आसाम राज्य शासनाचे नवीन पर्यटन धोरण
आसाम राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने राज्याचे नवे पर्यटन धोरण-२०१७ जाहीर केले. नवे धोरण जानेवारी २०१८ ते २०२२ पर्यंत लागू असेल.


राज्यात हिंदी वा इंग्रजी किंवा इतर परकीय भाषेतील चित्रपटांना शूटिंग करण्यास विशेष सूट दिली जाणार आहे. तसेच त्यांच्या २५% किंवा १ कोटी रुपये (जे कमी असेल ते) खर्चाला राज्य शासन वापस करणार. 

यासाठी कमीत कमी ५ चित्रपट निर्माणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आसाम संबंधित कथेवर आसाममध्ये शूटिंग करण्यावर होणार्‍या १०% खर्चाला शासन वापस करणार.

आसाममध्ये टूरिस्ट यूनिट स्थापित केल्यास शासनाकडून अनुदान दिले जाणार. सोबतच १ कोटी रुपये खर्च केल्यास १० वर्षासाठी ५०% GST मध्ये सूट दिली जाणार. पर्यटकांसाठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स, हाउसबोट्स आणि फ्लोटिंग रेस्टॉरंट्ससाठी किमान १ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक झाल्यास त्यात ३०% अनुदान दिले जाणार. 

निवासी घरात पर्यटकांना स्थान देण्यासाठी ‘आमार आलही’ नामक एक विशेष योजना सुरू करणार. 
आसाममधील दुर्गम/संभाव्य पर्यटन स्थळांमध्ये २५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी अतिरिक्त १०% भांडवली अनुदान दिले जाणार.

तसेच याप्रसंगी ‘आसोम असम’ नावाने जाहिरातीचे औपचारिक रूपाने उद्घाटन करण्यात आले. आसाम पर्यटनाची ब्रॅंड अँबॅसेडर बॉलीवुड अभिनेत्री प्रियंका चोपडा ही आहे.



देशभरात पोलीस स्मृती दिवस आयोजित 
भारतात दरवर्षी २१ ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस पाळला जातो. या दिवशी पोलीस स्मारकावर पुष्पांजली अर्पित केली गेली आणि वीरांना श्रद्धांजली दिली गेली.

पोलीस स्मृती दिवस हा १९५९ साली या तारखेला भारत-चीन सीमेवर सीमेच्या रक्षणार्थ आपले बलिदान दिलेल्या १० पोलीस कर्मचार्‍यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. 

१९५९ सालापर्यंत २५०० मैल लांब भारत-तिबेट सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय पोलीस कर्मचार्‍यांकडे होती. जानेवारी १९६० मध्ये हा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.



महाधिवक्ता रणजित कुमार यांचा राजीनामा 
भारताचे महाधिवक्ता (Solicitor General) रणजित कुमार यांनी आपल्या महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिला आहे.रणजित कुमार यांनी आपला राजीनामा विधी व न्याय मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला. 

त्यांना जून २०१४ मध्ये महाधिवक्ता पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जून २०१७ मध्ये त्यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांकरिता वाढविण्यात आला होता.

हे देशाचे दूसरे सर्वोच्च विधी अधिकारीचे पद आहे. भारताचे महामुखत्यार (Attorney General) यांच्याखाली हे पद आहे. ते भारताचे मुख्य कायदेशीर सल्लागार आहेत आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील त्यांचे प्राथमिक वकील आहेत. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो.


जसिंडा आर्डर्न न्युझीलँडच्या पंतप्रधान 
जसिंडा आर्डर्न (महिला) यांची न्युझीलँडच्या पुढील पंतप्रधान पदासाठी निवड झाली आहे आणि यासोबतच न्युझीलँडला सर्वात तरुण पंतप्रधान लाभणार.

३७ वर्षीय आर्डर्न या कामगार पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांनी देशाचे ३९ वे पंतप्रधान बिल इंग्लीश यांच्या नॅशनल पार्टीचा पराभव करत विजय मिळवला आहे.

