राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष संभाजी म्हसे यांचे निधन
राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती संभाजी म्हसे पाटील यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या होत्या. उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. 


संभाजी म्हसे यांनी औरंगाबाद आणि मुंबई उच्च न्यायालयात न्यायमुर्ती म्हणून काम पाहिले. निवृत्त झाल्यानंतर ते ग्राहक मंचाचे अध्यक्ष होते. 

राज्य सरकारने ४ जानेवारी २०१७ ला राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली होती.



शिरीष पै यांचे मुंबईत निधन
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. शिरीष पै या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. 

शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. 

त्यांच्या ‘एका पावसाळ्यात’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचे ‘केशवसुत’ पारितोषिक, ‘हायकू’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक

कवितासंग्रह : कस्तुरी, एकतारी, आईची गाणी, एका पावसाळ्यात, ध्रुवा, गायवाट, हायकू, ऋतुचित्र, विराग. 

कथासंग्रह : चैत्रपालवी, सुखस्वप्न, मयूरपंख, मंगळसूत्र, हापूसचे आंबे, खडकचाफा, कांचनबहार, संधि प्रकाश, लव्हली, लग्न, जुनून, ह्रदयरंग, प्रणयगंध. 

कादंबरी : माझे नाव आराम, लालन बैरागीण, हेही दिवस जातील. 

ललितलेखसंग्रह : आतला आवाज, आजचा दिवस.


व्यक्तिचित्र : पपा, प्रियजन, वडिलांच्या सेवेसी.

नाटक : हा खेळ सावल्यांचा, कळी एकदा फुलली होती, झपाटलेली.

वृत्तपत्रलेखन : पुस्तक परीक्षणे, मुलाखती, वाड्‌मयीन, अग्रलेख.

संपादन : ‘नवयुग’ साप्ताहिक (१९५६ ते १९६०), दैनिक ‘मराठा’ वाड्‌मयीन पुरवणी (१९६१ ते १९६९), दैनिक ‘मराठा’ (१९६९ ते १९७६).



मंत्रिमंडळ विस्तार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासोबत अनेक खात्यांमध्ये खांदेपालटही केला. ३ सप्टेंबर २०१७ रोजी नवी जबाबदारी घेतलेल्या व्यक्तींचा शपथविधी कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे.

त्यानुसार, निर्मला सितारामन यांच्याकडे संरक्षण तर पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयाबरोबर कौशल्य विकास मंत्रालयाचा कार्यभार आला, तर मुख्तार अब्बास नकवींकडील अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाला कॅबिनेट दर्जा बहाल करण्यात आला आहे.

नितीन गडकरी यापुढे परिवहन व नौकानयन मंत्रालयाखेरीज उमा भारती यांच्याकडील जल संसाधन, नदी विकास तथा गंगा संरक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहतील. 
उमा भारती यापुढे फक्त स्वच्छता व पेयजल विभागाचे आणि नरेंद्रसिंग तोमर हे ग्रामविकास व खाण मंत्रालयाचे काम पाहतील.

रेल्वे मंत्रालयातून पदमुक्त झालेल्या सुरेश प्रभूंकडे आता उद्योग व वाणिज्य मंत्रालय सोपविले आहे. स्वतंत्र प्रभाराच्या राज्यमंत्र्यांमध्ये राजवर्धनसिंह राठोड यांच्याकडे क्रीडा, गिरीराजसिंग यांच्याकडे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, आर. के. सिंग यांच्याकडे ऊर्जा व वैकल्पिक ऊर्जा स्रोत, हरदीपसिंग पुरींकडे नगरविकास व गृहनिर्माण, व अल्फोन्स कन्नाथनम यांच्याकडे पर्यावरण व पर्यटन विभाग स्वतंत्र कार्यभारासह सोपविला आहे. 

राज्यमंत्र्यांमध्ये सत्यपाल सिहांकडे मनुष्यबळ विकास, जल संसाधन व नदी विकास, शिवप्रताप शुक्लांकडे वित्त, वीरेंद्रकुमारांकडे महिला व बालविकास, अनंत हेगडेंकडे कौशल्य विकास, अश्विनी चौबेंकडे आरोग्य व कुटुंब कल्याण तर गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद आले आहे. राज्यसभा सदस्य विजय गोयल यांच्याकडे संसदीय कार्य विभागाचे राज्यमंत्रिपद सोपविले गेले

