खासदार व अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन 
ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व भाजपचे माजी खासदार विनोद खन्ना यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. 

त्यांचा जन्म पेशावर (पाकिस्तान) मध्ये ६ ऑक्‍टोबर १९४६ मध्ये झाला होता. ‘मनके मित’ या सुनिल दत्त यांच्या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट एका तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. 

विनोद खन्ना यांनी नकारात्मक भूमिका साकारत व्हिलन म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. नंतर अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर ते लाडके हीरो बनले. 
१९७१ मध्ये ‘हम तुम और वो’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली आणि त्यानंतर त्यांचा खलनायक ते नायक असा प्रवास सुरू झाला.

त्यांनी मेरा गाव मेरा देश, ऐलान, इन्कार, अमर अकबर अँथनी, लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, हाथ की सफाई, मुकद्दर का सिकंदर, मेरे अपने, जुर्म आदीसह १९६८ ते २०१७ या कालावधीत त्यांनी १४४ चित्रपटांत काम केले

त्यांनी १९८२ मध्ये अचानक बॉलिवूडला रामराम करून आचार्य आशो रजनीश यांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा चित्रपट क्षेत्राकडे वळले. १९८७ पासून ‘इन्साफ’ या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा पदार्पण केले.नुकताच प्रदर्शित झालेला ‘एक थी रानी ऐसी भी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

भाजपच्या तिकिटावर ते तीन वेळा पंजाबमधील गुरुदासपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांची राजकीय वाटचालही चांगली ठरली.



‘यूपी’त कन्याजन्मासाठी भाग्यलक्ष्मी योजना
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कन्याजन्माचे स्वागत करताना गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली की ५०हजार रुपयांचा बॉंड देण्याचे जाहीर केले. या अंतर्गत ‘भाग्यलक्ष्मी योजना’ सुरू करण्यात येणार आहे. 

मुलीच्या आईलाही ५१०० रुपये मिळणार असून, उत्तर प्रदेश सरकारच्या महिला कल्याण विभागातर्फे यो योजनेसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.



रक्तदानात महाराष्ट्र अव्वल
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र हा रक्तदानाच्या क्षेत्रात देशात अग्रेसर राहिला असून यंदाच्या वर्षी तब्बल १६ लाख १७ हजार रक्ताच्या पिशव्या गोळा करून देशात नवा उच्चांक निर्माण केला. यातील तब्बल ९७ टक्के रक्तदान हे ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून गोळा करण्यात आले असून हाही एक राष्ट्रीय विक्रम ठरला आहे.



गेल्या दशकात पश्चिम बंगाल हे रक्तदानाच्या क्षेत्रात अग्रसेर होते. तथापि महाराष्ट्रात १९९७ साली राज्य रक्तसंक्रमण परिषदेची (एसबीटीसी) स्थापना केल्यापासून राज्यातील ऐच्छिक रक्तदानात पद्धतशीरपणे वाढ होऊ लागली. यातून गेल्या तीन वर्षांमध्ये अनुक्रमे महाराष्ट्रात १५ लाख ६२ हजार, १५ लाख ६६ हजार आणि यंदाच्या वर्षी १६ लाख १७ हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात यश आले.


महाराष्ट्रात ३२१ रक्तपेढय़ा असून गेल्या वर्षभरात तब्बल २६,००० रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले. देशाचा विचार केल्यास देशात एकूण २६९० रक्तपेढय़ा असून देशभरात गेल्या वर्षभरात ६५,००० रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली होती. 

जागतिक आयोग्य संघटना व राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या निकषांनुसार राज्याच्या लोकसंख्येच्या एक टक्का रक्त जमा होणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सुमारे बावीस कोटी एवढी असून तेथे गेल्या वर्षभरात साडेनऊ लाख रक्ताच्या पिशव्या जमा होऊ शकल्या तर बिहारमध्ये अवघ्या दीड लाख रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. 

महाराष्ट्राने ऐच्छिक रक्तदानात रक्तक्रांती घडवून आणली असून देशभरात महाराष्ट्र पॅटर्न राबविण्याचे आदेश राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत. राज्यातील रक्तदानाच्या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला तीनवेळा पुरस्कारही मिळाले आहेत. 



शनी ग्रहाचे अंतरंग टिपण्यात ‘कॅसिनी’ला यश
अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने पाठविलेल्या कॅसिनी या अंतराळयानाने शनी ग्रहाच्या पहिल्या विवरात यशस्वीपणे प्रवेश केला असून, गुरुवारी तेथून शनीची सर्वांत जवळून टिपलेली छायाचित्रे पाठविण्यात आली आहेत. 

शनीवर फिरणारे ढग, अतिशय मोठी वादळं आणि हवामानाची असाधारण अशी षटकोनी रचना यांची साक्ष देणारी छायाचित्रे ‘कॅसिनी’ या अंतराळयानातून पृथ्वीवर पाठविण्यात आली आहेत. ‘कॅसिनी’च्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांपासून शनी ग्रहाबाबत संशोधन करण्यात येत आहे. 

‘कॅसिनी’चा हा शनीभोवतीचा अंतिम टप्पा आहे. शनी ग्रहाभोवती वर्तुळाकार कड्या आहेत. अवकाशात त्या अंगठीप्रमाणे दिसतात. शनी आणि त्यातील सर्वांत अंतर्गत कड्यांमधील अरुंद जागेतून बुधवारी कॅसिनी गेले. आतापर्यंत कोणतेही यान एवढ्या जवळ गेलेले नव्हते. 

कॅसिनीने बुधवारी ही कामगिरी केली. अशा प्रकारची कामगिरी २२ वेळा करण्याची योजना आहे. त्याद्वारे शनीवरील ढग आणि तेथील विवरे यांच्यातील अज्ञात भागावर रोबोटिक संशोधन करण्यात येणार आहे, ‘नासा’ने सांगितले. 

‘आपण धाडस केले तर आपली जिज्ञासा आपल्याला कोठे घेऊन जाऊ शकते हे दाखवून देत कॅसिनी यानाने एक नवी सुरवात केली आहे,’ असे नासाच्या ग्रह विज्ञान विभागाचे प्रमुख जिम ग्रीन यांनी सांगितले.