मंगला बनसोडे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा सर्जनशील कलेसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर (सातारा) यांना जाहीर झाला आहे. 


सोमवारी हा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जाईल.

केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. यंदा सर्जनशील कलेसाठीमंगला बनसोडे यांचा गौरव केला जाणार आहे. 




एसबीआयचे नवे अध्यक्ष रजनीश कुमार
देशातील सर्वात मोठ्या बँकेला नवा अध्यक्ष मिळाला आहे. केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी रजनीश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली.

अपॉईंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेटकडून (एसीसी) तीन वर्षांसाठी रजनीश कुमार यांना या पदावर नियुक्त केले जाणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी ते आपला पदभार स्वीकारतील.

रजनीश कुमार हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. सन १९८० मध्ये ते स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी बँकेत विविध पदांवर काम केले.

सध्या अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँकेच्या अध्यक्षा आहेत. त्यांचा कार्यकाळ ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. 
स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिल्या आहेत. सन १९७७ मध्ये त्या स्टेट बँकेत रुजू झाल्या होत्या 

भट्टाचार्य यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये या पदाची जबाबदारी सांभाळली होती. गेल्याच वर्षी सरकारने त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ दिली होती.



वैश्विक उद्योजकता शिखर परिषद २०१७ हैदराबादमध्ये आयोजित होणार
२८ ते ३० नोव्हेंबर २०१७ रोजी हैदराबादमध्ये ‘वैश्विक उद्योजकता शिखर परिषद (GES) 2017’ आयोजित केली जाणार आहे. ‘वुमन फर्स्ट, प्रोस्पेरिटी फॉर ऑल’ या संकल्पनेखाली ही परिषद भरविण्यात येत आहे. ‘महिला उद्योजक आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात महिलांनी आणलेली अभूतपूर्व क्षमता’ या विषयावर या वर्षी परिषदेचा भर असणार आहे. 

भारत आणि अमेरिका यांच्या भागीदारीने तसेच भारत सरकारच्या NITI आयोगाकडून या परिषदेचे आयोजन केले जात आहे. 

जगभरातील उदयोन्मुख उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यवसायिक प्रमुखांची ही एक वार्षिक परिषद आहे. ही परिषद उद्योजकांद्वारा विकसित अभिनव कल्पनांनी नव्या रोजगाराच्या संधि निर्माण करून, उत्पादकतेला वाढवून आणि प्रत्येक जागी लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करून जगातील अर्थव्यवस्थांचे रूप पालटण्याच्या उद्देशाने विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते.



काझुओ इशिगुरो यांना साहित्याचे नोबेल
जपानी वंशाचे इंग्रजी लेखक काझुओ इशिगुरो यांना साहित्यासाठी २०१७ नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहे.

लघुकथा, कादंबऱया, चित्रपट-टीव्ही मालिकांसाठी पटकथा अशी बहुप्रवसा लेखणी लाभलेले इशिगुरो १९८२ पासून पूर्णवेळ लेखक आहेत. ए पेल व्ह्यू ऑफ हिल्स या पहिल्या कांदबरीने इशिगुरो यांनी साहित्यप्रेमींचे लक्ष वेधले. इंग्लंडमध्ये एकटी राहणाऱया इट्स्युको या जपानी महिलेभोवती त्यांची पहिली कांदबरी फिरते.

इशिगुरो जन्माने जपानमधील नागासाकीचे. स्वाभाविकपणे पहिल्या कादंबरीसाठी नागासाकीचा पट निवडला. या कांदबरीच्या यशानंतर इशिगुरो यांनी मागे वळून पाहिले नाही. अमेरिकेच्या अणुबॉम्ब हल्ल्यात उध्वस्त झालेल्या नागासाकीची पार्श्वभूमी त्यांनी १९८६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘अॅन आर्टिस्ट ऑफ द प्लोटिंग वर्ल्ड’ या दुसऱया कांदबरीमध्येही निवडली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या नागासाकीचे चित्रण या कादंबरीत आहे

इशिगुरो यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९५४ चा. त्यांचे वय पाच वर्षे असताना कुटुंबाने ब्रिटनमध्ये स्थलांतर केले. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ केंटमधून इंग्रजी आणि तत्वज्ञानाचे पदवीचे शिक्षण घेतले आहे.

अलिकडच्या काळात, २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द ब्रीड जायंट’ या कादंबरीसाठी इशिगुरो यांनी ब्रिटनमधला पट निवडताना एका वृद्ध दाम्पत्याची कथा मांडली आहे.


आतापर्यंत ११० जणांना साहित्यातील नोबेल मिळाले आहे. यामध्ये १४ महिलांचा समावेश आहे. 

