ओबीसी वर्गीकरणासाठी नव्या आयोगाची स्थापना 
केंद्रीय यादीत समाविष्ट असलेल्या अन्य मागासवर्गांमध्ये (ओबीसी) मोडणार्‍या सर्व जातींना आरक्षणाचे फायदे समन्यायी पद्धतीने देता यावेत या उद्देशाने या जातींचे पोटवर्गीकरण करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका घटनात्मक आयोगाची स्थापना केली.


हा आयोग राज्यघटनेच्या अनुच्छेद ३४० अन्वये नेमण्यात आला असून दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश न्या.जी. रोहिणी या त्याच्या अध्यक्ष असतील. 
अध्यक्षांनी कार्यभार स्वीकारल्यापासून तीन महिन्यात आयोगाने अहवाल देणे अपेक्षित आहे.

तसेच डॉ. ए.के. बजाज यांची आयोगाचे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय वंशशास्त्रीय सर्वेक्षण संचालक व जनगणना महानिबंधक हे पदसिद्ध सदस्य असतील. केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे सहसचिव आयोगाचे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.



पंतप्रधानांच्या हस्ते हिमाचल प्रदेशमध्ये AIIMS साठी कोनशिला स्थापित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१७ रोजी हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) उभारण्यासाठी कोनशिला स्थापित केली.

याशिवाय, उना शहरात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) आणि कंद्रोरी येथे भारतीय पोलाद प्राधिकरण (SAIL) च्या पोलाद प्रक्रिया प्रकल्पासाठी देखील कोणशीला स्थापित करण्यात आली. 



राजघाटावर महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी महात्मा गांधी यांच्या १.८ मीटर उंचीच्या ब्रॉंझच्या पुतळ्याचे अनावरण केले. 

प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी हा पुतळा तयार केला असून, तो राजघाट येथे बसविण्यात आला आहे. या पुतळ्याची किमत ही ८ लाख ७३ हजार इतकी असल्याचे म्हटले आहे.

राजघाटावर दररोज दहा हजार पर्यटक भेट देत असून, त्यात अनेक परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. 

पार्किंगच्या जागेतील इंटरप्रिटेशन केंद्राचे उद्‌घाटनही नायडू यांनी या वेळी केले. ५९ लाखांचे एलईडी स्क्रीनचा वापर करून गांधीजींच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. त्याशिवाय पर्यटकांना गांधीजींवरील चित्रपट आणि त्यांची भाषणेही ऐकता येणार आहेत.



भारत-ऑस्ट्रेलिया ODI मालिका भारताने जिंकली भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ४-१ ने मालिका जिंकली.

रोहित शर्माच्या दमदार खेळीमुळे त्याला शेवटच्या सामन्याचा सामनावीर घोषित करण्यात आले. मालिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. या विजयासोबतच भारतीय संघाने ODI क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळविले.



तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील यावर्षीचे नोबेल
वैद्यकशास्त्रामधील या वर्षीचे नोबेल पारितोषिक जेफ्री सी हॉल, मायकेल रोसबॅश आणि मायकेल डब्ल्यू यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर झाले आहे.


मानवी शरीरामध्ये सुमारे २४ तासांपर्यंत चालत असलेल्या जैविक प्रक्रिया (सर्केडियन सिस्टीम्स) नियंत्रित करत असलेल्या ‘मॉलिक्‍युलर मेकॅनिझम’संदर्भात या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे.

“वनस्पती, मानव वा प्राणी त्यांच्या शरीरांमधील जैविक प्रक्रिया पृथ्वीच्या परिवलनाशी कशा प्रकारे जुळवून घेतात, हे या संशोधनामुळे स्पष्ट होते. या शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी फळांवर बसणाऱ्या माशांचा (फ्रुट फ्लाईज) वापर केला होता.

दरवर्षी सर्वप्रथम वैद्यकशास्त्र क्षेत्रामधील नोबेल पारितोषिकाची घोषणा प्रथम केली जाते. यानंतर विज्ञान, साहित्य आणि जागतिक शांतता या क्षेत्रांतील कार्यासाठीही नोबेल प्रदान केले जाते



नोबेल पुरस्कार 
नोबेल पुरस्कार हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडिश आणि नॉर्वेजियन संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

हा सन्मान स्वीडिश संशोधक आल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेच्या सन्मानार्थ सन १८९५ पासून दिला जात आहे. सन १९०१ ते आतापर्यंत, नोबेल पारितोषिक आणि आर्थिक विज्ञानामधील पारितोषिक ९११ व्यक्ती आणि संस्थांना ५७९ वेळा देण्यात आले. 

