माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा धावणार
पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत बंद झालेली नेरळ-माथेरान दरम्यानची मिनी ट्रेन सेवा वर्षभरानंतर पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. 


माथेरान येथून नेरळ येथे जात असलेल्या मिनी ट्रेनचे प्रवासी डब्बे एकाच आठवडय़ात दोन वेळा नॅरोगेज रुळावरून खाली उतरले होते. त्यानंतर लगेच प्रवाशांच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत नेरळ-माथेरान ही घाटात धावणारी मिनी ट्रेन सेवा गेल्या ९ मे २०१६ रोजी बंद करण्यात आली. तेव्हापासून ही रेल्वेसेवा खंडित होती.

रेल्वेसेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्यानंतर याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. यानंतर रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. 



सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश पी एन भगवती यांचे निधन
सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश आणि पद्मविभूषण पी एन भगवती यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. २००७ मध्ये केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

देशातील ख्यातनाम वकीलांमध्ये पी एन भगवती यांचा समावेश होता. प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती असे त्यांचे पूर्ण नाव होते. 

जनहित याचिकांसाठी ते नेहमीच चर्चेत असायचे. भारतीय न्यायव्यवस्थेत जनहित याचिकेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते. 

भगवती यांनी गुजरात हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम केले होते. यानंतर १९७३ मध्ये ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून आले. १२ जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ या कालावधीत ते सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते. गुरुवारी दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 



इस्रो बनवतेय केरोसीनवर चालणारे सेमी-क्रायोजेनिक इंजिन
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) दिवसेंदिवस यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. याच इस्रोने आता आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. इस्रोकडून सध्या प्रक्षेपकासाठीचे सेमी-क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्याचे काम सुरू आहे. 

या इंजिनामध्ये इंधन म्हणून रिफाईंड केरोसीनचा वापर करण्यात येणार आहे. अन्य पारंपरिक इंधनांच्या तुलनेत रिफाईंड केरोसीन हे अधिक पर्यावरणपूरक समजले जाते. याशिवाय किंमत आणि साठवणुकीच्यादृष्टीने केरोसीन किफायतशीर आहे. केरोसीनचा वापर केलेल्या या सेमी-क्रायोजेनिक इंजिनाची पहिली चाचणी २०२१ पर्यंत पार पडू शकते.

सध्या इस्रोकडून प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेमी-क्रायोजेनिक इंजिनांमध्ये लिक्विड फ्युएलचा वापर केला जातो. केरोसिन हे लिक्विड फ्युएलपेक्षा हलके असते. तसेच सामान्य तापमानात केरोसिन साठवले जाऊ शकते. 

सध्या वापरण्यात येणारे लिक्विड ऑक्सिजन व लिक्विड हायड्रोजनच्या मिश्रणाचे वजन केरोसीनपेक्षा जास्त आहे. तसेच हे मिश्रण उणे २५३ अंश या तापमानाला साठवावे लागते. त्यामुळे केरोसीनचा इंधन म्हणून वापर केल्यास या समस्या सुटू शकतात. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने २००८ साली सेमी-क्रायोजेनिक इंजिनाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यावेळी या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत १७९८ कोटी इतकी होती.



पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाचशे रुपयांची नवी नोट बाजारात आणणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटांवर ए हे इनसेट अक्षर असणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्यावरही पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिया टुडेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

रिझर्व्ह बँकेकडून आता चलनात आणल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांची रचना सध्या चलनात असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांसारखीच असणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा महात्मा गांधी (नव्या) मालिकेतील असणार आहेत.



भारताने हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द केला
भारताने अमेरिकेसोबतचा साडे सहा कोटींचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे. अमेरिकेकडून १६ हेलिकॉप्टरची खरेदी केली जाणार होती. 

अमेरिकेतील विमान निर्मिती कंपनी सिकोरस्की एयरक्राफ्टकडून भारत १६ हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधीच भारताने हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला आहे. 

संरक्षण मंत्रालयाने संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेलिकॉप्टर खरेदीचा करार गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. यादरम्यान हेलिकॉप्टरच्या किमतीवरुन बऱ्याचदा वाटाघाटी झाल्या होत्या. अमेरिकीची विमान निर्मिती क्षेत्रातील कंपनी सिकोरस्कीने या कराराचा कालावधी वाढवण्यास नकार दिला. त्यामुळेच भारताने हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला.



थेरेसा मे यांच्याकडून मंत्रिमंडळाची नेमणूक
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी निवडणुकीनंतर आपले नवे मंत्रिमंडळ नेमले असून त्यात मूळ भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांचे कॅबिनेट मंत्रिपद कायम राहिले आहे. 

त्या मंत्रिमंडळातील सर्वात वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय विकास हे खाते आहे. हे खाते ब्रेग्झिटची प्रक्रिया सुकर करेल.

पाकिस्तानी वंशाचे साजिद जावेद यांच्यावडे सामाजिक व स्थानिक प्रशासन विभागाची जबाबदारी कायम आहे.