ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले. त्यांना त्वचेचा कर्करोग झाला होता. 


अमेरिकी वंशाचे भारतीय अभिनेते म्हणून ओळख निर्माण केलेल्या टॉम अल्टर यांनी १९७६ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ३०० हून चित्रपटांमध्ये काम केले. 

१९९३ ते १९९७ या कालावधीत प्रसारित झालेल्या ‘जबान संभालके’ या मालिकेमुळे टॉम अल्टर घराघरांत पोचले. याशिवाय ‘शक्तिमान’, ‘कॅप्टन व्योम’सारख्या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. दूरचित्रवाणी आणि चित्रपटांशिवाय टॉम अल्टर यांनी हिंदी रंगभूमीवरही काम केले होते.

अभिनयाशिवाय लेखन आणि पत्रकारितेमध्येही टॉम अल्टर यांनी काम केले होते. ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय पदार्पण होण्यापूर्वी टॉम अल्टर यांनी त्याची मुलाखत घेतली होती. 


त्यांनी एकूण तीन पुस्तकेही लिहिली. कला आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे २००८ मध्ये केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता



केंद्र सरकारमधील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्ष
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्रीय आरोग्य सेवेशिवाय इतर डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ६५ वर्षे इतकी केली आहे. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.



श्रीनगर, रायपूर येथील विमानतळांना सर्वश्रेष्ठ विमानतळाचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या अखत्यारीत्या असलेल्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जम्मू-काश्मीर तसेच स्वामी विवेकानंद विमानतळ, रायपुर (छत्तीसगड) यांना संयुक्त रूपाने सर्वश्रेष्ठ विमानतळाचा २०१५-१६ सालचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार देण्यात आला.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते २७ सप्टेंबरला ‘जागतिक पर्यटन दिवस’ च्या निमित्ताने संस्‍कृती मंत्रालयाच्या वतीने प्रवास, पर्यटन आणि आतिथ्‍य उद्योगाच्या विविध श्रेणींमध्ये ‘राष्‍ट्रीय पर्यटन पुरस्‍कार २०१५-१६’ चे वितरण करण्यात आले.



शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०१७ 
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने विविध श्रेणीत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात दिले जाणारे ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार प्राप्त करणार्‍यांची नावे जाहीर केली.

दरवर्षी दिले जाणारे शांती स्वरूप भटनागर विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) द्वारा उल्लेखनीय व असाधारण संशोधन, अप्लाइड वा मूलभूत श्रेणीत जैवविज्ञान, रसायनशास्त्र, भूशास्त्र, पर्यावरण, सागरी व ग्रह, अभियांत्रिकी, गणिती, वैद्यकीय व भौतिक विज्ञान या क्षेत्रांमध्ये दिले जातात. 

हा पुरस्कार CSIR चे संस्थापक व प्रथम संचालक शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मरणार्थ दिला जातो. 

या पुरस्काराची सुरुवात सन १९५७ पासून केली गेली. ५ लाख रूपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जैवविज्ञान क्षेत्र : डॉ. दीपक धन्यवादप्पन नायर आणि डॉ. संजीव दास
रसायन विज्ञान क्षेत्र : डॉ. जी. नरेश पटवारी
भूशास्त्र, पर्यावरण, सागरी व ग्रह विज्ञान क्षेत्र : डॉ. एस. सुरेश बाबू
अभियांत्रिकी विज्ञान क्षेत्र : डॉ. आलोक पॉल आणि डॉ. नीलेश बी. मेहता
वैद्यकीय विज्ञान क्षेत्र : डॉ. अमित दत्त आणि डॉ. दीपक गौर
भौतिक विज्ञान क्षेत्र : डॉ. निस्सीम कानेकर आणि डॉ. विनय गुप्ता


भारताचे पाच पुरुष बॅडमिंटनपटू जागतिक क्रमवारीत अव्वल २५ मध्ये
ओपन सुपर सिरीज भारतीय बॅडमिंटनपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही भारताच्या पाच पुरुष बॅडमिंटनपटूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवले आहे. 

श्रीकांत किदांबी आणि एच. एस. प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरी गाठली. या कामगिरीमुळे त्यांनी ५०४० गुण मिळवले. श्रीकांत जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर कायम आहे. 

प्रणॉय गतवर्षी दुसऱ्या फेरीत पराजित झाला होता.पण सध्या एकोणीसावा झाला आहे. बी. साई प्रणीत सतरावा आहे, तर अजय जयराम विसावा आहे. 
समीर वर्माची प्रगती कायम आहे.त्याने चार क्रमांकाने प्रगती केली आहे. तो आता २१ वा आहे.

पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत पुन्हा जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. साईना अजूनही टॉप टेनबाहेर आहे. ती बाराव्या स्थानावर कायम आहे. 



‘प्लेबॉय’चे संस्थापक ह्यूज हेफ्नर यांचे निधन
प्लेबॉय’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रौढांसाठीच्या प्रसिद्ध मासिकाचे संस्थापक ह्यूज हेफ्नर यांचे बुधवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 

हेफ्नर यांनी १९५३ मध्ये घरातूनच प्लेबॉय प्रकाशित करायला सुरवात केली. पुढे ते प्रौढांचे सर्वाधिक खपाचे मासिक बनले. महिन्याला ७० लाख एवढ्या प्रतींचा खप झाल्याचा विक्रम या मासिकाने नोंदवला. 



फॉर्च्युन नियतकालिकाने शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली
चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अमेरिकेबाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत नव्याने स्थान मिळविले आहे. 

फॉर्च्युन नियतकालिकाने जारी केलेल्या या यादीत इंद्रा नुयी यांनी अमेरिका आवृत्तीत पहिल्या तीन महिलांत स्थान पटकावले आहे.

अमेरिकेबाहेरील जगातील सर्वांत शक्तिशाली व्यावसायिक महिला होण्याचा मान बँको सँटांडेर समूहाच्या कार्यकारी चेअरमन अ‍ॅना बोटीन यांनी पटकावला आहे. 

या यादीत आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ चंदा कोचर पाचव्या स्थानी असून, अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ शिखा शर्मा २१ व्या स्थानी आहेत.

पेप्सीकोच्या चेअरमन आणि सीईओ इंद्रा नुयी यांनी अमेरिकेतील सर्वांत शक्तिशाली महिला व्यावसायिकांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. 

पहिल्या स्थानी जनरल मोटर्सच्या चेअरमन मॅरी बारा या आहेत. तिस-या स्थानी लॉकहीड मार्टिनच्या चेअरमन व सीईओ मेरीलीन हेवसन या आहेत.