४१ व्या वर्षी नोबेल मिळविणारे रुडयार्ड किपलिंग सर्वात तरूण पुरस्कार विजेते होते.  ८८
 व्या वर्षी डोरीस लॉरेटस् यांना पुरस्कार मिळाला होता. ते सर्वात वृद्ध विजेते ठरले होते. 

४ वेळा नोबेल दोन साहित्यिकांना विभागून देण्यात आले आहे. 


तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर
जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांनाही यंदा रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.

पदार्थांच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी या तिघांनी जे योगदान दिले त्याचमुळे हे नोबेल त्यांना दिले जात असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.



रेनर वेईस, बॅरी सी. बॅरीश, कीप एस. थॉर्न यांना भौतिकशास्त्रातील नोबेल
२०१७ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक LIGO डिटेक्टरच्या संशोधनात उल्लेखनीय योगदान देणार्‍या रेनर वेईस, बॅरी सी. बॅरीश, कीप एस. थॉर्न या तीन वैज्ञानिकांना दिले जाणार असल्याचे रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने जाहीर केले आहे.

लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅविटेशनल-व्हेव अब्जर्व्हेटरी (LIGO) डिटेक्टर हे गुरुत्वाकर्षण लहरीमुळे निर्माण होणार्‍या विश्वातील थरथराटाला शोधणारे यंत्र आहे. LIGO ही गुरुत्वाकर्षणावर लहरी शोधण्यासाठी भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा आणि वेधशाळा आहे. LIGO हा अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे मधील वैज्ञानिकांचा एक संयुक्त प्रकल्प आहे.

१०० वर्षांपूर्वी अल्बर्ट आईनस्टाइन यांनी भाकीत केलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या लहरीला १४ सप्टेंबर २०१५ रोजी प्रथमच शोधण्यात आले होते. दोन कृष्णविवरांची टक्कर झाल्यास निर्माण होणार्‍या या लहरींना LIGO डिटेक्टरपर्यंत पोहचण्यासाठी १.३ अब्ज प्रकाशवर्ष लागतात, असा यात निष्कर्ष काढण्यात आला. या संशोधनात एकूण २० देशांतील हजारपेक्षा अधिक वैज्ञानिकांनी काम केले आहे.

रेनर वेईस यांचा जन्म जर्मनीच्या बर्लिन शहरात १९३२ साली झाला. १९६२ साली कॅम्ब्रीज विद्यापीठातून पीएचडी प्राप्त करून ते तेथेच प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 

अमेरिकेचे कीप थॉर्न यांचा जन्म १९४० साली झाला. १९६५ साली प्रींकटॉन विद्यापीठातून पीएचडी प्राप्त करून कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. 

बॅरी बॅरीश यांचा जन्म अमेरिकेत १९३६ साली झाला. १९६२ साली कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केल्यानंतर तेथेच भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. 



भारत आणि जिबूती यांच्यात करार 
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या जिबूती देशाच्या दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांनी नियमित विदेशी कार्यालय स्तरावरील सल्लामसलत स्थापित करण्यासाठी एक करार केला.

२०१५ साली युद्ध परिस्थितीत सापडलेल्या येमेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी चालवलेल्या ‘राहत’ मोहिमेदरम्यान जिबूती देशाची मदत झाली होती. 

जिबूती हा ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ या प्रदेशातील एक देश आहे. येथे बहुधा फ्रेंच आणि अरबी भाषा बोलली जाते. जगातील सर्वाधिक खार्‍या जलसाठयांपैकी एक जलसाठा या देशात डॅनकिल वाळवंटात आहे, ज्याला ‘असाल सरोवर’ म्हणून ओळखले जाते. याची राजधानी जिबौती शहर आहे आणि जिबेतीयन फ्रॅंक हे चलन आहे.




सौम्या स्वामीनाथन यांची WHO उप-महासंचालक पदावर नियुक्ती
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) चे महासंचालक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) उप-महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

डॉ. स्वामीनाथन या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन खात्यामध्ये सचिव म्हणून देखील पदावर आहेत. जागतिक स्तरावर ओळखल्या जाणार्‍या क्षयरोग आणि HIV वरील संशोधक डॉ. स्वामीनाथन अनेक जागतिक पातळीवरच्या सल्लागार समितीच्या सदस्या आहेत.

नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) ची स्थापना १९११ साली करण्यात आली, जी जगातल्या सर्वात जुन्या वैद्यकीय संशोधन मंडळांपैकी एक आहे. 

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय असलेल्या WHO ची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी स्थापन करण्यात आले.