पहिले चक्रीवादळ निवारा केंद्र कोकणात
चक्रीवादळ, पुरापासून रक्षण करण्यासाठी किनारी भागात ‘सायक्‍लॉन शेल्टर’ उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोकणातील पहिले सायक्‍लॉन शेल्टर सैतवडे (ता. रत्नागिरी) येथे उभारले जाणार आहे. त्यासाठी पावणे चार कोटी खर्च अपेक्षित आहे. 


राज्यातील मान्यता मिळालेल्या २९ चक्रीवादळ निवारा केंद्रांपैकी चार केंद्रे रत्नागिरीत उभारण्यासाठी जागांचा शोध सुरु आहे.

पाचशे लोक राहतील अशी त्याची क्षमता आहे. अधिक लोक आलेच तर त्या इमारतीच्या छपराचा उपयोग करता येईल. इमारत उभी करताना चक्रीवादळाबरोबरच पुराचा धोका लक्षात घेतला जातो. त्यासाठी ओडिशातील शेल्टरच्या धर्तीवर रत्नागिरीत इमारत उभारली जाणार आहे.

ओडीशात २००० पूर्वी चक्रीवादळाने थैमान घातले होते. त्यामध्ये उध्वस्त झालेल्या नागरिकांच्या निवाऱ्याची सोय नव्हती. त्यावेळी केंद्र सरकारने चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. 
पहिल्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमध्ये केंद्र उभारली. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यांचा समावेश आहे. 

जागतिक बॅंकेच्या साह्याने नॅशनल सायक्‍लोन रिस्क मिटींग प्रोजेक्‍ट (एनसीआरएमपी) अंतर्गत हा कार्यक्रम राबविला जात आहे. जागतिक बॅंकेचा ७५ तर २५ टक्के राज्य सरकारचा वाटा आहे. चक्रीवादळात शाळा आणि इतर संस्थांचा तात्पुरत्या सुविधांसाठी वापर केला जातो. तो आता बंद केला जाणार आहे.



सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रसिक हजारे यांचे निधन
मान्यवर गायकांना साथ करणारे सतारवादक आणि अखंड उत्साहाचा झरा म्हणून ओळख असलेल्या पंडित रसिक हजारे (वय५८) यांचे आज (बुधवार) पहाटे आकस्मिक निधन झाले.

भारतरत्न पंडित रविशंकर आणि शमीम अहमद खान यांचे शिष्य रसिक हजारे हे मद्रास विश्व विद्यालयाचे एम फिल होते. मुंबई विश्व विद्यालय, नाथीबाई विश्व विद्यालयात तसेच डोंबिवली येथील ‘रसिक संगीत विद्यालय येथे त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना सतारवादनाचं मार्गदर्शन केले. 

स्वरतीर्थं सुधीर फड़के स्मृति समिति डोंबिवलीचे ते गेली ३ वर्षे विश्वस्त होते. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालेला ‘राग रंग गीत बंध’ हा कार्यक्रम खूप गाजला.



इस्रो शुक्रवारी अवकाशात सोडणार ३१ उपग्रहजीएसएलव्ही एमके-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आता येत्या शुक्रवारी ‘पीएसएलव्ही’च्या सहाय्याने तब्बल ३१ उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

या उपग्रहांमध्ये तब्बल १४ देशांच्या २९ ‘नॅनो उपग्रहां’चा समावेश आहे. या उपग्रहांसमवेतच इस्रो कार्टोसॅट-2ई हा उपग्रहही प्रक्षेपित करणार आहे. कार्टोसॅट-२ई हा ‘
पृथ्वी निरीक्षणा’साठी अवकाशात सोडण्यात येणार आहे. 

७१२ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह कार्टोसॅट-२ या उपग्रहांच्या मालिकेमधील सहावा उपग्रह आहे.

याशिवाय, तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यामधील नूरुल इस्लाम विद्यापीठामधील विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक उपग्रहही याचवेळी अवकाशात सोडण्यात येणार आहे.

यावेळी ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिले, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचे उपग्रह इस्रो प्रक्षेपित करणार आहे.



अमिताभ बच्चन जीएसटीचे ब्रँड अँबेसिडर
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) ब्रॅंड अँबेसिडर म्हणून काम पाहणार आहेत. 

जीएसटीच्या प्रबोधनात्मक प्रचार करण्याची जबाबदारी बच्चन यांच्यावर सोपविली आहे. केंद्रीय उत्पादनशुल्क व सीमा शुल्क (सीबीडीटी) विभागाने याबाबत माहिती दिली. 

बच्चन यांच्यासोबत ४० सेकंदांची जाहिरातीचे याआधीच चित्रीकरण करण्यात आले आहे. या आधी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू जीएसटीची ब्रॅंड अँबेसिडर होती. 



देशातल्या पहिल्या ट्रेडमार्कचा दर्जा मुंबईतील ताजला
गेट वे ऑफ इंडियाजवळच्या ‘ताज महाल पॅलेस’ हॉटेलच्या बिल्डिंगला ‘ट्रेडमार्क’चा दर्जा मिळाला आहे. ११४ वर्षं जुनी असलेली ताजमहाल पॅलेस हॉटेलची बिल्डिंग ट्रेडमार्क लाभलेली भारतातील एकमेव वास्तू आहे.

एखाद्या ब्रँडचा लोगो, एखादी विशिष्ट रंगसंगती, सांख्यिकी अशा गोष्टींचे बऱ्याचदा ट्रेडमार्क होत असतात. न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचा आयफेल टॉवर, सिडनीचे ऑपेरा हाऊस या ट्रेडमार्क असलेल्या वास्तूंच्या पंगतीत आता मुंबईतला ताज महाल पॅलेसही जाऊन बसला आहे. 

भारतात ट्रेडमार्क अ‍ॅक्ट १९९९ पासून लागू करण्यात आला आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर पहिल्यांदाचा मुंबईतल्या ताजमहाल पॅलेस या हॉटेलच्या बिल्डिंगला ट्रेडमार्कचा दर्जा देण्यात आला आहे. 

ताज महाल पॅलेस हॉटेलमधल्या वास्तूरचनेचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आम्ही ट्रेडमार्कचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केल्याचंही ताजमहाल पॅलेस चालवणाऱ्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे जनरल काऊन्सिल राजेंद्र मिश्रा म्हणाले आहेत.



२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा
निरोगी आरोग्यासाठी योगा हा सगळ्यात रामबाण उपाय आहे. योगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राजकीय नेते तसंच सेलिब्रेटीही पुढाकार घेतात. योगाचा हा प्रचार आणि प्रसार सध्या चालू आहे. 

पण विशेष म्हणजे जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होण्याचे संपूर्ण श्रेय हे भारताला जाते. भारतातील ५००० वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते, असे जाणकार सांगतात. 

योगाची हीच प्राचीन परंपरा जपायला हवी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊल उचलली होती. नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला लगेचच तीन महिन्यांनंतर मान्यता देण्यात आली होती.