३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाईमध्ये भरणार 

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे घेण्यात येणारे मराठवाडा साहित्य संमेलन यंदा अंबाजोगाई येथे होणार, अशी घोषणा ११ जून रोजी अंबाजोगाई येथे झालेल्या बैठकीत मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली.


बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि मसाप यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे. 

अंबाजोगाईमध्ये १९८२ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

जिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन आयोजित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. या संमेलनात शिक्षक साहित्यिकांना अधिक वाव देण्यात येणार आहे. 

या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राजेसाहेब यांची निवड करण्यात आली. 
गतवर्षी ३८ वे मराठवाडा साहित्य संमेलन लोकरंग भूमी सोयगाव येथे भरविण्यात आले होते. 



ज्येष्ठ तेलुगू कवी नारायण रेड्डी यांचे निधन
ज्येष्ठ तेलुगू कवी, लेखक आणि ज्ञानपीठ विजेते सी. नारायण रेड्डी यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. रेड्डी हे सीनारे या नावानेच प्रसिद्ध होते. रेड्डी हे आधुनिक तेलुगू लेखक होते त्याचप्रमाणे ते बहुश्रुत कवी, तेलुगू चित्रपटाचे गीतकार, शिक्षणतज्ज्ञ होते.

रेड्डी यांच्या विविध कविता, चित्रपट संगीत, नाटकांची गाणी, गझल याच्यासह ८० साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. रेड्डी यांनी चित्रपटांसाठी ३५०० गाणी लिहिली आहेत. 

रेड्डी यांचा जन्म २९ जुलै १९३१ मध्ये करीमनगर जिल्ह्यातील हनुलजीपेटा या दुर्गम गावात झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे उर्दू माध्यमातून झाले होते. 

१९८० मध्ये ‘विश्‍वंभर’ नावाने त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांना १९७७ मध्ये पद्मश्री मिळाली होती, तर १९९२ मध्ये पद्मविभूषण देण्यात आले होते



NSE च्या नव्या प्रमुखपदी विक्रम लिमये यांची निवड
बँकर विक्रम लिमये यांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले आहे. ते १४ जुलै २०१७ रोजी पदाची सूत्रे सांभाळतील.

सध्या विक्रम लिमये BCCI च्या प्रशासक मंडळाचे (COA) सदस्य आहेत. ते NSE चे CEO जे. रविचंद्रन यांच्याकडून पदभार घेतील.


NSE ही मुंबई मध्ये स्थित भारतामधील आघाडीची स्टॉक एक्सचेंज आहे. १९९२ साली देशातील पहिली डिमॅटिकल इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज म्हणून याची स्थापना करण्यात आली.



आयएसएसएफ विश्व चषकात भारताला सुवर्णपदक 

भारताचा जितू राय अणि हीना सिद्धू यांनी आयएसएसएफ विश्व चषकात दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मिश्र गटात अंतिम फेरीत रशियाला ७-६ ने पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली, तर फ्रान्सने इराणवर विजय मिळवत कांस्यपदक पटकावले.


या आधी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी जितू आणि हीना दोन्ही पुरुष आणि महिला गटात दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत अनुक्रमे १२वे अणि ९वे स्थान मिळवले होते, त्यामुळे दोन्ही खेळाडू अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नव्हते. 

आघाडीचे आठ खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होतात. मिश्र गटात भारत पदक तालिकेत नाही. मात्र, टोकियो ऑलिम्पिक पदक स्पर्धेसाठी भारताला मंजुरी मिळाली आहे. 

भारताच्या या जोडीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी दिल्लीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. चीनचा संघ सहा पदकांसह आघाडीवर आहे. त्यात चीनने तीन सुवर्णपदके पटकावली आहेत



नदालने फ्रेंच ओपन जिंकली 
स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने २०१७ फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने अंतिम सामन्यात स्वीत्झर्लंडच्या स्टेन वावरिंका याचा पराभव केला.


या विजयासह राफेल नदाल हा कोणत्याही ग्रँड स्लॅम कार्यक्रमात १० ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा एकमेव खेळाडू झाला आहे. 

शिवाय हे त्याचे एकूणच १५ वे जेतेपद आहे, ज्यामुळे स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर नंतर तो दुसरा खेळाडू ठरला आहे ज्याने सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे.

फ्रेंच ओपन (रोनांड-गॅरोस) ही पॅरिस, फ्रान्स मध्ये स्टेड रोनांड-गॅरोस येथे आयोजित होणारी वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. या स्पर्धेची स्थापना १८९१ साली झाली.



सामाजिक कार्यासाठी इला गांधी सन्मानित
दक्षिण आफ्रिकेमध्ये सामाजिक कार्य करणार्‍या इला गांधी यांना त्यांच्या आजीवन कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. त्या महात्मा गांधी यांच्या नात आहेत.

७० वर्षीय गांधी यांना हा सन्मान १९४६ सालच्या ‘इंडियन पॅसिव रेझिस्टेंस कॅम्पेन’ च्या ७० व्या वर्धापन दिवसानिमित्त देण्यात आला आहे.



न्यूयॉर्क येथे प्रथम UN महासागर शिखर परिषद संपन्न
५-९ जून २०१७ या काळात संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे प्रथम संयुक्त राष्ट्रसंघाची महासागर शिखर परिषद (UN Ocean Conference) आयोजित करण्यात आली होती. फिजी आणि स्वीडन सरकार यांनी या परिषदेचे आयोजन केले.

“शाश्वत विकास उद्दिष्ट १४: शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी संसाधनांचे संवर्धन व शाश्वतपूर्ण वापर” याला समर्थन देण्याकरिता ही परिषद आयोजित करण्यात आली.

परिषदेत सर्व सदस्य देशांनी महासागराचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करण्याची शपथ घेतली आणि त्यामधून जगभरात सागराचे संरक्षण करण्यासाठी १३०० प्रकारांची कार्ये चालवली जाण्याबद्दल शपथ घेण्यात आली.

वाढत्या महासागरातील प्रदूषणाने होणारे विपरीत परिणाम याविषयी जगभर जागृती निर्माण करण्यात येत आहे. परिषदेत महासागरातील प्रदूषणाचे चक्र बदलण्याविषयी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

परिषदेत १४  ठळक मुद्द्यांचे ‘कॉल ऑफ अॅक्शन’ दस्तऐवज अंगिकारण्यात आले आहे. 
दस्तऐवजात स्पष्ट केलेले मुद्दे हे शाश्वत विकासावरील संयुक्त राष्ट्रसंघाचे उच्च स्तरीय राजकीय मंच (HLPF) चे भाग आहेत. 

HLPF हे केंद्रीय मंडळ सप्टेंबर २०१५ मध्ये अंगिकारलेल्या शाश्वत विकास आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये (SDGs) साठीच्या २०३० अजेंडाच्या आढाव्यासाठी आणि देखरेखीसाठी आहे.