ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 


‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही मराठे यांची पहिली कादंबरी होती. दैनिक गोमंतक, दैनिक लोकसत्ता, लोकप्रभा, मार्मिक, नवशक्ती अशा नियतकालिकांमध्ये त्यांनी लिखाण केले होते. ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या संपादक मंडळातही मराठे यांचा समावेश होता. 

ह. मो. मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. सुरवातीच्या काळात त्यांनी कोल्हापूरमध्ये अध्यापनाचे काम केले. ‘साधना’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीमुळे त्यांची ओळख निर्माण झाली. १९७२ मध्ये ही कादंबरी पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाली होती. 

पाच वर्षांपूर्वी झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठे यांनी अर्ज भरला होता. ‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार’ या जुन्या लेखामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मराठे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.



शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण
शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते. शिर्डीजवळील काकडी येथे हे विमानतळ उभारण्यात आले आहे. 



मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण मोहीम
राज्यातील ९ जिल्हे व १३ महापालिका, नगरपालिका क्षेत्रांमध्ये ७ ऑक्टोबरपासून मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.  पुढील चार महिन्यांपर्यंत मोहिमे अंतर्गत ० ते २ वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. 

लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी केले.

७ ऑक्टोबरला ही मोहीम सुरू होणार असून दर महिन्याच्या ७ तारखेला ही मोहीम राबवली जाणार आहे.



पाच राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडू, बिहार, आसाम अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या पाच राज्यांसाठी राज्यपालांची आणि अंदमान, निकोबारमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे बराच काळपासून तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाल्यानंतर हे बिहारच्या राज्यपालांचे पद रिक्त होते.

बिहार विधान परिषदेचे माजी सदस्य गंगाप्रसाद यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

आसामच्या राज्यपालपदी जगदीश मुखी यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. जगदीश मुखी दिल्ली भाजपाचे नेते म्हणून ओळखले जातात.

अ‍ॅडमिरल (सेवानिवृत्त) देवेंद्र कुमार जोशी हे आता अंदमान व निकोबारचे नायब राज्यपाल असतील.

ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बी. डी. मिश्रा अरुणाचलचे राज्यपाल असतील. 
नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार पहात होते.


डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते वैश्विक वन्यजीव कार्यक्रमाचे उद्घाटन होणार
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते २ ऑक्टोबर २०१७ रोजी वैश्विक वन्यजीव कार्यक्रमाचे (GWP) उद्घाटन केले जाणार आहे.

जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) यांच्या सहाय्याने भारत ह्या कार्यक्रमाचे आयोजन करणार. याप्रसंगी १५ वर्षांसाठी राष्ट्रीय वन्यजीव कार्ययोजना (२०१७-२०३१) चे देखील अनावरण केले जाईल.

कार्यक्रमादरम्यान 19 GWP देशांतील वन्यजीव तज्ञ, चिकित्सकांची बैठकी घेतली जाणार. यामध्ये अफगाणिस्तान, बोत्सवाना, कॅमरुन, इथियोपिया, गॅबॉन, भारत, इंडोनेशिया, केनिया, मलावी, माली, मोझांबिक, फिलीपिन्स, काँगो प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका, टांजानिया, थायलंड, व्हिएतनाम, झांबिया आणि झिम्बाब्वे यांचा सहभाग असेल.

अवैध वन्यजीव व्यापाराचे धोके ओळखण्यासाठी वैश्विक वन्यजीव कार्यक्रम (GWP) जागतिक बँकेच्या नेतृत्वात राबवला जातो. हा कार्यक्रम वन्यजीवांचे संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो. २०१५ सालापासून, जागतिक बँकेने कार्यक्रमाच्या सुकाणू समितीची अध्यक्षता करत आहे



आर. के. मिश्रा – सशस्त्र सेना बलाचे महानिदेशक
रजनी कांत मिश्रा यांनी सशस्त्र सेना बल (SSB) चे महानिदेशिक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची नियुक्ती अर्चना रामासुंदरम यांच्याजागी करण्यात आली आहे.

रजनी कांत मिश्रा हे १९९२ सालचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांना २००३ साली पोलीस पदक आणि २००९ साली राष्ट्रपती पोलीस पदक मिळाली आहेत. 



ऑक्सफर्ड महाविद्यालयाने ऑंग सॅन सु की यांचे चित्र हटवले
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या महाविद्यालयामधील मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेल्या ऑंग सॅन सु की यांच्या चित्राला हटविण्यात आले आहे.

या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतलेल्या म्यानमारच्या नेत्या आणि नोबेल शांती पुरस्कार विजेत्या सु की यांच्यावर रोहिंग्या मुस्लिमांसंबंधी झालेल्या टीकेनंतर महाविद्यालयाने हा निर्णय घेतला.

सन १९६४-१९६७ या काळात सेंट ह्यूग महाविद्यालयामध्ये सु की यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. माजी आणि प्रतिष्ठित विद्यार्थी म्हणून मान मिळविल्यानंतर १९९९ सालापासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांचे चित्र टांगण्यात आले होते.



जागतिक अधिवास दिवस २ ऑक्टोबर 
जगात दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याचा पहिला सोमवार या दिवशी जागतिक अधिवास दिवस साजरा करतात. यावर्षी हा दिवस ‘हाऊसिंग पॉलिसीज: अफोर्डेबल होम्स’ या संकल्पनेखाली साजरा करण्यात येत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि उद्योगांमुळे पशुपक्ष्यांच्याच नाही तर खुद्द मानवाच्याही आवश्यक छताची आवश्यकता या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या अधिकारांची आणि मानवाला जबाबदारीची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

पहिल्यांदा हा दिवस १९८६ साली केनियाची राजधानी नैरोबीमध्ये साजरा करण्यात आला होता.

१९८९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या ह्यूमन सेटलमेंट्स प्रोग्रामद्वारे अधिवास स्क्रोल ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या हा जगातील सर्वात प्रतिष्ठित मानवी वस्तीचा पुरस्कार आहे. 

छताची तरतूद, मानवी वस्तीच्या विकास आणि शहरी जीवनशैलीची गुणवत्ता सुधारण्यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदान देणार्‍या पुढाकारांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येतो.