मुंबईत तरंगते हॉटेल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबईतील पहिल्या तरंगत्या हॉटेलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले.गोव्याच्या धर्तीवर मुंबईतही पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने तरंगते हॉटेल अर्थात फ्लोटेल सुरु करण्यात आले आहे. 


वांद्रे रेक्लमेशनजवळ हे हॉटेल सुरु करण्यात आले आहे. एबी सेलेस्टियल या खासगी कंपनीने हे हॉटेल सुरु केले असून डब्ल्यूबी इंटरनॅशनल कन्सल्टंटनेही यात सहकार्य केले आहे. 

शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फ्लोटेलचे उद्घाटन करण्यात आले. वांद्रे-वरळी सागरीसेतूला लागूनच असलेल्या महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या जेटीवर हे तरंगते हॉटेल उभे राहिले आहे.

फ्लोटेलमध्ये तीन रेस्टॉरंट्स असून एक हॉलदेखील आहे. याशिवाय स्काय डेक आणि दोन गॅलरीदेखील असल्याचे पर्यटन महामंडळाच्या अधिका-यांनी सांगितले. फ्लोटेलमध्ये ६५० जणांना सामावून घेण्याची क्षमता आहे.

मुंबईतील फ्लोटेलचे २०१४ मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र हे तरंगते हॉटेल प्रत्यक्षात सुरु होऊ शकले नाही.

भारतात गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये फ्लोटेल असून या फ्लोटेलना पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्क, दुबई, हाँगकाँग, व्हिएतनाम आदी देशांमध्ये फ्लोटेल आहेत.



मालतीताई किर्लोस्कर यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मालतीताई शंकरराव किर्लोस्कर यांचे वयाच्या ९४व्य वर्षी निधन झाले. ‘किर्लोस्कर श्री’ मासिकाचे संस्थापक शंकरराव किर्लोस्कर यांच्या त्या कन्या होत्या, तर मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या त्या भगिनी होत्या. 

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले. तेथेच त्यांनी मराठीच्या प्राध्यापिका म्हणून ३८ वर्षे सेवा केली होती. 

त्यांची ‘भक्तिभाव’ आणि ‘फुलांची ओंजळ’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध दैनिके, साप्ताहिकांमध्ये विपुल लेखन केले आहे. त्यांचा वाचन व्यासंग मोठा होता. 



ली वेई चौथ्यांदा विजेता
मलेशियाचा प्रौढ खेळाडू ली चोंग वेई याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या गटात चौथ्यांदा अजिंक्यपद मिळवित हुकमत सिद्ध केली. महिलांमध्ये चीन तैपेईची खेळाडू तेई तेझु यिंग हिने ऐतिहासिक विजेतेपद जिंकले.

ली वेई याने अंतिम फेरीतील सरळ लढतीत चीनचा बिगरमानांकित खेळाडू शेई युकी याच्यावर २१-१२, २१-१० असा विजय मिळविला. या विजेतेपदासह त्याने आपलेच प्रशिक्षक मॉर्टन फ्रॉस्ट यांचा चार विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली. 

महिलांमध्ये अग्रमानांकित खेळाडू तेई यिंग हिने थायलंडच्या राचनोक इन्तानोन हिच्यावर २१-१६, २२-२० असा रोमहर्षक विजय मिळविला. या स्पर्धेत विजेतेपद मिळविणारी ती चीन तैपेई देशाची पहिलीच खेळाडू आहे.

ली वेई या ३४ वर्षीय खेळाडूच्या गुडघ्यावर मध्यंतरी शस्त्रक्रिया करावी लागली होती व त्यामुळे बरेच दिवस तो स्पर्धात्मक खेळापासून दूर होता. त्याचा मागमूस न दाखविता त्याने येथे युवा खेळाडूंना लाजवील असा आक्रमक खेळ केला. 



सागरी तापमानवाढीमुळे मालदीवमधील प्रवाळ बेट नष्ट
वर्षभरापूर्वी मालदीवमध्ये असलेले प्रवाळ बेट आता नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. वाढत्या सागरी तापमानामुळे हा परिणाम होत असल्याचे संशोधकांचे मत आहे.

जगातील प्रवाळबेटे नष्ट होत असून ती परिसंस्थात्मक दुर्घटना आहे. जगात गेल्या तीस वर्षांत निम्मी प्रवाळबेटे नष्ट झाली आहेत. आता उरलेली प्रवाळ बेटे निदान तीन दशके तरी टिकून राहावीत अशी संशोधकांची अपेक्षा आहे. 


प्रवाळ बेटांचे अस्तित्व हे पृथ्वीला उपकारक असते कारण त्यामुळे सागरी प्रजातींना फायदा होत असतोच. शिवाय जगातील अब्जावधी लोकांना त्याचा लाभ मिळतो. आतापासून शंभर वर्षांनी सर्व प्रवाळ बेटे नष्ट होतील व हा लाभ मिळणार नाही. 

