पिंपरी चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’ अभियानात समावेश 
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या देश पातळीवरील तिसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी ट्‌विटद्वारे याबाबत माहिती दिली.


स्मार्ट सिटी अभियानाच्या तिसऱ्या फेरीत ३० शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. 

स्मार्ट सिटी अभियानात सुरवातीला पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर यांचा एकत्रित प्रस्ताव पाठविला होता. मात्र, दोन्ही शहरे वेगवेगळी असल्याने पुणे शहराचा योजनेत समावेश केला. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

स्मार्ट सिटीबाबतचा प्रस्ताव ३१ मार्चला महापालिकेने केंद्र सरकारकडे सादर केला होता. या प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून महापालिकेला पाच वर्षांत ५०० कोटी, राज्य सरकारकडून २५० कोटी, तर महापालिका स्वहिस्सा रक्कम ३९९ कोटी असा निधी उपलब्ध होणार आहे.



लंडन मराठी संमेलन २०१७
महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५ व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त लंडन मराठी संमेलन २०१७ थाटामाटात साजरा करण्यात आला. यात ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ च्या विश्वस्त समितीचे आणि सभासदांचे विशेष आभार मानण्यात आले.

महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ८५ व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त, लंडन मराठी संमेलन २०१७ आजोजित करण्यात आले होते. 

लंडन मराठी संमेलन (एलएमएस २०१७) ची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्रीयन उद्योजक परिषदेने सुरुवात झाली ज्याच्यात १५० होऊन अधिक उद्योजक वेगवेगळ्या देशातून उपस्थित होते.



भारतातील पहिले अंडरवॉटर मेट्रो टनलचे काम पूर्ण 

हुगली नदीखाली सुरु असलेले बोगद्याचे काम पुर्ण झाले असून लवकरच या मार्गावरुन मेट्रो धावताना दिसणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे.


कोलकातामध्ये ही मेट्रो धावताना दिसणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून हावडा आणि कोलकाताला मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. या मार्गावर नदीखालून धावणारी मेट्रो पाहायला मिळणार आहे. 

कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने या मार्गाचे बंधकाम केले आहे. या कामगिरीसोबतच भारत काही ठराविक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. 

१९८४ मध्ये देशातील पहिली मेट्रो धावल्यानंतर कोलकाताने मिळवलेले हे दुसरे महत्वाचे यश आहे. कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या टीमने त्यांनी हे अंडरवॉटर टनलचे काम पुर्ण केले आहे. या टीममध्ये परदेशातील अभियंत्यांचाही समावेश आहे



साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार ल.म. कडू यांना जाहीर
मराठी साहित्यासाठीचा यंदाचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार ल.म. कडू यांना तर युवा पुरस्कार राहुल कोसंबी यांना जाहीर झाला.

कडू यांना ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीसाठी तर कोसंबी यांना ‘उभा आडवा’ या निबंधासाठी पुरस्कार मिळाला.

ताम्रपत्र व ५० हजार रुपये रोख असे या पुरस्कारांचे स्वरूप असून १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात ते प्रदान करण्यात येतील.

कोकणी भाषेतील युवा पुरस्कार अमेय विश्राम नाईक यांना (मोग डॉट कॉम हा काव्यसंग्रह) आणि विन्सी क्वाड्रोस यांना (जादूचे पेतुल कादंबरी) बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

अकादमीचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत २४ भाषांमधील साहित्याची बालसाहित्य पुरस्कार व युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.



इस्रोकडून एकावेळी तब्बल ३१ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज (शुक्रवार) “पीएसएलव्ही सी-३८’ च्या सहाय्याने तब्बल ३१ उपग्रह अवकाशात सोडले. श्रीहरीकोटा येथील ‘सतीश धवन अवकाश केंद्रा’वरुन आज सकाळी हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्हीचे हे तब्बल ४० वे उड्डाण आहे.