नव्या राज्यमंत्र्यामधे ज्या ४ निवृत्त नोकरशहांचा समावेश आहे, त्यात हरदिपसिंग पुरी १९७४ च्या बॅचचे आयएफएस व संयुक्त राष्ट्रासह अनेक देशांचे माजी राजदूत आहेत. सत्यपालसिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते. अल्फोन्स कन्नाथनम १९७९ बॅचचे आयएएस अधिकारी तर आर.के.सिंग हे पूर्वी गृह व संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव होते.
यापैकी अल्फोन्स व पुरी हे दोघे सध्या संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत

सहा जणांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. यात केंद्रीय MSME मंत्री कलराज मिश्रा, कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा समावेश आहे. मंत्री परिषदेत नऊ नव्या व्यक्तींना समाविष्ट करण्यात आले आहे.


राजीव कुमार NITI आयोगाचे नवे उपाध्यक्ष
प्रसिद्ध अर्थतज्ञ राजीव कुमार यांची बदलत्या भारताची राष्ट्रीय संस्था (NITI) आयोग या भारताच्या वैचारिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय वंशाचे अर्थतज्ञ अरविंद पानगरीया यांच्या जागी कुमार यांची नियुक्ती केली गेली आहे.

कुमार हे धोरण संशोधन केंद्र (CPR) चे वरिष्ठ फेलो होते. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि लखनौ विद्यापीठातून शिक्षण घेतलेले आहे. या नियुक्तीपूर्वी त्यांनी FICCI चे महासचिव म्हणून काम केले होते. ते वर्ष २००६-२००८ या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य होते.






आसाम संपूर्ण राज्य ६ महिन्यांसाठी ‘अशांत क्षेत्र’ घोषित
आसाम राज्य सरकारने २ सप्टेंबर २०१७ पासून ६ महिन्यांसाठी संपूर्ण राज्याला ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.

राज्य गृह आणि राजकीय विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम १९५८ अंतर्गत देण्यात आलेल्या शक्तीनुसार, राज्याचा कारभार पूर्वपदावर येईपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.
कायद्यासंदर्भात 

सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम (AFSPA) १९५८ हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे, ज्यामधून ‘अशांत क्षेत्र’ घोषित केल्यास भारतीय सशस्त्र दलाला विशेष अधिकार प्रदान केले जातात. 

‘अशांत क्षेत्र (विशेष न्यायालय) अधिनियम १९७६’ नुसार एखाद्या क्षेत्राला ‘अशांत’ घोषित केल्यास, त्या क्षेत्राला किमान तीन महिन्यांत परिस्थिती सांभाळता यायला हवी. 

भारत छोडो आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी १५ ऑगस्ट १९४२ रोजी सशस्त्र दल विशेषाधिकार अध्यादेश लागू केला होता.



हॉकी इंडियाने मुख्य प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स यांना पदावरून काढले
हॉकी इंडियाने राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ष २०१६ आणि वर्ष २०१७ मध्ये अप्रभावी कामगिरी दर्शवल्या प्रकरणी पदावरून काढले आहे.

पुरुष संघासाठी नव्या प्रशिक्षकाची निवड होईपर्यंत डेव्हिड जॉन हे कारभार सांभाळणार आहेत.


रोएलंट ओल्टमन्स हे नेदरलँडचे डच हॉकी प्रशिक्षक आहेत. त्यांची हॉकी इंडियाच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती.



उत्तर कोरियाकडून सहावी अणुचाचणी
उत्तर कोरियाने आज सहावी अणु चाचणी घेत हायड्रोजन बॉंबचा स्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर जमिनीमध्ये निर्माण झालेली कंपने पाहता हा आतापर्यंतचा सर्वांत शक्तीशाली स्फोट असल्याचे मानले जात आहे. या चाचणीनंतर जगभरातील देशांनी उत्तर कोरियाविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.

या हायड्रोजन बॉंबची क्षमता ५० ते ६० किलोटन असण्याचा अंदाज आहे. उत्तर कोरियाने त्यांच्या सरकारी वाहिनीवर ही चाचणी यशस्वी झाल्याचे प्रसिद्ध केले. 



केनेथ जस्टर होणार अमेरिकेचे भारतातील राजदूत 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या परस्पर संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केनेथ जस्टर यांची नियुक्ती अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून केली आहे. 

केनेथ जस्टर हे सध्या अमेरिकेन पराराष्ट्र खात्याचे सल्लागार म्हणून काम करतात. रिचर्ड वर्मा यांनी जानेवारी महिन्यातच राजीनामा दिला होता. अखेर शुक्रवारी ६२ वर्षांचे केनेथ जस्टर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.