जगात आता जागतिक तापमानवाढ थांबली असे गृहित धरले तरी २०५० पर्यंत ९० टक्के प्रवाळ बेटे नष्ट झालेली असतील. त्यामुळे खूप मोठी उपाययोजना केली गेली तरच ही बेटे वाचू शकतात. मानवी वंशच या प्रवाळ बेटांच्या नष्ट होण्याने धोक्यात येऊ शकतो. 

प्रवाळ बेटे ऑक्सिजनची निर्मिती करतात. पाण्याखालील पर्जन्य जंगले असे त्यांचे वर्णन केले जाते. चार पैकी एका सागरी प्रजातीला प्रवाळ बेटात आसरा मिळत असतो. वादळांपासून किनाऱ्यांचे रक्षण करण्याचे कामही ही बेटे करतात. या बेटांवरील पर्यटनातून अब्जावधी डॉलर्स मिळतात तसेच मासेमारीतूनही पैसा मिळतो. तेथील काही घटकद्रव्ये कर्करोग, संधीवात व विषाणूजन्य तापात वापरली जातात. 

प्रवाळ हे अपृष्ठवंशीय असतात व ते कॅल्शियम काबरेनेट बाहेर टाकत असतात त्यामुळे त्यांना संरक्षक कवच मिळते, ती कवच रंगीत असतात कारण त्यांच्या शरीरातील उतींमध्ये एक शैवाल असते त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळत असते. प्रवाळ हे तापमानाला संवेदनशील असतात व सागराचे वाढते तापमान, आम्लीकरण, अति मासेमारी व प्रदूषण यांचा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो.



पाकिस्तानमध्ये १९ वर्षांनंतर होणार जनगणना
पाकिस्तान १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय जनगणना करणार आहे. ही जनगणना बुधवारपासून सुरू होणार आहे. यासाठी २ लाखांहून अधिक सैनिकांची मदत घेतली जाणार आहे. 

पाक सैन्याचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर आणि सूचना मंत्री मरियम औरंगजेब यांनी पत्रकार परिषदेत देशातील सहाव्या वेळेस होणाऱ्या जनगणनेसंबंधीच्या तयारीची माहिती दिली.

दोन टप्प्यात ही जनगणना होणार असून २५ मेपर्यंत पूर्ण करायचे लक्ष्य आहे. प्रत्येक जनगणना अधिकाऱ्याबरोबर किमान एक-एक सैनिक असेल. प्रत्येक घरी जाऊन कुटुंबाची विस्तृत माहिती घेणार आहेत.



भारतीय वंशाचे अॅटर्नी प्रीत भरारा यांची हकालपट्टी
भारतीय वंशाचे अमेरिकन अॅटर्नी प्रीत भरारा यांना ट्रम्प प्रशासनाने पदावरुन काढून टाकले आहे. प्रीत भरारा यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याची संधी प्रशासनाकडून देण्यात आली होती परंतु आपण राजीनामा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली. 

प्रशासनात एकसूत्रता यावी म्हणून ओबामा यांच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या अॅटर्नींना काढून टाकावे अशी सूचना महाधिवक्ता जेफ सेशन्स यांनी केली होती. अमेरिकेमध्ये एकूण ९३ अॅटर्नी आहेत. त्यापैकी केवळ ४६ जण सध्या काम करत होते. काही जणांनी याआधीच आपले राजीनामे दिले होते.



स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा सार्वमत
ब्रिटनपासून बाहेर पडून स्वतंत्र देश बनविण्यासाठी स्कॉटलंड पुन्हा सार्वमत घेणार आहे. पुढील वर्षाच्या (२०१८) अखेरीस ही सार्वमत चाचणी घेतली जाईल. 

स्वातंत्र्यासाठी दुसऱ्यांदा सार्वमत चाचणी घेणे अगदी बरोबर आहे असे मत मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी व्यक्त केले आहे. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या बरोबर आधी ही सार्वमत चाचणी घेण्यात येईल 

स्कॉटलंड ने ब्रिटनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तर जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या ब्रिटनकरिता हा मोठा धक्का ठरेल. यापूर्वी स्कॉटलंडमध्ये स्वातंत्र्यासाठी सप्टेंबर २०१४ मध्ये सार्वमत घेण्यात आले होते. त्यावेळी ५५ टक्के लोकांनी ब्रिटनपासून स्वतंत्र होण्यास विरोध दर्शविला होता.

त्यावेळी ब्रिटन युरोपीय संघातच राहील, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र, ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडला, तर स्कॉटिश नागरिकांना युरोपीय संघातच राहायची इच्छा आहे.

गेल्या वर्षी २३ जून २०१६ रोजी युरोपीय संघातून वेगळे होण्यासाठी ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले. इंग्लंड आणि वेल्सने युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी मत दिले. तर उत्तर आयर्लंड आणि स्कॉटलंडने युरोपीय संघातच राहण्यासाठी मत दिले.