साहित्य संमेलन बडोद्यात 
आठ दिवसांच्या ‘राजकीय’ घडामोडींनंतर ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार असल्याची घोषणा महामंडळाने आज केली. संमेलन स्थळाच्या वादानंतर हिवरा आश्रमाने माघार घेतल्यानंतर बडोद्याचा एकमेव पर्याय महामंडळापुढे होता. 


अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बडोद्याला यजमानपद देण्याचा निर्णय घोषित केला. 

यापूर्वी बडोद्यात १९०९, १९२१ आणि १९३४ अशी तीन साहित्य संमेलने झाली आहेत. त्यामुळे स्वतंत्र भारतात होणारे बडोद्यातील हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल



देशातील सर्वाधिक प्रकल्प सध्या महाराष्ट्रामध्ये 
रस्ते, वीज, सिंचन आणि वाहतुकीसारख्या पायाभूत सुविधांचे देशातील सर्वाधिक प्रकल्प सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असल्याचे आणि त्यासाठी जवळपास सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती ‘निती’ आयोगाने प्रसिद्ध केली. 

महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आदी राज्ये खूप मागे पडली असताना उत्तर प्रदेशसारखे कथित मागास आणि अरुणाचल प्रदेशसारख्या सीमावर्ती राज्याने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

‘देशात एकूण ८३६७ पायाभूत प्रकल्पांची कामे चालू असून त्यापैकी महाराष्ट्रामध्ये १०९७ प्रकल्पांची कामे चालू आहे. देशातील एकूण प्रकल्पांच्या संख्येमध्ये आणि खर्चामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. या प्रकल्पांतील गुंतवणुकीचा विचार केल्यास देशामध्ये एकटय़ा महाराष्ट्राचा हिस्सा ११.८ टक्क्यांचा आहे,’ असे ‘निती’ आयोगाने नमूद केले. 

दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. तिथे ४५४ पायाभूत सुविधा प्रकल्प असून, देशातील एकूण प्रकल्प किमतीतील ७ टक्के वाटा उत्तर प्रदेशचा आहे. अरुणाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर असून, तिथे १८८ पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत. या राज्याचा वाटा देशाच्या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किमतीत ६.३ टक्के आहे. 

तमिळनाडू चौथ्या आणि गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तमिळनाडूचा वाटा ६.२ टक्के, गुजरातचा वाटा ५.७ टक्के आहे. या राज्यांच्या खालोखाल अनुक्रमे कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, राजस्थान आदी राज्यांचा क्रमांक लागतो.



राष्ट्रीय तपास पथकाच्या महासंचालकपदी वाय.सी. मोदी
वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय.सी. मोदी यांची राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एनआयएचे विद्यमान महासंचालक शरदकुमार यांची ते जागा घेतील. ३० ऑक्टोबर रोजी शरदकुमार निवृत्त होत आहेत.

२००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे झालेल्या जातीय दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. या पथकात वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय.सी. मोदी यांचा समावेश होता. 

२०१५ मध्ये त्यांची सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
तसेच सीबीआयमध्ये नियुक्तीपूर्वी त्यांनी शिलाँग येथे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.



२०१३ साठी विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कारांचे वाटप
कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्व. का.) बंडारू दत्तात्रेय यांच्या हस्ते वर्ष २०१३ साठी विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कारांचे २८ विजेते आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कारांचे ९८ विजेते होते.

विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार हा कार्यरत कामगारांनी दिलेल्या सर्वोत्तम शिफारसींसाठी दिला जातो. राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार हा दुर्घटना कमी करण्याच्या उद्देशाने औद्योगिक प्रतिष्ठाने, बांधकामाची ठिकाणे, बंदरे व AERB अंतर्गत प्रतिष्ठापना येथे पाळण्यात येणार्‍या सर्वोत्तम सुरक्षेसंबंधित कामगिरीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिला जातो. 

कामगार व रोजगार मंत्रालयातर्फे १९६५ सालापासून हे दोन्ही पुरस्कार दिले जात आहेत.



भारताचा फॉरेक्स भांडार प्रथमच $400 अब्जवर पोहचला
भारताच्या फॉरेक्स (विदेशी चलन) भांडाराने प्रथमच $400 अब्जचा आकडा पार केला आहे. भारतीय रिझर्व बँकच्या अहवालानुसार ८ सप्टेंबरला फॉरेक्स भांडारात $400.7 अब्जची नोंद झाली.

भारतीय फॉरेक्स भांडार (Foreign exchange ‘Forex’ reserves) म्हणजे भारताच्या रूपयांमधील राष्ट्रीय चलनाव्यतिरिक्त इतर देशांच्या चलनांमध्ये असलेल्या रोख रकमेत भारताच्या ताब्यात असलेली बँकांच्या ठेवी, कर्जरोखे आणि अन्य वित्तीय मालमत्ता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून हे भांडार व्यवस्थापित केले जाते.



