहे. एअर इंडियाच्या विमानांमध्ये महिलाराज 
एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस ऐतिहासिकदृष्ट्या साजरा केला आहे. एअर इंडियाने देशासह परदेशातील दहापेक्षा अधिक ठिकाणांना जोडणाऱ्या विमानांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करत महिला सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे. 

२६ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत एअर इंडियाच्या ११ फेऱ्यांमध्ये फक्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच हवाई उड्डाण क्षेत्राशी संबंधित असलेल्या, मात्र कधीही विमान प्रवास न केलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एअर इंडियाने दिल्ली ते आग्रा अशा हवाई प्रवासाचे आयोजन केले आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या प्रवासाचे आयोजन करण्यात आले आहे.

एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच ऐतिहासिक कामगिरी करत इतिहास रचला आहे. एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. 

संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली हे अंतर यशस्वीपणे कापत इतिहास रचला आहे. याआधी फक्त महिलांचा समावेश असलेल्या कोणत्याही विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलेली नाही. 

या विक्रमी कामगिरीचा गौरव जागतिक महिला दिनाच्या निमित्तान करण्यात येणार आहे. यावेळी ऐतिहासिक कामगिरी करत इतिहास रचणाऱ्या एअर इंडियाच्या पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या विमानातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल.टीम इंडियाची स्पॉन्सरशीप OPPO मोबाईल कंपनीकडे
भारतीय संघाला नवीन स्पॉन्सरशीप मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) दिलेल्या माहितीनुसार OPPO मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिडेट कंपनीने भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे हक्के मिळवले आहेत. 

बीसीसीआयने ओप्पोसोबत पुढील पाच वर्षांसाठी करार केला असून येत्या १ एप्रिल २०१७ रोजी ओप्पोसोबतच्या कराराला सुरूवात होणार आहे. याआधी भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे अधिकार ‘स्टार इंडिया’कडे होते.

बीसीसीआयने संघाच्या स्पॉन्सशीपसाठी पायाभूत किंमत (बेस प्राईस) यावेळी तब्बल ५३८ कोटी इतकी ठेवली होती. 

एप्रिल महिन्यापासून पुढील पाच वर्षात भारतीय संघ एकूण २५९ सामने खेळणार आहे. यातील २३८ सामने दोन संघांमध्ये, तर २१ आयसीसीच्या स्पर्धांचे सामने आहेत. ८ मार्च महिला दिन 
जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.

१९०९ पर्यंत महिला दिन २८ फेब्रुवारीला साजरा केला जायचा. आंतरराष्ट्रीय महिला वस्त्रे निर्मिती कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी महिला दिन साजरा करण्यात आला होता. 

ऑगस्ट १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा, असे ठरविण्यात आले होते. पण तो दिवस त्यावेळी निश्चित करण्यात आला नव्हता. 

त्यानंतर १९१४ मध्ये पहिल्यांदा ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यादिवशी रविवार असल्यामुळे हा दिवस निवडण्यात आला होता. पण त्यानंतर ८ मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला. 

महिला दिन हा कोणत्याही संघटनेचा म्हणून ओळखला जात नाही. तर जगभरातील वेगवेगळ्या देशांतील सरकारांकडून महिला दिन साजरा केला जातो. गेल्यावर्षी जगभरात महिला दिन स्त्री-पुरुष समानतेला वाहण्यात आला होता.