पीकविमा योजनेसाठी आधार अनिवार्य
खरीप हंगाम २०१७ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना व हवामान आधारित फळ पीकविमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. या योजनांसाठी आधार क्रमांक संलग्न केलेल्या बॅंक खात्याच्या वापरामुळे योजनेची अंमलबजावणी जलद होणार आहे.


शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून खात्यावर थेट जमा करणे सुलभ होणार आहे. 
राज्यात खरीप २०१६ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. 

केंद्र सरकारच्या ८ फेब्रुवारी २०१७ च्या राजपत्रान्वये खरीप हंगाम २०१७ पासून प्रधानमंत्री पीकविमा योजना व फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणिकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 



मुकेश अंबानी भारतीय अब्जाधीशांमध्ये ‘टॉप’
भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी अव्वल स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.२ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. 

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. गेट्स हे सलग चौथ्या वर्षी पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८६ अब्ज डॉलर आहे. बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफेट यांची ७५.६ अब्ज डॉलर संपत्ती असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे या यादीतील स्थान घसरले आहे. २२० क्रमांकावरून ५४४ व्या स्थानी त्यांची घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ३.५ अब्ज डॉलर आहे. 

अव्वल दहा जणांच्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस तिसऱ्या तर फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग पाचव्या स्थानी आहेत. याशिवाय ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन सातव्या स्थानी आहेत. 

जगातील अब्जाधीशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ होऊन ती २ हजार ०४३ वर पोहोचली आहे. फोर्ब्जकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या यादीच्या ३१ वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठी झेप आहे, असे फोर्ब्जने म्हटले आहे. 

या यादीतील अब्जाधीशांमध्ये ५६५ अमेरिका, चीन ३१९, जर्मनीतील ११४ जण आहेत. अब्जाधीशांच्या या यादीत भारतातील १०१ व्यक्तींचा समावेश आहे. त्यातील १३ व्यक्तींना पहिल्यांदाच या यादीत स्थान देण्यात आले आहे. 

भारताकडून मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्यांची २३.२ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. या यादीत ते ३३ व्या स्थानी आहेत. गेल्या वर्षी ते ३६ व्या स्थानी होते. त्यांच्यानंतर लक्ष्मी मित्तल ५६ व्या स्थानी, तर अझीम प्रेमजी ७२ व्या स्थानी आहेत. दिलीप संघवी ८४ तर शीव नाडर १०२व्या स्थानी आहेत.



आयडिया आणि व्होडाफोनचे विलिनीकरण होणार
भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी व्होडाफोनने आयडियासोबत विलिनीकरणाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे. 

व्होडाफोन इंडिया आणि याअंतर्गत येणारे व्होडाफोन मोबाईल सर्व्हिसेस लिमिटेड आता आदित्य बिर्ला ग्रुपच्या आयडिया सेल्यूलरमध्ये विलीन होणार आहे. विलिनीकरणाची ही प्रकिया पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल.

विलिनीकरण झाल्याने आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलर ही देशातील सर्वात मोठी मोबाईलधारक ग्राहक असणारी कंपनी बनली आहे. 

व्होडाफोन आणि आयडियाच्या विलिनीकरणानंतर चेअरमनपद आयडियाकडे जाईल. तर सीएफओचे पद व्होडाफोनकडे गेले आहे. सीईओ आणि सीओओविषयी संयुक्त बैठकीतच निर्णय घेतला जाईल असे सूत्रांनी सांगितले. 

नवीन कंपनीमध्ये व्होडाफोनची भागीदारी ४५ टक्के आणि आयडियाची भागीदारी २६ टक्के असणार आहे. पुढे जाऊन आदित्य बिर्ला ग्रूप आणि व्होडाफोनची भागीदारी समान होईल.

भारतीय दूरसंचार क्षेत्रात सध्या भारती एअरटेलचा ३३ टक्के हिस्सा आहे. तर गेल्याच वर्षी दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केलेल्या रिलायन्स जिओचा हिस्सा लवकरच १३ टक्के होण्याचा अंदाज आहे. भारतीचे सध्या सर्वाधिक २६.३३ कोटी ग्राहक आहेत.



