राज्यात २१ टक्केच वनक्षेत्र शिल्लक
राज्यात केवळ २१ टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले असून परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी ३३ टक्‍क्‍यांपर्यंत वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून किमान ३३ टक्के क्षेत्र हे वनआच्छादित असेल तर पाऊसमानापासून प्रदूषण कमी होण्यापर्यंतची वाट सुखकर होते. 


त्यामुळे वनविभागाकडून सहा विविध प्रकारच्या योजनांची आखणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वनविभागाद्वारे सांगण्यात आले.



स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत पुणे, नवी मुंबईला सर्वोच्च पत मानांकन
स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत पालिकांना निधी उभारण्यासाठी बॉंड इश्‍यू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आवश्‍यक पत मानांकन नुकतेच जाहीर करण्यात आले.

१४ राज्यांतील ९४ शहरांचे पत मानांकन करण्यात आले. यात पुणे आणि नवी मुंबई महापालिकेला गुंतवणुकीस पूरक असलेले सर्वोच एए+ मानांकन देण्यात आले आहे. या मानांकनासाठी नवी दिल्ली महापालिकेचाही समावेश करण्यात आला आहे.

क्रिसिलसारख्या पत मानांकन संस्थांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांचे मानांकन करण्यात आले. पत मानांकन संस्थांकडून एएए ते डी असे मानांकन दिले जाते. पुढील २० वर्षांत स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेत शहरांच्या विकासासाठी ३९ लाख कोटी रुपयांची गरज भासणार आहे.

५५ शहरांना गुंतवणुकीस अनुकूल मानांकन देण्यात आले आहे. ३९ शहरांना बीबीबी असे मानांकन देण्यात आले आहे. राज्यातील नाशिक, पिंपरी चिंचवड, ठाणे या शहरांना एए नामांकन, तर मीरा भाईंदर पालिकेला ए नामांकन देण्यात आले. अमरावती शहराला बीबीबी तसेच नांदेड व सोलापूर शहरांना बीबी+ नामांकन देण्यात आले.

गेल्या २० वर्षांत २५ स्थानिक स्वराज्य संस्थांनी जवळपास १५०० कोटींचा निधी उभारला. १९९८ मध्ये अहमदाबाद पालिकेने पहिल्यांदा बॉंड इश्‍यू करून निधी उभारला होता.



अमिताभ बच्चन हेपेटायटिस सदिच्छा दूत
जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमधील कार्यक्रमात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अमिताभ बच्चन यांना हिपॅटायटिसविरोधी मोहिमेसाठी डब्ल्यूएचओचा गुडविल ऍम्बेसिडर जाहीर केले. 

विषाणुजन्य हेपेटायटिसमुळे भारतासह या प्रदेशात दरवर्षी ४ लाख १०  हजार लोक प्राण गमावतात. यासाठी पंजाबमध्ये राबवलेली मोहीम भारतभर राबवण्याची आवश्‍यकता आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. 

हिपॅटायटिसचे उपचार आणि औषधे अत्यंत महागडी आहेत. . हिपॅटायटिसवरील उपचार महागडे असले तरी अत्यावश्‍यक आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ ओढवू शकते. त्यासाठी येणारा खर्च औषधोपचारांपेक्षा अधिक खर्चिक आहे.

भारतात फक्त १० टक्के रुग्ण यासाठीची चाचणी करत असल्याने तेवढेच रुग्ण समजतात. भारतातील हिपॅटायटिसच्या रुग्णांचा निश्‍चित आकडा समजलेला नाही. 

अमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणावर जडलेल्या ठिकाणी हिपॅटायटिसचे रुग्ण जास्त आढळतात. भारतात पंजाबमध्ये असे सर्वाधिक रुग्ण आढळतात. 


यासाठी पंजाब सरकारने मोफत तपासणी आणि उपचारांची मोहीम राबवल्यानंतर तिथे हिपॅटायटिसचे २७ हजार रुग्ण आढळले होते. त्यापैकी ९३ टक्के रुग्ण उपचारांनंतर संसर्गमुक्त झाले. यासाठी पंजाब सरकारने डिस्पोसेबल इंजेक्‍शनचा प्रयोग राबवला.



इस्रो जूनमध्ये सर्वाधिक शक्तीशाली रॉकेटचे प्रक्षेपण करणा
भारत पुढील महिन्यात सर्वात शक्तीशाली रॉकेट सोडणार आहे. ४ टन वजनाचे संदेशवहन करणारे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता या रॉकेटमध्ये असणार आहे. भारत पहिल्यांदाच अशाप्रकारचे रॉकेट अवकाशात सोडणार आहे. यामुळे संदेशवहन आणि संपर्क क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीएसएलव्ही मार्क ३ चे प्रक्षेपण करणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. जीएसएलव्ही मार्क ३ चे प्रक्षेपण यशस्वी ठरल्यास इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल. 

सध्या इस्रोच्या रॉकेटची क्षमता २.२ टन वाहून नेण्याइतकी आहे. यापेक्षा जास्त वजन वाहून नेण्याची कामगिरी इस्रोच्या रॉकेट्सना अद्याप करता आलेली नाही. २.२ टनापेक्षा अधिकच्या वजनाचे उपग्रह वाहून नेताना भारताकडून कायम इतर देशांचा आधार घेतला जातो.



ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन
निवृत्त पोलीस महासंचालक आणि ज्येष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज पुरूषोत्तम बाम (७९) यांचे शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास येथे हृदयविकाराने निधन झाले. 

विशेष म्हणजे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात ज्या विषयावर ते सदैव खेळाडूंना मार्गदर्शन करीत राहिले त्याच योगा या विषयावर ते एका सभागृहात मार्गदर्शन करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

क्रीडा मानसोपचाराकडे वळण्यामागे बाम यांना कारणीभूत झाली पोलीस महासंचालकपदाहून निवृत्त झाल्यानंतरची एक दुखापत. या दुखापतीमुळे बाम यांना सहा महिन्यांपेक्षा अधिक दिवस आराम करावा लागला. यादरम्यान काही रशियन पुस्तके त्यांच्या वाचण्यात आली. 

त्यात एका पुस्तकातील ‘आपलं मन हाच आपला शत्रू’ हे वाक्य त्यांना अधिक भावले. स्वत: एक उत्कृष्ठ नेमबाज असलेल्या बाम यांनी त्यानंतर मग योग आणि मन यांचा क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास सुरूवात केली. क्रीडा मानसोपचाराचा रितसर अभ्यासक्रमही पूर्ण केला. 

१९९८ मध्ये नाशिकमध्ये नेमबाजीची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करून त्याव्दारे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाज घडविले.नेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी बाम यांनी एक्स एल टारगेट शुटर्स असोसिएशनची स्थापना केली. 

पुरूषोत्तम अकॅडमीचे संस्थापक, पुण्याच्या चाणक्य मंडळाचे विश्वस्त व मार्गदर्शक, योग विद्या धामच्या योग गुरुकुल विभागात अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले.



आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगची सुवर्णझेप
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सुवर्णपदक जिंकले. त्याने फ्रीस्टाईल प्रकारात ६५ किलो वजनी गटात हे यश मिळवले आहे.  विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताला पहिलेच सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच भारताच्या अनिलकुमार आणि ज्योती यांनी आपआपल्या गटात कांस्यपदके जिंकली. 

अंतिम लढतीत बजरंग पुनियाने दक्षिण कोरियाच्या ली सुंग चुल याला ६-२ ने पराभूत केले. अनिलने ग्रीको रोमनच्या ८५ किलो गटात उज्बेकिस्तानच्या मुहम्मदाली शमसिदिनोव्हविरुध्द शानदार पुनरागमन करताना ७-६ असा विजय मिळवून कांस्यपदक पटकावले. 

महिला गटात ज्योतीला ७५ किलो वजन गटात सेमीफायनलमध्ये जपानच्या मसाको फुरुची हिच्याकडून हरल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.



ब्रिटनसह जगातील काही देशात सायबर हल्ला
ब्रिटनसह जगभरातील जवळपास शंभर देशात मोठा सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे ब्रिटनमधील आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. 

‘रॅंसमवेअरच्या’ माध्यमातून हा हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेले हॅकिंग टूल हे अमेरिकेतील ‘युएस नॅशनल सिक्‍युरिटी एजन्सी’ने तयार केल्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. 


या हल्ल्यामुळे ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणेसह आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवा देणाऱ्या ‘फेडएक्‍स’ या कंपनीवरही मोठा परिणाम झाला आहे. या हल्ल्यामुळे आतापर्यंत रशिया, युक्रेन आणि तैवानसह जगातील ५७ हजार ठिकाणी परिणाम झाला असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

सायबर हल्ल्याद्वारे एखाद्या संगणकावरील संपूर्ण माहिती ब्लॉक करून ती पूर्ववत करण्यासाठी पैशाची मागणी करण्याचा प्रकार म्हणजे ‘रॅंसमवेअर’. या प्रकारामुळे व्हायरसद्वारे संगणकीय यंत्रणा हॅक करून हॅक झालेल्या संगणकावर केवळ पैशाची मागणी करणारा संदेश दिसतो.



चीनच्या ‘ओबोर’ परिषदेत भारत गैरहजर
चीन व पाकिस्तानदरम्यानची आर्थिक मार्गिका (सीपीईसी) पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने नाराज असलेल्या भारताने बीजिंगमध्ये रविवारपासून सुरू होत असलेल्या चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ शिखर बैठकीसाठी उच्चस्तरीय प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

१४ व १५ मे रोजी होणाऱ्या या परिषदेत भारताचा महत्त्वाचा भागीदार असलेल्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह २९ देशांचे व सरकारांचे प्रमुख उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या आवडत्या प्रकल्पाबाबतच्या या परिषदेत भारताचे बहुतांश शेजारी देश सहभागी होत आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ त्यांच्यासोबत चार मुख्यमंत्री व पाच संघराज्यमंत्रीश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे उपपंतप्रधान व अर्थमंत्री कृष्णबहादूर महारा यांच्यासह बांगलादेश व मालदीवचे शिष्टमंडळ परिषदेत उपस्थित राहतील. 

जगातील महासत्तांपैकी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी व ब्रिटन यांनी त्यांचा सहभाग निश्चित केला आहे.