मनरेगा योजना राबवण्यात महाराष्ट्र पिछाडीवर
रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे. मात्र ‘मनरेगा’ योजना राबवण्यात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. २०१५-१६ मध्ये राज्यात २८६३२ पैकी ९०२२ गावांत ‘मनरेगा’ योजना राबवण्यात आलेली नाही. राज्यातील २१ जिल्हे दुष्काळग्रस्त असून, तेथील ६३५२ गावांत मनरेगा योजनेंतर्गत एकही काम करण्यात आलेले नाही.





‘गेट वे’वर आज विश्वशांती परिषद
भगवान गौतमबुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती गेट वे ऑफ इंडिया येथे बुधवारी साजरी होणार आहे. यासाठी विश्वशांती परिषदेचे आयोजन करण्यात आले असून येथे १७ बौद्ध देशांचे राजदूत हजेरी लावणार आहेत. यानिमित्त काळाघोडा ते गेट वे ऑफ इंडिया अशी विश्व शांतता रॅली काढण्यात येईल.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत विश्वशांती परिषदेचे अध्यक्ष असतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेचे उद्‌घाटन करणार आहेत.

सायंकाळी श्रीलंकेच्या उच्चायुक्त श्रीमती सरोजा सिरिसेना तसेच थायलंडचे उच्चायुक्त एकापोल पोलपिपट भारतासोबतचे सांस्कृतिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासंबंधीचे विचार मांडणार आहेत. 



गोवा विधानसभेत जीएसटीला मंजुरी
गोवा विधानसभेतील सदस्यांनी वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकास एकमताने मंजुरी दिली. 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर विधेयकांना (जीएसटी) मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतींनी जीएसटी विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. 

जीएसटी विधेयकाला २९ मार्च रोजी लोकसभेत तर ६ एप्रिलला मंजुरी देण्यात आली होती. राष्ट्रपतींनी ‘जीएसटी’च्या समन्वित, केंद्रीय, राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठीच्या चार वित्त विधेयकांना मंजुरी दिली आहे.



न्यायाधीश कर्नन यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. ए. कर्नन यांना अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पदावर असताना शिक्षा ठोठावण्यात आलेले कर्नन हे पहिलेच न्यायाधीश ठरले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष घटनापीठाने आज (मंगळवार) कर्नन यांना शिक्षा सुनावली. 
या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने कर्नन यांना सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. तसेच कर्नन यांचे विधान किंवा त्यांनी काढलेले ‘आदेश’ प्रसिद्ध करण्यास प्रसारमाध्यमांनाही बंदी केली आहे. 



सोहेल महमूद पाकचे नवीन उच्चायुक्त
भारतातील पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली असून भारताने त्यांना व्हिसाही मंजूर केला आहे.

सोहेल महमूद हे सध्या तुर्कीत पाकिस्तानचे राजदूत आहेत. ते नवीन पदाची सूत्रे मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला घेणार आहेत.

अब्दुल बासित यांचा भारतातील तीन वर्षांचा कार्यकाळ संपलेला असल्याने त्यांच्या जागी सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



भारताच्या झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम
भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा उच्चांक प्रस्थापित केला. तिने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट्झपॅट्रीक हिचा १८० विकेटचा विश्वविक्रम मोडला.

झूलन ३४ वर्षांची आहे. ‘महिला क्रिकेटची कपिल देव’ अशी तिची ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी क्रिकेट स्पर्धेत तिने हा टप्पा गाठला. १५३
 सामन्यांत तिच्या १८१ विकेट झाल्या. कॅथरीनने १०९ सामन्यांत १८० विकेट घेतल्या होत्या. 



८५ व्या वर्षी एव्हरेस्ट चढताना शेरचान यांचा मृत्यू
जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट वयाच्या ८५व्या वर्षी चढण्याच्या प्रयत्नात नेपाळचे मिन बहादूर शेरचान मृत्युमुखी पडले. या घटनेमुळे एव्हरेस्ट चढण्यासाठी वयोमर्यादा घालण्याचा विचार नेपाळचे प्रशासन करीत आहे. 

यापूर्वी शेरचान यांनी २००८ मध्ये ७६ वर्षांचे असताना एव्हरेस्ट शिखर सर केले होते. त्यावेळी ही कामगिरी करणारे ते जगातील सर्वांत जास्त वयाचे गिर्यारोहक ठरले होते. 

