राज्यातील महिला उद्योजकांना राष्ट्रीय पुरस्कार 
संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या कमल कुंभार (उस्मानाबाद), हर्षिनी कन्हेकर (नागपूर) व संगीता कांबळे (सातारा) या तीन महिलांना ट्रान्सफॉर्मिंग वूमन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. 


केंद्रीय वस्त्रोद्योग व माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत, विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी बाजवणार्‍या 12 महिलांना पदक व प्रमाणपत्रासह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या हिंगलजवाडी येथील ग्रामीण महिला उद्योजक कमल कुंभार यांनी स्वयम् शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेमार्फत उद्योगविषयक प्रशिक्षण घेतल्यावर अवघ्या दोन हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून बांगड्यांचा व्यवसाय सुरू केला. आपल्या प्रशिक्षणाचा लाभ त्यांनी आसपासच्या 4 हजार ग्रामीण महिलांना दिला आणि त्यांनाही उद्योजक बनवले. ऊर्जा सखी म्हणूनही त्या कार्यरत आहेत. ग्रामीण भारतातील विशेष कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.

नागपूरच्या हर्षिनी कन्हेकर या देशातील पहिल्या महिला फायर फायटर आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय फायर सर्व्हिस महाविद्यालयाच्या 46 वर्षांच्या इतिहासात त्या पहिल्या महिला विद्यार्थिनी आहेत. आयुष्यात करिअरसाठी वेगळे क्षेत्र निवडून अन्य महिलांसमोर त्यांनी आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे. श्रीमती कन्हेकर फायर फायटिंग क्षेत्रात अत्यंत उत्साहाने काम करीत असल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली.

सातारा जिल्ह्यातील संगीता कांबळे या देशातल्या शेळ्यांच्या पहिल्या डॉक्टर आहेत. माणदेशी फाउंडेशनतर्फे प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्ह्यात त्यांनी शेळीसमूहाची सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेमुळे आज शेळी डॉक्टर म्हणून अनेक महिला काम करीत आहेत. या वेगळ्या प्रयोगाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.



विदर्भातील सर्वात उंच तिरंग्याच्या प्रस्तावाला नगरपरिषदेची मंजुरी
शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (206 फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 

देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नगरपरिषदेने स्वीकारली आहे. त्यात पालिका होमगार्ड, एनसीसी बटालियनची मदत घेऊ शकते.

लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून हा राष्ट्रध्वज लावला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी खासदार निधीतून 52 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

तसेच याला प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाली असून सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी हा विषय पटलावर आणला. त्याला सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवून ठराव मंजूर केला.



भारत सर्वाधिक दुचाकींचे उत्पादन करणारा देश
दुचाकी उत्पादनांच्या निर्मितीत भारताने चीनला मागे टाकले आहे. 

2016-17 या कालावधीत भारताने चीनपेक्षा अधिक दुचाकींचे उत्पादन केले. 

चीनच्या तुलनेत भारताने 9 लाख अधिक दुचाकींची निर्मिती केली आहे. 

चीनला मागे टाकत भारत सर्वाधिक दुचाकींचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. 



भारताच्या नियंत्रक महालेखापरीक्षकपदी राजीव महर्षी
केंद्र सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले असून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक-महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती केली आहे. तर सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

गृह सचिव पदाचा 31 ऑगस्ट रोजी राजीनामा देणारे राजीव महर्षी आता कॅगचे प्रमुख राहतील. ते शशिकांत शर्मा यांची जागा घेतील. ते 1978च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्याचबरोबर डेप्यूटी कॅगपदी रंजनकुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

तसेच आयएएस अधिकारी सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्तीपदी नेमण्यात आले आहे. तर अनिता करवाल यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राजीवकुमार यांना अर्थ सेवा विभागाचे सचिव तर आशा राम सिहाग यांना अवजड उद्योग विभागाचे सचिव म्हणून नेमले आहे.




राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा 1 सप्टेंबर रोजी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये राज्यातील प्राथमिकच्या 17 व माध्यमिकच्या 8 अशा एकूण 25 शिक्षकांचा समावेश आहे. 

2016-17 या वर्षात मुंबईचे नागोराव तायडे व तृप्ती हातिस्कर यांची निवड झाली आहे़.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये प्राथमिक विशेष शिक्षक पुरस्कार अर्चना दळवी आणि सुरेश धारराव यांना जाहीर झाला. 

तसेच माध्यमिक विभागामध्ये माध्यमिक विशेष शिक्षक पुरस्कार मीनल सांगोले यांना जाहीर झाला.



शाळांना स्वच्छता विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार
मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे वर्ष 2016-17 साठी देशभरातील सर्व सरकारी शाळांसाठी स्वच्छता विद्यालयाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 

स्वच्छतेच्या आदर्श मानदंडांची कसोशीने अमलबजावणी करणा-या देशातल्या 172 शाळांचा या स्पर्धेत पुरस्कार व प्रशस्तीपत्राने सन्मान करण्यात आला. 

तसेच पुरस्कारप्राप्त शाळांमधे महाराष्ट्रातल्या 15 शाळांचा समावेश आहे.

मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विजेत्या शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

देशभरातल्या 2 लाख 68 हजार शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विजेत्या शाळांना मिळालेल्या पुरस्काराचे 50 हजार रुपये व प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे. 

देशातील 3 राज्ये, 11 जिल्हे व 172 शाळांना स्वच्छतेबाबत विशेष परिश्रम घेतल्याबद्दल या सोहळयात गौरवण्यात आले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्‍समध्ये सहभागी होणार
3 ते 5 सप्टेंबर रोजी चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्‍स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने शियामेन दौऱ्याची माहिती देण्यात आली. 

डोकलामवरून निर्माण झालेला भारत-चीन यांच्यातील वाद 28 ऑगस्ट रोजी सैन्य माघारीच्या निर्णयानंतर निवळलेला असताना मोदींच्या चीन दौऱ्याची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चीन अध्यक्षाच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या ब्रिक्‍स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनच्या फजियान प्रांतातील शियामेन येथे जाणार आहेत. 

चीन दौरा आटोपल्यानंतर मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमार देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. म्यानमारचे अध्यक्ष यू थिन क्वा यांच्या निमंत्रणावरून मोदी जात आहेत. 

तसेच पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच द्विपक्षीय म्यानमार दौरा आहे. यापूर्वी 2014 मध्ये असियान शिखर संमेलनासाठी म्यानमारला गेले होते. या दौऱ्यादरम्यान मोदी स्टेट काऊन्सिलर डॉ आंग सान सू की यांच्यामवेत चर्चा करणार आहेत.



उत्तर कोरियाने जपानवरून क्षेपणास्त्र चाचणी घेतली 
उत्तर कोरियाने राजधानी प्यांगयांगहून सोडलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र थेट जपानच्या भूमीवरून झेपावत उत्तर पॅसेफिक महासागरात जाऊन कोसळळे. 

अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या जपानवरूनच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र सोडल्याने या भागात तणाव वाढण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी दूरध्वनीवरून चाळीस मिनिटे चर्चा केली. 

अमेरिकेच्या व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने उत्तर कोरियावर दबाव वाढविला जाणार असल्याचे ऍबे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राने 2700 किलोमीटरचा प्रवास केला. 

जपानच्या उत्तरेकडून होकाईदो बेटावरून पहाटे सहा वाजून दोन मिनिटांनी साधारणपणे 550 किलोमीटर उंचीवरून हे क्षेपणास्त्र झेपावले. 

तसेच या क्षेपणास्त्राचा वेग ताशी बारा हजार किलोमीटर इतका अफाट होता.