माजी मंत्री ए. टी. पवारांचे निधन
माजीमंत्री अर्जून तुळशीराम तथा ए. टी. पवार यांचे आज सकाळी मुंबईत वृध्दापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.


राज्यशास्त्रातील एम. ए. पदवीधर असलेल्या ए. टी. पवारांचा १ डिसेंबर १९३८ ला जन्म झाला. वयाच्या ३४ व्या वर्षी आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय म्हणून राज्यभर ओळखले जात होते.

आदिवासी विकासमंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री, तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 



कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा कंदी
मुंबईच्या वाहतूक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नियोजित सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) उभारणीसाठी आवश्‍यक असणारी पर्यावरणविषयक अंतिम मंजुरी केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे. 

या मंजुरीमुळे मुंबईच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या ‘कोस्टल रोड’च्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करून तत्काळ त्याचे काम सुरू करता येणार आहे.

या सागरी किनारा मार्गामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. 



मानवनिर्मित कुरण बनले वाघांचे आश्रयस्थान
उत्तराखंडधील नैनिताल येथे सुमारे ६० हेक्‍टर परिसरात तयार केलेले मानवनिर्मित कुरण कुमाऊँतील अनेक वाघांचे आश्रयस्थान बनले असून, वाघांबरोबर येथे हत्ती तसेच, अन्य जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.


तेराईच्या पूर्वेकडील जंगल परिसरालगत असलेल्या भागात हे कुरण तयार करण्यात आले असून, या कुरणात ३९  प्रकारचे गवत आढळून येते. या भागात वाढत असलेली वाघ आणि हत्तींची संख्या पाहता प्रायोगिक तत्त्वावर या कुरणाची निर्मिती करण्यात आली. दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण झाले. मार्जार कुळातील प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी आवश्‍यक ती सर्व उपकरणे येथे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

२०१६ मध्ये झालेल्या प्राणी गणनेनुसार, पश्‍चिम भागात ११९ वाघ व १९७ हत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने तयार केलेल्या कुरणात सध्या एक नर वाघ, मादी व त्यांचे दोन बछडे आढळून आले आहेत. यावरून हा प्रयोग यशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. मुख्य उद्दिष्ट सफल होताच. याच परिसरात ३८ हेक्‍टर जागेत दुसऱ्या एका कुरणाची निर्मिती करण्यात येणार आहे.



भारतीय लष्कर १५ वर्षांनंतर राबवणार ‘कासो ऑपरेशन’
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहशतवाद्यांविरोधात ‘घेराव घालणे आणि शोध मोहीम’ (कासो ऑपरेशन) तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ वर्षांपूर्वी लष्कराने ही कार्यप्रणाली बंद केली होती. 

लष्कराने १५ वर्षांपूर्वी स्थानिकांच्या विरोधानंतर कासो ऑपरेशन बंद केले होते. २००१ नंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच घेराव घालणे आणि शोध मोहीम चालवण्यात आली. 

सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये ४००० सैनिकांच्या मदतीने एक मोठे अभियान चालवले होते. त्यावरून लष्कराच्या रणनितीमधील बदलाचे संकेत मिळतात. कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन असेही कासो ऑपरेशनला म्हटले जाते.



‘उडाण’चे तिकीटदर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलणार
सरकारी उडाण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवेनुसार विमानांचे तिकीट दर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलणार आहेत. उडाण (उडे देश का आम नागरिक) या योजनेंतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेष सेवा द्याव्यात, असे केंद्र शासनाने सांगितले होते. 

त्यासाठी या कंपन्यांना अनुदान दिले जात होते. या अनुदानातही सरकारकडून बदल होणार असल्याने तिकीट दरात बदल होणार असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात आले.

या योजनेचा मुख्य उद्देश ज्या ठिकाणी विमानप्रवास कमी होत असलेल्या विमानतळांना जोडणे तसेच लोकांना कमी दरात विमान प्रवास उपलब्ध करुन देणे हा आहे. 

या सेवेंतर्गत पहिले उड्डाण शिमला ते दिल्ली असे सुरु करण्यात आले आहे. पुढील मार्गावरील सेवाही लवकरच सुरु करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. 

प्रतितास २५०० रुपये असे या तिकिटांचे दर ठरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.



दक्षिण कोरियात मून यांचा अध्यक्षपदी शपथविधी
दक्षिण कोरियातील अध्यक्षीय निवडणुकीत मून जे इन यांचा विजय झाल्यानंतर लगेचच शपथविधीही झाला. त्यांनी उत्तर कोरियाबरोबरचा तणाव कमी करण्यासाठी त्या देशाला भेट देण्याची तयारी दर्शवली आहे. 

डाव्या विचाराचे मून हे माजी मानवी हक्क वकील असून, त्यांनी उत्तर कोरियासमवेत शांततेचा पुरस्कार केला आहे.

माजी अध्यक्ष पार्क गेन हाय यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात महाभियोग चालवण्यात आला होता. त्याआधी त्यांना सत्ताभ्रष्ट करण्यात आले. त्यामुळेच मून सत्तेवर आले असले तरी दक्षिण कोरियात विविध मतमतांतरे आहेत.