पहिल्यांदा सन १९०१ मध्ये रसायनशास्त्र, साहित्य, शांती, भौतिकशास्त्र, आणि वैद्यकशास्त्र यामध्ये पारितोषिक दिले गेले होते. त्यानंतर सन १९६८ मध्ये आर्थिक विज्ञान मध्ये संबंधित नोबेल मेमोरियल पुरस्कार स्वीडनच्या केंद्रीय बँकेकडून स्थापन करण्यात आले.

क्षीस समारंभ दरवर्षी स्टॉकहोम, स्वीडन मध्ये आयोजित करण्यात येतो, पण फक्त शांती पारितोषिक समारंभ ओस्लो, नॉर्वे येथे आयोजित करण्यात येतो. 

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि आर्थिक विज्ञान नोबेल मेमोरियल पुरस्कार रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस यांच्याकडून वितरित केला जातो.शरीरविज्ञानशास्त्र आणि वैद्यकशास्त्र नोबेल करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेम्ब्ली यांच्याकडून वितरित केला जातो.

साहित्य नोबेल पुरस्कार  स्वीडिश अकादमीकडून वितरित केला जातो. शांतीसाठी नोबेल हे पारितोषिक स्वीडिश संस्थेकडून दिले जात आहे, तर तो नॉर्वेजियन नोबेल समितीकडून वितरित केला जातो.

देण्यात येणारे नोबेल पदके १९८० च्या आधी २३ कॅरेट सोन्यापासून बनविलेली होती. आणि त्यानंतर २४ कॅरेटचे सोन्याचा लेप चढवलेले १८ कॅरेटचे हिरव्या सोन्यापासून बनविण्यात येत आहे. 

नोबेल शांती पदकावर ‘Pro pace et fraternitate gentium’ म्हणजेच ‘शांती आणि बंधुतासाठी’ असे वाक्य कोरले जाते. हे पारितोषिक मरणोत्तर दिले जात नाही.

पाकिस्तानी बालशिक्षण कार्यकर्ता मलाला युसुफझाई ला २०१४ साली वयाच्या १७ व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला, त्यामुळे ती हा पुरस्कार प्राप्त करणारी सर्वात तरुण व्यक्ती आहे.

लियोनाइड हुरविच यांनी २००७ साली अर्थशास्त्रासाठी वयाच्या ९० व्या वर्षी नोबेल प्राप्त करणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत.

जर्मनीचे कार्ल व्हॉन ओसिएट्झकी, म्यानमारच्या नेत्या ओंग सन सु की आणि चिनी कार्यकर्ते लिऊ झिओबो हे तीन शांती पुरस्कार विजेते पुरस्काराच्या वेळी अटकेत होते.



बिरेंद्र सस्माल या उद्योजकाने ब्रिटनचा व्यवसाय पुरस्कार जिंकला
घाना देशात स्थित बिरेंद्र सस्माल या भारतीय उद्योजकाला आफ्रिकेमध्ये अभिनव माहिती तंत्रज्ञान समाधान देण्यामध्ये त्याच्या योगदानासाठी ब्रिटनमधील प्रतिष्ठित व्यवसाय पुरस्कार मिळाला आहे.

सुबाह समुहाचे CEO बिरेंद्र सस्माल यांना लंडनमधील एशियन अचीवर्स अवॉर्ड २०१७ समारंभात ‘इंटरनॅशनल बिजनेस पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा 
दरवर्षी २ ऑक्टोबर या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो.

२ ऑक्टोबरला जन्मलेले भारताचे महात्मा गांधी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या अहिंसावादी विचारसरणीचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा केला जातो.

मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर, काठियावाड (ब्रिटिश भारत) येथे झाला आणि मृत्यू ३० जानेवारी १९४८ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना “महात्मा” ही उपाधी दिली. जनता प्रेमाने त्यांना ‘बापू’ या नावाने ओळखत असे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सन १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने १५ जून २००७ रोजी एक प्रस्ताव मंजूर करून जगात शांती आणि अहिंसा यांचा प्रचार करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाला ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस’ च्या रूपात साजरा करण्याचे मान्य केले.



कोलंबोमध्ये SAARC देशाच्या संसदीय सदस्यांच्या संघटनेची ८ वी परिषद आयोजित
४ ऑक्टोबर २०१७ रोजी श्रीलंकेच्या कोलंबो शहरात SAARC देशाच्या सभापती संसदीय सदस्यांच्या संघटनेची ८ वी परिषद आयोजित करण्यात आली आहे.

लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या नेतृत्वात भारताचे प्रतिनिधीमंडळ या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.