मात्र २०१३ मध्ये ८० वर्षीय जपानी नागरिक युईचिरो मिउरा यांनी हा नवा विक्रम प्रस्थापित केला. तो मोडण्यासाठी शेरचान यांनी ही मोहीम सुरू केली होती, मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

नेपाळच्या नियमांनुसार एव्हरेस्टवर चढण्यासाठी किमान वय 16 असणे आवश्यक आहे. मात्र, कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
 

एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर शनिवारी संध्याकाळी ८५ वर्षीय शेरचान यांना प्राण गमवावे लागले. यापूर्वी, शैलेंद्रकुमार उपाध्याय या ८२ वर्षीय व्यक्तीने २०११ मध्ये एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. 



द. आफ्रिकेत मानवसदृश प्राण्याचे जीवाष्म
दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन लाख वर्षांपूर्वी मानवसदृश प्राण्याचे अस्तित्व होते, तुलनेने लहान मेंदू असणाऱ्या या प्राण्यासोबतच मानवाचे पूर्वज वाढले, त्यानंतर काही काळाने हे मानवसदृश प्राणी नष्ट झाले असावेत, असा अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे. 


‘इ-लाइफ’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये हा दावा करण्यात आल्याने मानवाच्या उत्क्रांतीसंबंधीच्या प्रस्थापित सिद्धांतांना तडा गेला आहे. ‘होमो सॅपियन्स’च्या आधी अस्तित्वात असलेल्या ‘होमीनिन’पासून आजचा आधुनिक मानव उत्क्रांत झाल्याचा दावा काही संशोधक करतात.

चिंम्पाझी, गोरिला यांच्यासोबतही मानवाचे वंशज वावरले, त्यानंतर कालांतराने मानवाचे वंशज ‘होमो सॅपियन्स’चाच एक घटक असलेल्या ‘होमीनिन’पासून जैविकदृष्ट्या वेगळे झाले. या नव्या संशोधनामुळे “होमो नालेदी’ या मानवाच्या प्रजातीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. 

जोहान्सबर्गपासून वायव्येला ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका शेतामध्ये उत्खनन करत असताना संशोधकांना काही नवे जीवाश्‍म सापडले असून उत्खननामध्ये सापडलेले ‘होमो नालेदी’ या मानवी प्रजातीचे जीवाश्‍म साधारणपणे २० लाख वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते.



रोमानिआत अकरावीच्या अभ्यासक्रमात रामायण, महाभारताचा समावेश
भारत आणि रोमानिआ देशांत अत्यंत चांगले व मजबूत संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये सातत्याने सांस्कृतिक देवाण-घेवाण होत असते. त्याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे. 

रोमानिआच्या अकरावीच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारतातील काही भागांचा समावेश करण्यात आल्याची माहिती रोमानिआचे राजदूत राडू ओक्टावियन डोबरे यांनी याची माहिती दिली. 

रोमानिआत दोन बॉलिवूड चॅनेल्स २४ तास प्रसारित होतात याची माहितीही त्यांनी दिली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यस्त्वाच्या भारताच्या दावेदारीला रोमानिआचे आपले समर्थन असल्याचे ते म्हणाले.



उस्ताद रईस खान यांचे निधन
आपली उपजत प्रतिभा व त्याच्या जोडीला अभ्यास यातून सतारवादनावर विलक्षण प्रभुत्व असलेले श्रेष्ठ सतारवादक उस्ताद रईस खान यांचे वयाच्या ७७व्या वर्षी अल्पकालीन आजारानंतर शनिवारी कराची येथे निधन झाले.

रईस खान यांचा जन्म सन १९३९ मधला इंदोरचा. पूर्णत संगीतात बुडालेले असे त्यांचे घर होते. त्यांचे आजोबा इनायत अली खान हे भारतीय उपखंडातील एक अव्वल सतारवादक म्हणून प्रख्यात होते. रईस खान सन १९६८मध्ये पाकिस्तानला वास्तव्यासाठी गेले.

रईस खान यांनी वडील मुहम्मद खान व चुलते वलायत अली खान यांच्याकडे सतारवादनाचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा पहिला कार्यक्रम मुंबईत केला.

हिंदी चित्रपटसृष्टीशीही त्यांचा घनिष्ठ संबंध आला. बहारों मेरा जीवन भी सवांरो.. चंदन सा बदन.. बैय्या ना धरो.. अशा असंख्य गाण्यांमध्ये ऐकू येणारी सतार ही रईस खान यांची आहे.