प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपैकी कार्टोसॅट-२ हा उपग्रह सर्वांत महत्त्वाचा आहे. इस्रोचे अध्यक्ष ए एस किरण कुमार यांनी या यशाबद्दल इस्रोमधील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्व उपग्रह अवकाशात सोडण्यात आल्यानंतर पीएस-४ या वाहनास तब्बल १० वेळा अवकाश कक्षा पूर्ण कराव्या लागतील. प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३१ उपग्रहांबरोबरच इतर दोन ‘पेलोड’ ही अवकाशात सोडण्यात आले आहेत. अवकाशात काही ‘प्रयोग’ करण्यासाठी हे पेलोड सोडण्यात आहेत.

या उपग्रहांमध्ये तब्बल १४ देशांच्या २९ ‘नॅनो उपग्रहां’चा समावेश आहे. यामध्ये 
ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिले, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.

या उपग्रहांसमवेतच कार्टोसॅट-२ई हा उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आला आहे. कार्टोसॅट-२ई हा ‘पृथ्वी निरीक्षणा’साठी अवकाशात सोडण्यात आला आहे. ७१ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह कार्टोसॅट-२ या उपग्रहांच्या मालिकेमधील सहावा उपग्रह आहे.

याशिवाय, तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यामधील नूरुल इस्लाम विद्यापीठामधील विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक उपग्रहही याचवेळी अवकाशात सोडण्यात आला आहे.



कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी
कर्नाटक राज्यातील शेतकरी मोठ्या आथिक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. ही कर्जमाफी तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पीक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सरकारी बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या २२ लाख २७ हजार ५०६ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांवर असलेले २० जूनपर्यंतचे सुमारे ५० हजार रुपयांपर्यंतचे पीककर्ज /अल्पमुदत कर्ज माफ केले जाणार आहे.




नासाकडुन सर्वात छोट्या उपग्रहाचे प्रक्षेपण 

तामिळनाडूतील विद्यार्थ्यांच्या एका संघाने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात छोट्या उपग्रहाचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे वजन केवळ ६४ ग्रॅम आहे.


तामिळनाडूच्या पल्लापट्टी येथील रिफथ शारुक या विद्यार्थ्याने नासासाठी जगातील सर्वात छोटा आणि हलका उपग्रह तयार केला होता. त्याचे प्रक्षेपण करून रिफथ व त्याच्या सहकाऱ्यांनी जागतिक अंतराळ क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला.

‘कलामसॅट’ असे या उपग्रहाचे नाव आहे. भारताचे मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून ते ठेवण्यात आले होते. 

२१ जून रोजी नासाचे रॉकेट या उपग्रहासह अंतराळात झेपावल्यानंतर इतिहास घडला. भारतीय विद्यार्थ्यांचा अंतराळ प्रयोग नासाने स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ होती.



२०५० मध्ये जगाची लोकसंख्या असेल ९.८ अब्ज !
जगामधील एकूण लोकसंख्या २०५० पर्यंत तब्बल ९.८ अब्ज इतकी होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. जगाची लोकसंख्या सध्या ७.६ अब्ज इतकी आहे.

याचबरोबर, २०२४ पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल, असेही या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

२०५० पर्यंत नायजेरिया हा अमेरिकेस मागे टाकून जगातील तिसरा सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल

दरवर्षी जागतिक लोकसंख्येत सुमारे ८.३ कोटींची भर पडत आहे. यामुळे प्रजोत्पादनाचा घटणारा दर विचारात घेऊनही २०३० पर्यंत जगाची लोकसंख्या ८.६ अब्ज, २०५० पर्यंत ९.८ अब्ज, तर २१०० पर्यंत ११.२ अब्ज इतकी असेल

नायजेरियामधील लोकसंख्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. याशिवाय २०५० पर्यंत आफ्रिकेमधील २६ देशांमधील लोकसंख्या वाढीचा वेग ‘किमान दुप्पट’ झाला असेल

सध्या जगातील वृद्ध नागरिकांची संख्या ९६.२ कोटी इतकी आहे. २०५० पर्यंत ती २.१ अब्ज, तर २१०० मध्ये ती ३.१ अब्ज इतकी असेल