माध्यम स्वातंत्र्यात भारताचा १३६ वा क्रमांक
माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची स्थिती शेजारी देश पाकिस्तान आणि चीनसारखीच बिकट असल्याचे समोर आले आहे. माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारत तीन स्थानांनी घसरून १३६ व्या स्थानी आला आहे.  पॅरिसस्थित ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ संस्थेने माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला आहे. यात १८० देशांचा समावेश आहे. 


अमेरिका आणि ब्रिटनही माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात दोन स्थानांनी घसरून अनुक्रमे ४३ आणि ४० व्या स्थानावर आले आहे. निर्देशांकात ईटली सवाधिक २५ स्थानांनी वाढून ५२ व्या स्थानी आला आहे. 

या यादीत उत्तर कोरियात सर्वांत शेवटी आहे. गेले दशकभर ईरिट्रियाकडे शेवटचे स्थान होत.  मात्र उत्तर कोरियाने आता शेवटचे स्थान पटकावले आहे. शेवटच्या पाच देशांमध्ये चीन, सीरिया, तुर्कमेनिस्तान, ईरिट्रिया आणि उत्तर कोरिया हे देश आहेत. 

माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात 
नॉर्वे पाहिल्या क्रमांकावर, भारत १३६ व्या क्रमांकावर, पाकिस्तान १३९ व्या क्रमांकावर, चीन १७६ व्या क्रमांकावर, उत्तर कोरिया १८०  व्या क्रमांकावर आहे. 



यूपीमध्ये महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही
महापुरुषांच्या जयंतीला शाळा आणि सरकारी कार्यालयाला मिळणाऱ्या सुट्ट्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंद केल्या आहेत. जयंती आणि पुण्यतिथीला असणाऱ्या एकूण १५ सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुट्टीच्या ऐवजी एक तासाचा कार्यक्रम घेण्यात येईल. 

यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शिक्षणात नवनवीन बदल आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता शाळांमध्ये योग शिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. 

तसेच राज्यातील शाळांमध्ये आता नर्सरीपासूनच इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय यूपी सरकारने घेतला आहे. सध्या उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून इंग्रजीचे शिक्षण दिले जात आहे. 



‘सीआरपीएफ’ महासंचालकपदी भटनागर यांची नियुक्ती
केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती केली आहे. भटनागर हे १९८३ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे ‘आयपीएस’ अधिकारी आहेत.

सध्या सुदीप लखताकिया यांच्याकडे ‘सीआरपीएफ’चा प्रभारी कारभार होता.

इंडो तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) महासंचालकपदी आर. के. पचंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८३ च्या तुकडीचे ‘आयपीएस’ अधिकारी असलेले पचंदा हे पश्‍चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत.



राष्ट्रकुल स्पर्धेत २४ वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चे यजमानपद बर्मिंगहॅमला मिळाल्यास त्यामध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश होऊ शकतो. या क्रिकेटचे स्वरुप टी-२० असेल. क्रिकेटचे सामने एजबेस्टन आणि वर्सेस्टशायरच्या न्यू रोड होममध्ये होणार आहेत.

डरबनमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र डरबनमध्ये आर्थिक आणि राजकीय वाद सुरु असल्याने यजमानपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले आहे. 

यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदासाठी ब्रिटन सरकारकडून बर्मिंगहॅमचे नाव सुचवण्यात आले आहे.राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत बर्मिंगहॅमसोबतच कॅनडा, मलेशिया आणि ऑस्ट्रेलियामधील शहरांचादेखील समावेश आहे. यासोबतच लिव्हरपूलही यजमानपदासाठी उत्सुक आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत आवश्यक असणाऱ्या खेळांच्या यादीत क्रिकेटचा समावेश होत नाही. क्रिकेटचा समावेश पर्यायी खेळांच्या यादीत होतो. राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद स्वीकारणारे देश क्रिकेटचा समावेश करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ शकतात.



बीसीसीआयची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील मक्तेदारी संपुष्टात
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची जागतिक क्रिकेटमधील मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. 


आयसीसीच्या आर्थिक नफ्याचे बीसीसीआय ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या बरोबरीने प्रामुख्याने लाभार्थी आहेत, मात्र आता हे वर्चस्व धुळीस मिळणार आहे. भारताला आयसीसीच्या नफ्यातून प्रतिवर्षी ५७० दशलक्ष डॉलर्स रक्कम मिळते, मात्र आता ही रक्कम निम्यावर येणार आहे. 

दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत प्रशासन, घटनात्मक सुधारणा आणि आर्थिक संरचना या मुद्दय़ांवर मतदान घेण्यात आले. बीसीसीआयने सुधारणाविरोधी मतदान केले मात्र निकालात बीसीसीआय एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले. 

विशेष म्हणजे बीसीसीआयवर ओढवलेल्या नामुष्कीमागे आयसीसीचे पहिले स्वतंत्र कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांची भूमिका निर्णायक आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष मनोहर यांनी बीसीसीआयच्या वर्चस्ववादी भूमिकेला आक्षेप घेत बदल सुचवला होता.

दबावतंत्र म्हणून भारतीय संघ इंग्लंडमध्ये १ जूनपासून होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे.



अमेरिकेकडून दक्षिण कोरियाला क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा
उत्तर कोरियाच्या आण्विक महत्त्वाकांक्षा वाढलेल्या असतानाच चीनला नकोशी असलेली क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा अमेरिकेने दक्षिण कोरियाला पुरवण्यास सुरुवात केली आहे. टर्मिनल हाय अल्टिटय़ूड एरिया डिफेन्स (थाड) यंत्रणा दक्षिण कोरियात बसवण्याचे काही दिवसांपूर्वीच ठरले होते. 

चीनने या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेच्या प्रस्तावानंतर दक्षिण कोरियाविरोधात काही आर्थिक र्निबध लादले असून पर्यटकांच्या गटांनाही बंदी घातली आहे.

वर्षअखेरीपर्यंत त्याच्या बॅटरीज बसवण्याचे काम पूर्ण होईल. थाड ही यंत्रणा मध्यम व लघु पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी आहे. कोरियन द्विपकल्पात तणाव वाढलेला असताना अमेरिकेने थाड यंत्रणा दक्षिण कोरियात पाठवली आहे.