तमिळनाडूने जिंकला विजय हजारे करंडक

सीनिअर फलंदाज दिनेश कार्तिकच्या शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर तमिळनाडूने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बंगालवर ३७ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. 

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूने बंगालवर अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा विजय मिळवला. याआधी तमिळनाडूने २००८-०९ आणि २००९-१० मध्येदेखील बंगालवर मात केली होती.



आनंदी देशांच्या यादीत भारताची घसरण
जगातील आनंदी देशांच्या यादीत भारत गेल्या वर्षीच्या तुलनेत चार अंकांनी अधिक खाली आला असून सध्या १२२व्या क्रमांकावर आहे. 

जगातील आनंदी देशांच्या यादीत भारत हा चीन, पाकिस्तान आणि नेपाळपेक्षाही मागे पडला आहे. जगातील सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीत नॉर्वेचा सर्वात वरचा क्रमांक आहे. अमेरिकाही गेल्या वर्षीपेक्षा एका क्रमांकाने घसरली असून सध्या त्यांचा १४ वा क्रमांक आहे.

द वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट २०१७ने जगातील १५५ देशांच्या आनंदाच्या स्तराची पाहणी केली, त्यामध्ये नॉर्वेने गेल्या वर्षीपेक्षा तीन अंकांनी वर उडी घेतली आणि डेन्मार्कला मागे टाकले आहे. गेल्या चार वर्षांपैकी तीन वर्षे डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर होता.

नॉर्वेपाठोपाठ डेन्मार्क, आइसलॅण्ड, स्वित्र्झलड, फिनलॅण्ड, नेदरलॅण्डस, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्वीडन यांचा क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय आनंदी निर्देशांक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात येथे हा अहवाल जारी करण्यात आला. 

भारताचा २०१३-१४ मध्ये ११८ वा क्रमांक होता तो आता १२२व्या क्रमांकावर गेला आहे. 
चीन (७९), पाकिस्तान (८०), नेपाळ (९९), बांगलादेश (११०), इराक (११७) आणि श्रीलंका (१२०) यांनी भारताच्या पुढे मजल मारली आहे.

दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, सामाजिक स्थिती, आरोग्यदायी जीवनशैली, भ्रष्टाचाराबाबतचा दृष्टिकोन आदी निकषांवरून आनंदाचे मोजमाप करण्यात आले आहे. 



उत्तर कोरियाकडून उच्च क्षमतेच्या अग्निबाणाची चाचणी
उच्च शक्ती क्षमता असलेल्या नवीन प्रकारच्या अग्निबाण इंजिनाची चाचणी उत्तर कोरियाने घेतली असून, या देशाचे नेते किम जोंग उन यांनी ही देशाच्या अवकाश कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची कामगिरी असल्याचे म्हटले आहे.

किम यांनी शनिवारी सोहे प्रक्षेपण स्थळावर जाऊन या चाचणीच्या वेळी वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिले. नवीन इंजिनाचा जोर व क्षमता तसेच नियंत्रण व्यवस्थेची विश्वासार्हता, रचनात्मक सुरक्षा यांची तपासणी यात करण्यात आली.

उत्तर कोरियाने अशा क्षेपणास्त्र व अग्निबाण चाचण्या करण्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली आहे. तर आमचा उपग्रह कार्यक्रम शांततामय आहे असा दावा उत्तर कोरियाने केला आहे. 

उत्तर कोरियाने केलेल्या दाव्यानुसार पुढील दहा वर्षांत चंद्रावर यान सोडण्याइतपत प्रगती केली जाणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन हे अलीकडेच चीन दौऱ्यावर गेले असता चीन व अमेरिका यांच्यात उत्तर कोरियाच्या मुसक्या बांधण्यावर मतैक्य झाल्याच्या बातम्या असताना उत्तर कोरियाने ही प्रक्षोभक कृती केले आहे.

उत्तर कोरियाने अण्वस्त्र व क्षेपणास्त्र कार्यक्रम जोरात चालवला असून, त्यामुळे अमेरिका व दक्षिण कोरिया या देशांना धोका आहे.