विमल जालान यांचे ‘इंडिया: प्रायोरिटी फॉर द फ्यूचर’ प्रकाशित 
प्रसिद्ध अर्थतज्ञ बिमल जालान लिखित “इंडिया: प्रायोरिटी फॉर द फ्यूचर” पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडिया हे प्रकाशक आहेत.

डॉ. बिमल जालान हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आहेत. त्यांनी RBI मध्ये चार वर्ष सेवा दिली होती. त्यांनी वित्त सचिव आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष यासह अनेक पदांवर कार्य केलेले आहे. 

सन २००३-२००९ दरम्यान ते संसदेत नामनिर्देशित सदस्य होते.


गूगलने भारतात त्याचे ‘तेज’ अॅप सुरू केले
भारतात डिजिटल देयकांचा वाढत चाललेला कल बघता गूगल या तंत्रज्ञान कंपनीने ‘तेज’ नावाचे मोबाईल अॅप सुरू केले आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते १८ सप्टेंबर २०१७ रोजी या अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

‘तेज’ अॅप ही एक युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) देयक सेवा आहे, ज्याच्या माध्यमातून एका बँकेतून दुसर्‍या बँकेत पैसे हस्तांतरित केले जाऊ शकते.
अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्यामधून तसेच UPI ID, QR कोड आणि फोन क्रमांक याद्वारे पैसे हस्तांतरित करण्याची मुभा देते.

भारतामधील पैश्यासंबंधित देयक आणि निवारण प्रणाली ही २००७ सालच्या देयक आणि निवारण प्रणाली अधिनियम अंतर्गत कार्य करते आणि भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा याचे नियमन केले जाते.

तत्काळ देयक सेवा (Immediate Payment Service -IMPS) हा भारतीय राष्ट्रीय देयक महामंडळ (National Payments Corporation of India -NPCI) चा एक पुढाकार आहे. NPCI ही भारतातली सर्व किरकोळ देयके प्रणालीसाठी एक छत्र-कंपनी आहे. 


भारतीय रिझर्व बँक आणि इंडियन बॅंक्स असोसिएशन (IBA) च्या मार्गदर्शनाने NPCI ची स्थापना केली गेली. कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत सन २००८ मध्ये स्थापित NPCI चे मुख्यालय मुंबई येथे आहे.



जगातील सर्वात वयोवृद्ध महिला व्हायोलेट ब्राऊन कालवश
जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून ओळखल्या जाणा-या व्हायलेट मॉसे ब्राऊन (वय ११७ वर्षे) यांचे जमैकामध्ये निधन झाले.

‘आँट व्ही’ नावाने या बाई त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या वर्तुळात परिचयाच्या होत्या. त्यांचा जन्म ट्रेलॉनीत १० मार्च १९०० रोजीचा. आपले प्रदीर्घ आयुष्यही त्यांनी तेथेच घालविले. व्हायलेट यांना या वर्षी १५ एप्रिल रोजी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून जाहीर केले गेले होते.

व्हायलेट यांच्या आधी इटलीच्या एम्मा मोरॅनोंकडे हा सन्मान होता. त्यांच्या आयुष्याने १८९९ ते २०१७ अशा तीन शतकांना स्पर्श केला होता. असे दुर्मीळ भाग्य लाभलेल्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. 



कॅलिफोर्नियात ‘६९ वा प्राइम टाइम एमी पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला
१७ सप्टेंबर २०१७ रोजी कॅलिफोर्नियामधील डाउनटाऊन लॉस एंजेलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये ‘६९ वा प्राइम टाइम एमी पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. समारंभाचे संचालन स्टीफन कोल्बर्ट या अभिनेत्याने केले.

या सोहळ्यात अकॅडेमी ऑफ टेलिविजन आर्ट्स अँड सायन्सेस द्वारा निवडण्यात आलेल्या १ जून २०१६ ते ३१ मे २०१७ या काळात अमेरिकेत प्रदर्शित होणार्‍या दूरदर्शन मालिकांमधील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणार्‍यांना एमी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

‘द हँडमेड्स टेल’ ही सर्वोत्कृष्ट नाटक मालिका श्रेणीत पुरस्कार जिंकणारी पहिली वेब दूरदर्शन मालिका ठरली.

स्टर्लिंग के. ब्राउन हा सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेत्याचा एमी पुरस्कार जिंकणारा पहिला आफ्रिका वंश असलेल्या अमेरिकेचा रहिवासी ठरला आहे. त्याला हा पुरस्कार ‘धिस इज अस’ या NBC नाटक मालिकेमधील भूमिकेसाठी मिळाला आहे.

एमी पुरस्कार हा अकॅडेमी ऑफ टेलिविजन आर्ट्स अँड सायन्सेस कडून दिला जाणारा पुरस्कार आहे. हे पुरस्कार प्रथम सन १९४९ मध्ये देण्यात आले होते. हे पुरस्कार प्राइमटाइम टेलीव्हिजन प्रोग्राम, प्राइमटाइम क्रिएटिव्ह आर्ट्स आणि प्राइमटाइम इंजीनियरिंग अश्या तीन श्रेणींमध्ये दिले जातात.