न्यूझीलँड हा नैऋत्य प्रशांत महासागरातील एक बेट देश आहे. याची राजधानी वेलिंग्टन शहर असून न्यूझीलँड डॉलर हे देशाचे चलन आहे.



नवी दिल्लीत ‘आंतरराष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद’ आयोजित होणार
२६ ऑक्टोबर २०१७ रोजी भारतात प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद’ (International conference on consumer protection) आयोजित केली जाणार आहे. २४ देशांची ही परिषद नवी दिल्लीत होणार आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) च्या सहकार्याने भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून ही परिषद ‘एंपॉवरींग कंज्यूमर्स इन न्यू मार्केट्स’ (नवीन बाजारामध्ये ग्राहकांचे सशक्तिकरण) या संकल्पनेखाली आयोजित केली जात आहे.

परिषदेत जपान, चीन, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, मंगोलिया, कम्बोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, वियतनाम, हाँगकाँग, मंगोलिया आदी देश सहभागी होतील. परिषदेत पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यांना आमंत्रित केले गेले नाही आहे.



UNFPA चा ‘जागतिक लोकसंख्या अहवाल २०१७’ प्रसिद्ध 
यूनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) ने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन २०१७ – वर्ल्डस् अपार्ट: रिप्रोडक्टिव हेल्थ अँड राइट्स इन द एज ऑफ इनइक्वेलिटी’ हा आपला जागतिक लोकसंख्येचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

यात भारताचे स्थान जगात 18 वा देश आहे. लोकसंख्येच्या वृद्धीदराला स्थिर राखण्याच्या दृष्टीने भारताने विकास केला आहे, मात्र बालविवाह आणि माता मृत्यूदर यासारख्या दृष्टीने अजूनही मागासलेला आहे.भारतात २७% बालकांचे लग्न १८ वर्षाखालील वयातच होते. जगभरात बालविवाहाची सरासरी २८% आहे.

भारतात एकूण प्रजनन दर (TFR) वैश्विक सरासरी २.५ हून कमी आहे. प्राप्त आकड्यांनुसार हा दर २.२ आहे.



प्रदूषणामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू होतात 
‘लॅन्सेट’ नियतकालिकाने प्रदूषणामुळे जगभरात होणार्‍या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, भारतातील जल आणि वायू प्रदूषणाची स्थिती चिंताजनक असून प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

२०१५ साली जगभरात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे ९० लाख लोकांचा मृत्यू झाला. यातील २८% भारतीय होते. २०१५ साली प्रत्येक ६ व्यक्तींमध्ये एकाचा मृत्यू प्रदूषणामुळे झाला.

२०१५ साली भारतात प्रदूषणामुळे तब्बल २५ लाख लोकांचा मृत्यू झाला. जल आणि वायू प्रदूषणामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. २०१५ साली भारतात वायू प्रदूषणामुळे १८ लाखांहून अधिक जणांनी जीव गमावला, तर जल प्रदूषणामुळे जवळपास ६ लाख लोकांचा मृत्यू झाला.

भारतानंतर या यादीत चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये प्रदूषणासंबंधित मृत्यूसंख्या १८ लाख इतकी आहे. त्यानंतर पाकिस्तान (२.२ लाख), बांग्लादेश (२.१ लाख) आणि रशिया (१.४ लाख) यांचा क्रमांक लागतो.

जल प्रदूषणासंबंधित मृत्यूसंख्येच्या या यादीत, भारतानंतर नायजेरिया (१.६ लाख) आणि पाकिस्तान (७४ हजार) यांचा क्रमांक लागतो.


भारत आणि चीन या देशांमधील अनेक शहरांमध्ये PM2.5 आकाराच्या कणांचे सरासरी वार्षिक प्रमाण 100 μg/m³ पेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. तसेच २०१५ साली वायू प्रदूषणामुळे झालेल्या जागतिक मृत्युंमध्ये ५०% हून अधिक मृत्यू भारत आणि चीनमध्ये झाल्याचे आढळून आले आहे

एड्स, क्षयरोग आणि मलेरिया या तीनमुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा अधिक मृत्यूंसाठी प्रदूषण जबाबदार आहे.